साधूंच्या हत्याकांडास जबाबदार कोण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020   
Total Views |


palghar_1  H x


कोठेही जमावाकडून एखाद्याची हत्या झाली की मोठमोठ्याने गळा काढणारे महाभाग या घटनेबद्दल गप्प कसे काय आहेत? का हत्या झालेले साधू आहेत, हिंदू समाजाचे घटक आहेत म्हणून ही सर्व मंडळी तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प आहेत?


आपल्या राज्यासह संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देशास मुक्त करण्यासाठी झटत असतानाच, महाराष्ट्र राज्यात अलीकडे घडलेल्या दोन घटना पाहता, या राज्यामध्ये कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा! त्यातील पहिली घटना म्हणजे मुंबईत वांद्रा पश्चिमेस बंदीहुकूम तोडून जमलेला प्रचंड जमाव. ही घटना अफवा पसरविण्यामुळे घडली की एका वृत्तवाहिनीवरील बातमी ऐकून घडली, की त्या जमावाला ‘सुनियोजित’ पद्धतीने एकत्रित करण्यात आले होते, याचा शोध तपास यंत्रणांनी घ्यावा आणि त्यामागील नेमके सत्य काय आहे, ते उघड करावे. पण, जे घडले ते सहजपणे घडले असे मुळीच वाटत नाही.
 

वांद्रे पश्चिम स्थानकालगतच्या मशिदीसमोरील रस्त्यावर त्या दिवशी जमलेला जमाव पाहता दिल्लीमधील आनंद विहार परिसरामध्ये आपापल्या राज्यात जाण्यासाठी जी गर्दी उसळली होती, त्याची आठवण यावी. पण, दिल्लीमधील लोकांच्या हातात किमान सामानसुमान तरी होते. वांद्रे येथील जमाव गावी जाण्याच्या हेतूने तेथे जमला असेल, तर त्यांच्या हातामध्ये साधी पिशवीही नव्हती. मग त्यांच्या येण्याचा नेमका हेतू काय होता? जमलेल्या जमावाची उपासमार होत असल्याने त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी हा जमाव एकत्रित झाल्याचे सांगण्यात आले. पण, वांद्रे पश्चिमेस स्थानकालगत अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे कोणतीही महत्त्वाचे कार्यालय नसताना जमावाने तेथे कशाला गर्दी केली होती? तसेच शहरात सर्वत्र जमावबंदी असताना बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची नजर चुकवून एवढ्या मोठ्या संख्येने हा जमाव तेथे आलाच कसा? या सर्व प्रकाराला कोणाची फूस होती? राज्य कोणत्या परिस्थितीतून जात आहे, हे लक्षात न घेता जमावास तेथे आणण्यामागील नेमका हेतू काय होता? आम्ही त्या जमावाची समजूत काढल्याने ते परत जात आहेत, असे त्या ठिकाणी उपस्थित काही नेते सांगत असल्याची दृश्ये जनतेने वृत्तवाहिन्यांवर पाहिली आहेतच. या नेत्यांच्या सांगण्यावरून तो जमाव परत गेला असेल तर तो तेथे कोणाच्या सांगण्यावरून आला, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो? तसेच ही सर्व नेतेमंडळी ‘लॉकडाऊन’ असताना तेथे कशी काय ‘प्रकट’ झाली? भाषण करण्यासाठी तेथे ‘लाऊडस्पीकर’ कसा काय आला? कशासाठी हा सर्व उद्योग करण्यात आला होतासर्व देश कोरोना संकटाविरुद्ध एकदिलाने लढत असताना असंतोषाची ठिणगी टाकण्याचे उद्योग कोणाचे? समाजातील अनेकांचे हाल होत आहेत, पण त्यांना मदत करण्यासाठी शासकीय आणि स्वयंसेवी यंत्रणा कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मदत मागायची का गर्दी करून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढवायचा? सरकारने याचा शोध घ्यायलाच हवा.
  
‘लॉकडाऊन’च्या काळातच गेल्या आठवड्यात अशीच एक भयानक घटना घडली. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले भागात गुरुवारी रात्रीच्या सुमारास जमावाकडून दोन साधूंसह तिघांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. आपल्या गुरूच्या अंत्यसंस्कारासाठी हे साधू मोटारीने सुरतकडे निघाले असताना त्यांच्यावर हा अमानुष हल्ला झाला. दाभाडी-खानवेल मार्गावर जमावाने त्यांचे वाहन अडविले. सुमारे २०० जणांच्या जमावाने त्या वाहनावर हल्ला केला. वाहन उलथवून टाकले. तेथे असलेल्या वन विभागाच्या एका कर्मचार्‍याने ही माहिती पोलिसांना कळविली असता पोलीस घटनास्थळी आले. पण, त्या जमावास रोखण्याचा पोलिसांकडून काहीच प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाही. पोलिसांनी त्या निरपराध साधूंना, हत्या करण्यासाठी जमावाच्या हाती सोपविले, असे या घटनेच्या ज्या चित्रफिती व्हायरल झाल्या आहेत, त्यावरून दिसून येत आहे. निरपराध साधूंवर जमाव तुटून पडत असल्याचे आणि पोलीस तेथे असूनही ते हा प्रकार रोखण्यासाठी काहीच करीत नसल्याचे त्या घटनेवरून दिसून आले आहे.
 
‘लॉकडाऊन’च्या काळात रात्रीच्या वेळी एवढा जमाव त्या ठिकाणी येतोच कसा? तसेच त्या मोटारीतील दोघे साधू आणि चालक यांच्यावर हल्ला करण्याचे धाडस करतोच कसा, या प्रश्नाची उत्तरे जनतेपुढे आलीच पाहिजेत. या घटनेसंदर्भात वाराणसी येथील श्री पंच दशनाम जुना आखाडा या संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत प्रेम गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, या घटनेस जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या या पत्रामध्ये त्यांनी, संत कल्पवृक्षगिरी (वय ७०), सुशील गिरी (वय ३५ ) आणि त्यांच्या वाहनाचा चालक निलेश तेलगडे या तिघांच्या नृशंस हत्येची माहिती दिली आहे. श्रीमहंत रामगिरी यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर हे तिघे मुंबईहून गुजरातकडे निघाले असताना गडचिंचले गावाजवळ ही अमानुष घटना घडली. पोलीस घटनास्थळी असताना ते हे हत्याकांड उघड्या डोळ्यांनी पाहत राहिले. जमावाने साधूंकडील ५० हजारांची रक्कम आणि देवाचे सोन्याचे दागिनेही पळवून नेले. पोलिसांनी या घटनेसंदर्भात १०० लोकांना अटक केली असली तरी ही घटना का घडली यामागील गूढ अजून कायम आहे.
 
तेथे जमलेल्या जमावाने ती मंडळी चोर असल्याचे समजून हा हल्ला केला, असे सांगण्यात येते. तसेच त्या भागामध्ये ज्या अफवा पिकत आहेत, त्यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जाते. या हल्ल्यामागील कारणे काही असोत, पण प्रत्यक्ष पोलिसांच्या उपस्थितीमध्ये दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची हत्या होते याला काय म्हणायचे? राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही, अशी कोणालाही शंका यावी! राज्यामध्ये हिंदुत्वाचा वसा घेतलेल्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना, दोन साधूंची त्यांचा काहीही दोष नसताना पोलिसांच्या समक्ष हत्या व्हावी? राज्यातील पोलीस यंत्रणा सध्या कोरोना संकटामुळे प्रचंड दबावाखाली आहे हे मान्य आहे. पण, समोर गुन्हा घडत असताना पोलिसांनी ते हत्याकांड हतबलपणे पाहत बसावेदोन निरपराध साधूंच्या या अमानुष हत्याकांडाबद्दल ‘लॉकडाऊन’ असतानाही आणि वृत्तपत्रे प्रसिद्ध होत नसतानाही संतापाची एकच लाट सर्वत्र उसळली आहे. समाज माध्यमांवरून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निषेध केला जात आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे कोठेही जमावाकडून एखाद्याची हत्या झाली की मोठमोठ्याने गळा काढणारे महाभाग या घटनेबद्दल गप्प कसे काय आहेत? का हत्या झालेले साधू आहेत, हिंदू समाजाचे घटक आहेत म्हणून ही सर्व मंडळी तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प आहेतमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व घटनेची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. राज्यातील सरकारने या हत्याकांडाच्या घटनेचा मुळापासून तपास करायला हवा. निरपराध साधूंची हत्या कोणी, का आणि कोणत्या हेतूने केली हे सत्य सरकारने शोधायलाच हवे!
 
 
 

@@AUTHORINFO_V1@@