कोरोनाचा कसोटी काळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |


corona epidemic_1 &n

 


शिक्षकांनी आदर्श वागण्यात सार्वजनिक स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. एकदा चांगले वळण पडले की, पुढे फारसे काही सांगावे लागत नाही. स्वयंशिस्त बाळगणार्‍या व्यक्ती पुढे जगभरात कुठेही गेल्या तरी आपली मूल्ये सोडत नाहीत. हा विषय फार गहन आहे. कारण, लोकसंख्या प्रचंड आहे. सगळ्यांना एका सूत्रात बांधणे अवघड असले तरी कठीण मात्र नक्कीच नाही.


आपण सर्वात जास्त हेळसांड करतो ती आपल्या आरोग्याची! तरुण वयात आपणच आपल्या शरीरावर केलेले अत्याचार शरीर चालवून घेते. पण, एकदा का चाळीशी ओलांडली की प्रकृतीच्या कुरबुरी वाढू लागतात आणि म्हातारपणात शरीर साथ देत नाही. त्यामुळे शरीर स्वास्थ्याचे आणि मन:स्वास्थ्याचे बिकट प्रश्न त्या व्यक्तीपुढे आणि तिच्या कुटुंबापुढे उभे राहतात. भविष्याच्या द़ृष्टीने आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक तरतूद करुन ठेवतो तोच विचार आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत केला तर? सर्वसाधारणपणे सर्वेक्षणानंतर असे आढळून आले आहे की, स्त्रिया आपल्या कुटुंबाचे हित बघता बघता स्वत:कडे दुर्लक्ष करतात. पण, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ असं सामर्थ्य असणार्‍या स्त्रीचं आरोग्यही तसंच असायला हवं.अनेकजणी स्वत:वर घरगुती उपचार करतात आणि वेळ मारुन नेतात. त्यामुळे अनेक दुर्धर आजार बळावतात. याचे कारण स्त्रिया नियमित वैद्यकीय तपासणी करुन घेत नाहीत. ज्यावेळी आजाराचे निदान होते, त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. म्हणून मला आवडणारे एक वचन वेळीच एक टाका घाला, इतर नऊ टाके वाचतील.’ संपूर्ण कुटुंबाचा डोलारा समर्थपणाने सांभाळणारी स्त्री ही कोणत्याही घराचा भरभक्कम आधारच असते. अर्धा संसार टाकून गेलेल्या अनेक कुटुंबांची परवड मी स्वत: अनुभवली आहे. सर्व स्त्रियांनी आपली शारीरिक तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करुन घ्यायला हवी आणि त्यांनी सुचवलेली औषधे आणि पथ्य यांचे अवश्य पालन करावे. हे झाले स्त्रीवर्गाविषयी, पण प्रपंचाचा गाडा ओढणारे पुरुष आहेत. अहोरात्र कष्ट करणारे आहेत. सर्वांनी काही गोष्टी आवर्जून कराव्यात़ आपल्या आरोग्याच्या बाबतीत काही नियम पाळणे हे आपल्याच हिताचे ठरणारे असते. जसे आहार आणि व्यायामातील नियमितपणा, तसेच झोपेच्या किंवा कामकाजाच्या नियमित सवयी, या सर्वांमुळे आपले शरीर, मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. पर्यायाने कुटुंब सुरक्षित होते. व्यायाम मग तो कोणत्याही स्वरुपाचा का असेना, प्रत्येकाने करायला हवा, अर्थात स्थल-काल-परिस्थिती आणि वयाला अनुसरुन! त्यात सातत्य हवे. शिवाय कोणत्याही गोष्टीचा अतिरेकही बरा नव्हे.
 

आपल्या देशात रंग, रुप, उंची याबाबत जी विभिन्नता आहे, तेवढी भिन्नता जगात कुठेही नाही. त्यामुळे वजन, उंची यांचे प्रमाण व्यस्त असू शकते. टीव्ही, समाजमाध्यमांमुळे आपल्या शारीरिक सौंदर्याविषयी आपण भलतेच जागरुक आहोत. त्यामुळे ‘स्लिम’ होण्याच्या नादात आपणच आपले फिटनेस ट्रेनर होतो आणि शरीरावर अनन्वित अत्याचार करतो. व्यायामही मर्यादित असावा, त्याला अनुसरुन आपला आहार असावा. डाएट करण्याचं ‘फॅड’ आहे. मी ‘फॅड’ अशासाठी म्हणतोय की, झटपट वजन कमी करायचं असेल, तर तरुण-तरुणी अयोग्य आहारपद्धती अंगीकृत करतात. शरीर पोषणासाठी आवश्यक तेवढे अन्न मिळू न देणं, हे खूपच काळजी करण्यासारखं आहे. उपासमारीमुळे शरीर कृश होईल, पण चेहर्‍यावरची रया निघून जाईल. अशक्तपणा येईल आणि कामातला उत्साह निघून जाईल, याचा दीर्घकालीन परिणाम शरीराला भोगावा लागू शकतो. म्हणून चुकीच्या पद्धतीचे आणि चुकीच्या पद्धतीने काही खाऊ नका. ‘पी हळद हो गोरी’ अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टीचे ‘इन्स्टंट रिझल्ट’ मिळत नाहीत, त्याला काही कालावधी द्यावाच लागतो. बरं काही दिवस, आठवडे, महिने तुम्ही अन्नावर कंट्रोल ठेवाल, पण त्यानंतर पुन्हा पूर्वीसारखे खाणे सुरु होते आणि ‘अतिनियंत्रित’ खाण्यावरुन आपण ‘अनियंत्रित’ खाण्याकडे कधी वळलो हे आपल्यालासुद्धा कळत नाही. परिणामस्वरुप, पूर्वीपेक्षा आपले वजन अतिरिक्त वाढलेले दिसते, म्हणजे पूर्वी केलेली यातायात फुकट जाते. म्हणून योग्य सल्ल्याने जर आवश्यकता असेल, तरच ‘डाएट’ करा. आपल्यातील ‘फिटनेस’ महत्त्वाचा असतो. निसर्गाने काही तरी विचार करुनच आपल्याला घडवले आहे ना! वजन काट्यावर उभे राहून चिंताग्रस्त होण्यापेक्षा आणि झटपट वजन कमी करण्याच्या नादात आपण बरंच काही गमावतो. योग्य आहाराने आणि व्यायामाने काही काळानंतर एका मर्यादेपर्यंतच तुम्ही वजन कमी करा. वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपली मनोधारणा बदला आणि कोणत्यातरी कार्यात स्वत:ला गुंतवून घ्या.
 
सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे ती एकाच संसर्गजन्य आजाराची अर्थात कोरोनाची! चीनच्या या आजाराने जग चिंताग्रस्त झालंय. तेथील परिस्थिती किती भयावह होती, याची निव्वळ कल्पनाच केलेली बरी़ त्यामुळे कोरोनाला आपण गांभीर्याने घ्यायला हवे. एका कोरोनाचे पडसाद सर्वत्र अर्थव्यवस्थेवर, जनजीवनावर किती गंभीर परिणाम झाले आहेत, याची तुम्हाला कल्पना आहेच. कोरोनाचे चीनला असे पोखरणे किती वेदनामय असेल? एका व्यक्तीचा मृत्यू आपल्या मनाला उद्ध्वस्त करतो, इथे तर पे्रतांच्या राशी पडत असतील तर मन किती विदीर्ण होत असेल? किती करुण द़ृश्य असेल ते! प्रचंड मानवी संहार होताना पाहिलं की मनाच्या ठिकर्‍या ठिकर्‍या होतात. यामधून आपणही धडा घ्यायला हवा. वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता ही कसोशीने पाळायला हवी. वैयक्तिक स्वच्छता काही प्रमाणात बरी आहे, पण सामाजिक स्वच्छतेच्या बाबतीत आपली बोंबच आहे. प्रबोधन या द़ृष्टीनेही व्हायला हवे. कोरोना वा तत्संबधी आजार हे संसर्गामुळे होतात. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर आपण आपले संरक्षण केले पाहिजे. आपल्या आरोग्यासोबत आपण इतरांचाही विचार करायला हवा म्हणून सार्वजनिक ठिकाणी आपले वर्तन नियंत्रित असायला हवे. खोकताना, शिंकताना रुमाल वापरावा. उघड्यावर शौचास बसू नये. थुंकू वा खोकू नये. या सवयींना आळा घातला तर अनेक समस्या चुटकीसरखी सुटू शकतील. याची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासूनच करायला हवी. प्रत्येक मातेने हा संस्कार आपल्या मुलांवर करावा. शिक्षकांनी आदर्श वागण्यात सार्वजनिक स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. एकदा चांगले वळण पडले की, पुढे फारसे काही सांगावे लागत नाही. स्वयंशिस्त बाळगणार्‍या व्यक्ती पुढे जगभरात कुठेही गेल्या तरी आपली मूल्ये सोडत नाहीत. हा विषय फार गहन आहे. कारण, लोकसंख्या प्रचंड आहे. सगळ्यांना एका सूत्रात बांधणे अवघड असले तरी कठीण मात्र नक्कीच नाही. लोकजागृतीची आवश्यकता आहे, संयमाची कसोटी आहे.
 

- संजीव पेंढरकर

@@AUTHORINFO_V1@@