‘स्पिनर’ ते ‘टीम सिलेक्टर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2020
Total Views |


sunil joshi_1  


सुनील जोशी यांची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली. एक सर्वसामान्य खेळाडू ते वरिष्ठ पदाधिकारी असा प्रवास करणार्‍या सुनील जोशी यांच्या आयुष्याविषयी...


क्रिकेट हा भारतीयांचा सर्वाधिक आवडीचा खेळ. या खेळातील खेळाडू जसे सर्वत्र प्रसिद्ध आहेत, तशीच प्रसिद्धी या खेळातील प्रशिक्षक, नियामक मंडळातील पदाधिकारी आणि सदस्यांनाही आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी फिरकीपटू गोलंदाज सुनील जोशी यांची नुकतीच निवड केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. सुनील जोशी यांची या पदासाठी वर्णी लागल्याचे पाहून अनेक क्रिकेटप्रेमींनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. क्रिकेट विश्वात सर्वात बलाढ्य म्हणवल्या जाणार्‍या भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी सुनील जोशी यांची निवड झाली. आम्ही सर्वोत्तम उमेदवाराची या पदासाठी निवड केल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या निर्णयानंतर स्पष्ट केले. या पदासाठी सुनील जोशी यांच्यासह एकूण पाच उमेदवारांचे अर्ज बीसीसीआयकडे आले होते. मात्र, जोशींच्याच नावावर बीसीसीआयने अखेर शिक्कामोर्तब केले. २०११ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारे सुनील जोशी यांची जवळपास नऊ वर्षांनंतर प्रकाशझोतात आले. या नऊ वर्षांत त्यांनी आपल्या जीवनात बरेच बदल घडवले. एक खेळाडूपेक्षा प्रशिक्षक पदाच्या भूमिकेत त्यांनी केलेली कामगिरी फारच कौतुकास्पद ठरली. याच मुख्य कारणात्सव त्यांची या पदासाठी वर्णी लागली. सुनील जोशी आज भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. मात्र, येथपर्यंत पोहोचण्यात त्यांनी आपल्या जीवनात जीवापाड संघर्ष केला आहे.
 

सुनील जोशी हे मूळचे कर्नाटकचे. ६ जून १९७० रोजी कर्नाटकातील गडग येथे त्यांचा जन्म झाला. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले सुनील जोशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होतील, असा कुणी विचारही केला नव्हता. मात्र, कर्नाटकातील एका छोट्या गावात वास्तव्यास असणार्‍या सुनील जोशी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिले आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर ते पूर्णही केले. जोशी यांना लहानपणापासूनच विविध खेळांची आवड होती. अनेक क्रीडा प्रकारांमध्ये मन रमत असल्याने अभ्यासाची आवड तशी कमीच होती. लहानपणापासूनच ते मैदानावर विविध खेळ खेळण्यास जात असे. विविध खेळांमध्ये मन रमत असले तरी क्रिकेट खेळण्यासच ते प्राधान्य देत. गडग येथील मैदानावर काही वर्षे क्रिकेटचे सामने खेळल्यानंतर जोशी यांनी या खेळातच आपले करिअर घडविण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य कुटुंब असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयातील अनेक सदस्यांना हा निर्णय न पटण्यासारखाच होता. आपल्या मुलाने शिक्षणाकडे लक्ष द्यावे आणि उच्चशिक्षित होऊन नोकरी करावी, जेणेकरून आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, या मताचे जोशी कुटुंबीय होते. परंतु, मुळातच खेळाची आवड असणार्‍या सुनील जोशी यांचे मन कधीच अभ्यासाकडे फारसे वळले नाही. अखेर त्यांच्या आग्रहापुढे कुटुंबीयांनीही शरणागती पत्करली आणि सुनील जोशी यांचा क्रिकेटमध्ये करिअर घडविण्यासाठीचा मार्ग सुकर झाला. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी कुटुंबीयांनी होकार दिला असला तरी त्यांच्या जीवनातील संघर्ष काही संपला नव्हता.
 
 
आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू होण्यासाठी त्यांना गरज होती ती क्लबमधील प्रशिक्षणाची. मात्र, गडग येथे कोणतेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्लब उपलब्ध नव्हते. यासाठी दररोज ४० किमींचा प्रवास करून ते हुबळी येथे जात. जोशी हे डावखुरे फिरकीपटू होते. स्लो ऑर्थोड्रॉक्सहे त्यांच्या फिरकी गोलंदाजीचे वैशिष्ट्य. त्यांच्या या अनोख्या क्रिकेटशैलीची दखल घेत प्रशिक्षकांनी त्यांना कर्नाटकाच्या रणजी सामन्यात खेळण्याची संधी दिली. येथे त्यांनी उत्तम कामगिरी केल्यानंतर १९९६ साली त्यांना भारतीय संघात खेळण्यासाठी संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या एका सामन्यादरम्यान केवळ सहा धावा देत पाच गडी बाद केले. येथून ते सर्वत्र प्रकाशझोतात आले. मात्र, त्यानंतरच्या सामन्यात डाव्या हाताच्या बोटांना दुखापत झाल्याने काही काळ जोशी संघाबाहेर झाले. दुखापतीतून सावरल्यानंतर जोशी यांनी पुनरागमन करण्यात यशही मिळवले. मात्र, त्यांची कारकिर्द फारशी गाजली नाही. जोशी यांच्याकडे एकूण १५ कसोटी सामने आणि ६९ एकदिवसीय सामने खेळल्याचा अनुभव आहे. २०११ साली जोशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. मात्र, त्यानंतरही ते क्रिकेटपासून दुरावले नाहीत. विविध संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमध्ये खेळणार्‍या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही ते कार्यरत राहिले आहेत. यासोबतच क्रिकेटमधील विविध देशाच्या संघांकडूनही त्यांना प्रशिक्षकपदासाठी बोलावणे आले होते. जोशी यांच्या हाताखाली अनेक डावखुरे फिरकीपटू गोलंदाज घडल्याचा इतिहास आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची भारतीय संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@