प्रामाणिक कष्ट हाच यशाचा मूलमंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020   
Total Views |
Eknath Dudhe_1  


कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि सच्च्या मेहनतीने केले की ते निश्चितच यशस्वी होते. पण, कामाप्रती श्रद्धा असणे महत्त्वाचे, असे मानणारे एक उद्योजक म्हणजे एकनाथ दुधे. त्यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा...


आज यशस्वी विकासक, बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून ते सुपरिचित आहेत. नुसती आर्थिकच नव्हे, तर माणुसकीच्या संस्कारांची श्रीमंती लाभलेल्या एकनाथ दुधे यांच्या यशाचे रहस्य काय असावे, ते त्यांच्याशी बोलूनच आम्ही जाणून घेतले. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील देगावचे दुधे कुटुंब. उकर्डाजी दुधे आणि बहिणाबाई दुधे यांना एकूण सात अपत्य, त्यापैकी एक एकनाथ. उकर्डाजी आणि बहिणाबाई शेजमजुरी करायचे. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. दोन वेळच्या अन्नाचीही मारामार. एकनाथही आपल्या आईवडिलांसोबत शेतात मजुरीला जात. गरिबीच्या अनुषंगाने येणारे सगळे दुर्दैव त्या घरात नांदत होते. उकर्डाजी आणि बहिणाबाई खूप प्रामाणिक आणि कष्टकरी. गावात सत्संग व्हायचे. दुधे कुटुंबही सत्संगी. अर्धपोटी, उपाशी तापाशी का होईना, ते मुलाबाळांना घेऊन सत्संगाला हजर. गावात सत्संग करणार्‍या साधुमहंतांना जेवण्यासाठी घरे वाटून दिली जायची. उकर्डाजी आणि बहिणाबाईं साधुंनी आपल्या घरी जेवावे, यासाठी त्यांना आमंत्रितही करत. अर्थात, घरात अन्नाचा तुटवडा. मग त्या दिवशी घरातले कुणीही जेवत नसे. स्वत: उपास करून कुटुंब साधुंना आग्रहाने जेऊ-खाऊ घालत. मात्र, त्यावेळी उकर्डाजी आणि बहिणाबाईंचा आनंद चेहर्‍यावर विलसत असे. धर्म, साधुसत्संग, सकारात्मक जगणे याचा असा संस्कार बालपणापासूनच एकनाथ यांच्या मनात खोलवर रुजत गेला.

एकनाथ लहाणपणापासून कष्टकरी. गावातली हागणदारी वर्षातून एकदा साफ केली जायची. ते काम उकर्डाजी आणि एकनाथ करत. दहा बारा बैलगाडी भरेल इतकी हागणदारीची माती ते शेतकर्‍यांना विकत. ज्यांना हागणदारी काय आहे, हे माहिती आहे त्यांना लहानगा एकनाथ हे काम कसे करत असेल, याबद्दल वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. पण, एकनाथ म्हणतात, “कष्टाला लाज नाही आणि थकवाही नाही.”


असो, पहिली ते सातवी एकनाथ गावच्याच शाळेत शिकले. पण, आठवीनंतर शिक्षणासाठी गावापासून चार किलोमीटर दूर असलेल्या शाळेत त्यांना जावे लागले. ते सकाळी लवकर उठून शेतमजुरीला जायचे. काम करताना हटकून दररोज उशीरच व्हायचा. तिथून अनवाणी मळलेल्या कपड्याने ते शाळेत पोहोचायचे. उशीर झाला म्हणून शाळेत दररोजचा मास्तरांचा मार ठरलेला.. पुस्तक नाही, वही नाही. शिक्षक जे बोलतील ते मन लावून एकायचे. तोच अभ्यास. दिवस असेच जात होते. शाळेत सहामाही परिक्षेचा निकाल लागला. एकनाथ यांना गणित आणि भूमितीमध्ये सगळ्या वर्गांमधून जास्त गुण मिळाले. त्यावेळी जे घडले, ते एकनाथ कधीही विसरले नाहीत.


त्यांचा निकाल बघून त्या विषयाचे शिक्षक म्हणाले, “तू...तू इतके गुण मिळवूच शकत नाहीस. नक्की कॉपी केली असशील किंवा काहीतरी केलेच असशील!” असे म्हणून त्या शिक्षकाने एकनाथ यांचे इतर विषयांचेही गुण तपासून पाहिले, तर ते सर्वच विषयात वर्गात प्रथम होते. त्यावेळी शिक्षकांची खात्री पटली की, फाटक्या-मळक्या कपड्यातल्या गरीब एकनाथनेच हे गुण मिळवले आहेत. त्यानंतर एकनाथ नेहमीच चांगले गुण मिळवत गेले. मात्र, इंग्रजीशी त्यांचे कधीही जमले नाही. बारावीला एकूण ६५ टक्के गुण असतानाही इंग्रजी या एका विषयात ते अनुत्तीर्ण झाले म्हणून बारावीला त्यांच्या माथी ‘नापास’ म्हणून शिक्का उमटला. आयुष्यात काय करायचे, याबाबत त्यांना सांगणारे-शिकवणारे कुणीही नव्हते. आईवडिलांनी केवळ प्रामाणिकपणा आणि कष्टाची शिदोरी दिली होती तेवढीच. मग काय, शेवटी एकनाथ यांनी सरळ मुंबई गाठली.


उरण येथे नातेवाईकांकडे राहून मिळेल ते काम करू लागले. अशातच त्यांना कळले की, तेथील तहसीलदार वसंत सपकाळ हे आपल्या गावचेच आहेत. ‘गावचा माणूस’ म्हणून एकनाथ त्यांना भेटायला गेले. सपकाळ यांनी तहसीलदार कार्यालयाच्या समोर उसाचा रस बनवण्याची एकनाथ यांना परवानगी दिली. आता खाण्यापिण्याची अडचण दूर झाली होती. मात्र, त्यांच्यावर आपल्या सहा भावंडांची जबाबदारी होती. त्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढायला हवेच, असे एकनाथ यांना वाटे. अशातच एकनाथ यांनी आपल्या भावंडालाही उरणला आणले. मुळचेच हुशार असलेल्या एकनाथ यांचा तहसील कार्यालयातील वावर वाढला. त्यामुळे कामाच्या नवीन संधींबाबत त्यांना कळू लागले. त्यातूनच त्यांनी रॉकेल वितरणाचे काम मिळवले. काम मिळाले, ते चालवण्यासाठी भावंडांना बोलवून घेतले. पुढे खाणीतले दगड फोडण्याचे काम त्यांनी मिळवले. दगड फोडण्याचे काम मिळाल्यावर ते आणि त्यांचे भाऊ स्वत: दगड फोडत असत.


पुढे पनवेलचा विकास होत असताना, शेतजमिनीवर इमारती उभ्या राहू लागल्या. ‘लॅण्ड डेव्हलपर’ म्हणून काम करण्याची संधी होती. पण, एकनाथ यांच्याकडे शेतजमीन विकत घ्यायला तरी पैसे कुठे होते? पण, इच्छा मात्र होती. त्यांनी समोरच्या माणसाला प्रामाणिकपणे सांगितले की, ‘’तू मला मदत कर, मी तुला त्यातला नफा देईन.” पहिलेच काम खूप, त्यात तणाव. पण, त्यातही मेहनत करून त्यांनी जमीन विकासकाचे काम यशस्वी केले. मदत केलेल्या माणसाला मिळालेल्या नफ्याचा वाटा दिला. दिलेला शब्द पाळला. भागीदारीत, उद्योगात दिलेला शब्द पाळणे हा एकनाथ यांनी व्यवसायाचा मंत्र ठेवला. आज शेकडो कोटींची उलाढाल करणारे एकनाथ मात्र स्वत:वर संतांच्या शिकवणीचा प्रभाव आहे, असे मानतात. संत गजानन महाराज आणि संत तुकडोजी महाराजांनी सगळे आयुष्य समाजासाठी वाहिले, तर आपणही समाजाचा विचार करायला हवा, असे ते मानतात. त्यासाठी गरजूंना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. समाजात सकारात्मकता यावी, यासाठी प्रामाणिकपणा आणि कष्टाचे संस्कारच उपयोगी पडत असल्याचा जीवनाचा आणि यशाचा मूलमंत्र ते देतात.


@@AUTHORINFO_V1@@