आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांची माहिती
नवी दिल्ली : देशात कोरोनाचं थैमान सुरु असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशभरात काल दिवसभरात ७०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १८ हजार ६०१ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ हजार २५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता १७.४७ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
केंद्रीय आरोग्य आणि गृहमंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत लव अग्रवाल बोलत होते. गेल्या १४ दिवसात २३ राज्यांमधील ६१ जिल्ह्यांमध्ये एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. यात महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील लातूर उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशभरात ४ लाख ४९ हजार ८१० टेस्ट घेतल्या गेल्या आहेत. सोमवारी ३५ हजार ८५२ टेस्ट घेतल्या. मात्र, एका राज्य सरकारकडून रॅपिड टेस्टबाबत काही तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये काही त्रूटी आढळल्या आहेत. त्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. पण, पुढचे दोन दिवस देशभरात रॅपिड टेस्ट न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे वैज्ञानिक रमन गंगाखेडकर यांनी दिली.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने
covidwarriors.gov.in नावाने वेब पोर्टल बनवले आहे. या वेब पोर्टलमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांची नावे नमूद केलेली असणार आहेत. या वेब पोर्टलमार्फत १ कोटी २४ लाख नागरिक जोडले गेले आहेत. या वेब पोर्टलमध्ये २० कॅटेगिरी आणि ४९ सब कॅटेगिरी बनवण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.