कृषीला दिवस सुगीचे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |


corona effect_1 &nbs



कोरोनाला मी माझ्या भाषेत ‘अर्बन डिसीज’ म्हणतो, म्हणजे ‘शहरी आजार.आजवर ज्या साथी होत्या त्या बर्‍यापैकी गावातून शहराकडे यायच्या. पण, या आजाराचा प्रवास शहराकडून गावाकडे आहे. म्हणूनच भारतात जवळपास ५६ जिल्हे असे आहेत जिथे कोरोना पोहोचलेला नाही. ‘लॉकडाऊन’च्या घोषणेपूर्वी कित्येक लोक मोठ्या शहरातून आपापल्या गावी निघून गेले. यात सर्वाधिक जो भरडला गेला तो मजूर आणि कामगार वर्ग.


हा कामगार वर्ग असंघटित होता, जो रोजच्या मजुरीवर त्याच्या कुटुंबाचे पोट भरत असे. असे लाखो लोक अजूनही काही जिल्ह्यांच्या किंवा राज्यांच्या वेशीवर अडकलेले आहेत आणि ‘लॉकडाऊन’ उघडल्यावर त्वरित आपापल्या गावी पोहोचण्यासाठी त्यांची धावपळ होणार आहे. हे मजूर बांधव घरी पोहोचल्यावर त्यातले कदाचित ५० टक्के बांधवच पुन्हा शहरी रोजगाराकडे वळतील. उर्वरित बांधव, ‘गड्या आपला गाव बरा’ प्रमाणे आपल्या गावी राहून शेतीकरण, आपापल्या पालकांना शेतकामात मदत करणं स्वीकारतील.
 

कोरोनाच्या प्रसारामुळे दरवर्षीपेक्षा या वर्षी कृषिखाते शेतकर्‍यांसाठी अधिक सजगपणे कामाला लागलं आहे. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे आणि ‘लॉकडाऊन’मुळे अनेक अडचणींचा सामना शेतकर्‍यांना करावा लागतोय. शेतकर्‍यांना वेळेवर बियाणे, खते, कीटकनाशके, पिकांची वाहतूक या समस्या आहेत. परंतु, भारत सरकारने शेती व्यवसायाला ‘लॉकडाऊन’मधून सवलत दिल्याने लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पाऊसदेखील चांगला पडणार आहे. पाण्याची कमतरता असलेल्या मराठवाड्यातही या वर्षी मुबलक पावसाची शक्यता आहे. नेहमीच रिकामं असणार जायकवाडी धरण आजदेखील बर्‍यापैकी भरलेलं आहे. या सगळ्या जेवढ्या जमेच्या बाजू आहेत, तेवढीच जमेची बाजू म्हणजे कोरोनामुळे कामगारांची होणारी उपलब्धी. आतापर्यंत शेती करण्यासाठी मजूर, कामगारांची जी कमतरता भासायची, ती आता तेवढ्या प्रमाणात भासणार नाही. शहरातून पुन्हा आपल्या गावी जाऊन शेती करणारी नवी पिढी उभी राहील. ही नवी पिढी गावी जाताना त्यांच्या सोबत त्यांनी शहरात घेतलेला अनुभव, त्याच्याकडे असलेला स्मार्टफोन, त्यांच्या शहरातल्या ओळखी या सगळ्या गोष्टी भांडवल म्हणून घेऊन जाणार आहेत.
 
शेतकर्‍याला आजपर्यंत शेतमालाला कधीही योग्य भाव मिळाला नाही, ही सर्वात मोठी अडचण नेमकी अनेक स्टार्टअप कंपन्यांनी हेरली असून त्यांनी शेतकर्‍यांसाठी वेगवेगळे मोबाईल अ‍ॅप्स तयार केले आहेत. ‘नाबार्ड’सारख्या बँकांद्वारे ‘FPO' वर मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. यामुळे शेतातून माल थेट ग्राहकांच्या घरात पोहोचायला मदत होईल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली ही यंत्रणा व्यवहारात अधिक पारदर्शकता आणत आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव मिळेल, शासनाच्या विविध योजना, पीक विमा या गोष्टी शेतकर्‍यांना अधिक सुलभतेने मिळतील, जेणेकरून शेतकर्‍यांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल. हे सारं घडत असताना, शेतकर्‍यांनाही बदल स्वीकारावा लागणार आहे. गावाच्या बाहेर पडून नव्या बाजारपेठा शोधाव्या लागतील, भारतात कोणती पीकं अतिरिक्त प्रमाणात आहेत, ती वगळून इतर पीकं शोधून त्या पिकांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. सेंद्रीय शेती, वैकल्पिक पिके या सगळ्यांचा अभ्यास करून आपापल्या भूभागानुसार व प्रादेशिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील, प्रगत शेतकर्‍यांचे अनुभव समजून घ्यावे लागतील. आपला शेतकरी हा खंबीर असल्याने त्याने न डगमगता ह्या कोरोनाच्या लढाईत जिंकून अधिक नफा कमवावा, आपल्या अन्नदात्याला या लढाईत आपली सर्वांची साथ मात्र नक्कीच हवी.
 
 

- प्रसाद कुलकर्णी

@@AUTHORINFO_V1@@