बालकांच्या देखभालीमध्ये ‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस’चे व्यवस्थापन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |


kids_1  H x W:



मानवी शरीरातील श्वसनसंस्था ही नाकापासून सुरू होते व पुढे घसा (Pharynx), श्वसननलिकेचे मुख (Glottis), श्वसननलिका (Trachea, Bronchus) आणि तिच्या शाखा (Bronchioles) व द्राक्षाच्या आकाराच्या वायुकोशांनी (alveoli) भरलेल्या फुप्फुसांचा या संस्थेमध्ये समावेश होतो. सूज किंवा अडथळा किंवा संकुचन किंवा दूषित घटक श्वासाबरोबर ओढले जाणे (aspiration) अशा कारणांमुळे श्वसनसंस्थेतील कोणताही भाग रोगग्रस्त झाल्यास श्वासोच्छवासामध्ये अडथळे येणे अपरिहार्य आहे. हृदय, मेंदू किंवा अगदी तापासारख्या काही इतर वैद्यकीय समस्यांमुळेही श्वास घ्यायला कष्ट पडणे म्हणजे ‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस’ निर्माण होऊ शकतो.

 



ही स्थिती कशी ओळखाल?

 


एखादे मूल किंवा व्यक्ती जलद श्वासोच्छवास करताना दिसल्यास, खोल श्वास घेताना दिसल्यास, श्वास घेताना त्या व्यक्तीची छाती, छातीचा पिंजरा किंवा पोटाचा वरचा भाग किंवा मान ओढले जात असल्याचे (retraction) दिसो अथवा ना दिसो, थकवा किंवा घामाघूम झाल्याने श्वासाचा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येत असोत वा नसोत, अशा स्थितीला धोक्याची सूचना मानून आजारी व्यक्तीस ताबडतोब आपत्कालीन कक्षामध्ये घेऊन जायला हवे व तत्काळ उपचार सुरू करायला हवेत.

असे कशामुळे घडते?

 


मानवी शरीर हे पेशींनी बनलेले आहे. आपल्या पेशींना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आणि श्वासोच्छवासाद्वारे रक्तातून कार्बनडाय ऑक्साइड काढून टाकण्याची गरज असते. कोणत्याही निरोगी मुलाच्या किंवा व्यक्तीच्या शरीरामध्ये हे कार्य श्वासपटलाद्वारे (diaphragm) प्रतिक्षिप्तपणे दिवसभर सुरू असते. मात्र, एखाद्या आजारामुळे ऑक्सिजनचा वापर वाढल्याने किंवा शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने पुरेसा ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा फुप्फुसांना कार्बनडाय ऑक्साइड बाहेर फेकण्याचे काम जमेनासे होते. अशावेळी रक्तातील pH पातळी बदलते. अशावेळी जाणवणारी कमतरता स्वत:हून भरून काढण्याची शरीराची यंत्रणा कार्यरत होते आणि उतींचे मृत होणे टाळण्यासाठी शरीर सर्व साहाय्यक स्नायूंना कामाला लावून ऑक्सिजनची वाढलेली गरज पूर्ण कऱण्याचा प्रयत्न करते किंवा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न करते. जलद श्वासोच्छवास, खोल श्वास घेणे, रिट्रॅक्शन्स, नाकपुड्या फुलणे आणि श्वास घेताना खूप आवाज येणे यातून शराराची हीच धडपड दिसून येते. गंभीर स्वरूपाच्या ‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस’कडे लगेच लक्ष देऊन वेळीच उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस’ला कारणीभूत ठरणार्‍या वैद्यकीय समस्या कोणत्या?

 


न्यूमोनिया, प्लेउरल एफ्युशन किंवा फुप्फुसाच्या बाह्यपरिसरात पाणी साठणे, फुप्फुसांमध्ये पेशींची अनैसर्गिक वाढ, अतितीव्र स्वरूपाचा अस्थमा, ब्रॉन्कायटिस, लंग अ‍ॅब्सेस म्हणजे फुप्फुसांमध्ये जंतुसंसर्ग होणे, श्वसनसंस्थेमध्ये बाह्य घटकांचा शिरकाव होणे, तीव्र स्वरूपाचा लॅरिंजायटिस म्हणजे स्वरयंत्राला गंभीर सूज येणे, पेरिटॉन्सिलर अ‍ॅब्सेस किंवा टॉन्सिल्सच्या मागच्या बाजूला जंतुसंसर्ग होणे अशा कारणांमुळे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस’ची स्थिती उद्भवू शकते.

यावर कोणती उपाययोजना करता येईल?

 


श्वसनक्रियेमध्ये अडचण येत असल्याचे वाटू लागल्यास किंवा इतरांना असे होत असल्याचे दिसल्यास त्या मुलास किंवा व्यक्तीस जवळच्या आपत्कालीन विभागामध्ये न्यायला हवे. अशा व्यक्तीस बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा करणे, श्वासोच्छवासाची गती कमी करणे व त्यामागोमाग एक्स-रे, रक्ततपासणी व USG करून घेऊन श्वसनक्रियेतील अडचणीमागचे कारण शोधून काढणे या गोष्टींचा उपचारांमध्ये समावेश होतो. कोणत्या प्रकारचे उपचार दिले जावेत, हे समस्येमागच्या मूळ कारणावर अवलंबून असते. श्वसनक्रियेमध्ये अडथळा जाणवणार्‍या अनेक रुग्णांना केवळ हॉस्पिटलमध्ये दाखल करणे पुरेसे नसते, तर लहान मुलांसाठीच्या किंवा प्रौढांसाठीच्या अतिदक्षता कक्षामध्ये देखरेखीखाली ठेवावे लागते, तर काही वेळा आजार वेगाने बळावल्यास व स्थिती खूप खालावल्यास व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते.

कोणत्या वयोगटाला या समस्येचा धोका सर्वाधिक असतो?

 


‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस’ ही स्थिती जंतुसंसर्गामुळे किंवा असंसर्गजन्य रोगामुळे आजारी पडल्यानेही उद्भवू शकते. हा धोका का व कोणामध्ये निर्माण व्हावा, हे जंतूसंसर्गाचा प्रकार आणि असा संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून मिळणारा प्रतिसाद यांवर अवलंबून असते. लहान मुलांना वेळच्यावेळी पुरेशा लसी दिल्या गेल्या असतील तर लसीकरणाद्वारे रोखता येणार्‍या आजारांपासून त्यांचे संरक्षण करता येते. मात्र, मोठी मुले किंवा प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांची स्थिती लवकर खालावण्याची शक्यता अधिक असते. श्वसनयंत्रणेचे बहुतेक आजार हे तीव्र स्वरूपाचे असतात, त्यासाठी स्क्रीनिंगची गरज नसते. मात्र, एखादे मूल जलद, खोल आणि भरभर श्वास घेताना दिसल्यास किंवा त्यास श्वास घ्यायला कष्ट पडत असल्याचे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. याबाबतीत उशीर करता नये, लहान मुलांमधील ही समस्या आणखी वेगाने वाढली व अधिक गंभीर बनली तर त्यातून बरे व्हायला खूप वेळ लागू शकतो व ते कठीणही असते. ‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस’साठी कुठलेही घरगुती उपाय नाहीत, हे लक्षात घ्यावे.

 

- डॉ. समीर सदावर्ते

(लेखक सल्लागार, पीडिअ‍ॅट्रिशियन्स आणि

 

निओनॅटल इन्टेसिव्हिटीस्ट्स आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@