मानसिक स्थिती जपणे आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |
corona_1  H x W
 
मानसिक स्थिती जपणे आवश्यक
 
सध्या जगभर कोरोना विषाणूने दहशत माजवली आहे. अशावेळी कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच कोरोनाच्या भयामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या रुग्णांची वाढणारी संख्या हादेखील आता चिंतेचा विषय ठरत आहे. मागील काही आठवड्यांत देशात मानसिक रुग्णांची संख्या २० टक्क्यांनी वाढली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचे आवाहन जगभरातील नागरिकांना केले आहे. ‘इंडियन सायकियाट्रिक सोसायटी’मार्फत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर देशात मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या पीडितांची संख्या 15 ते २० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. वैश्विक महामारी हे त्याचे खरे कारण आहे. ‘लॉकडाऊन’मुळे लोकांमध्ये व्यवसाय-उद्योग, नोकरी, कमाई, बचत आणि इतकेच नव्हे, तर मूलभूत संसाधने गमावून बसण्याची भीती असल्याचे कारणदेखील समोर आले आहे. कोरोनामुळे एकांतात ठेवण्यात आलेल्या काही नागरिकांच्या मनात भीती आणि एकटेपणाची भावना वाढीस लागली असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत आपण सर्वांनीच आपले मानसिक स्वास्थ्य टिकविणे आवश्यक आहे. यासाठी अस्सल भारतीय परंपरेतील योग, ध्यानधारणा, प्राणायाम यांचा उपयोग नक्कीच होऊ शकतो, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जागतिक संकट काळात आपण स्वतःहून अधिक विचार करून आपले मानसिक आरोग्य खराब करून घेणे, हे कधीही उचित नाहीच. याचे भान या काळात राखले जाणे आवश्यक आहे.
मानसिक आरोग्य बिघडण्यात आपल्या भविष्याची चिंता सतावणे हेदेखील एक कारण समोर आले आहे. अशा वेळी नागरिकांना भविष्याबाबत आश्वस्त करणे, तशा उपाययोजनांची माहिती देणे हे सरकारी पातळीवरून होणे आवश्यक आहे. तसेच, कोरोनासंबंधी नकारात्मक बातम्या न देता दिलासादायक बातम्या प्रसिद्ध करणे आणि सध्याची नेमकी आणि खरी स्थितीच समाजासमोर मांडणे हे कार्य प्रसारमाध्यमांकडून होणे या काळात नक्कीच अभिप्रेत आहे; अन्यथा मानसिक आरोग्याबाबतची वेगळीच समस्या आपणासमोर आगामी काळात उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
आता तज्ज्ञही सरसावले
 
 
सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस यांच्या कार्याचे निश्चितच कौतुक आहे. मात्र, कोरोनानंतर मानसिक आरोग्याचा सामना करावा लागू नये यासाठी आता मानसोपचारतज्ज्ञदेखील सरसावले आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यदेखील कौतुकास पात्र ठरत आहे. कोरोनाच्या वाढत्या दहशतीमळे जगभरात सर्वत्र हाहाकार माजला आहे. राज्यात नाशिकमध्येही कोरोनाच्या रुग्णाचे निदान झाल्याने या भीतीमध्ये भर पडली आहे. परिणामी, सामान्य नागरिक कोरोनाला घाबरून डॉक्टरांकडे गर्दी करत आहेत. त्यामुळे संचारबंदीच्या काळात निर्माण झालेला मानसिक ताण व दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामाची तीव्रता लक्षात घेता, राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालय व राज्य मानसिक आरोग्य जनजागृती समितीने तज्ज्ञांमार्फत कोरोना विषाणूसंबंधी ऑनलाईन हेल्पलाईनद्वारे मोफत शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संपूर्ण राज्यात 121 तर नाशिकसाठी दोन तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहे. कोरोनाविषयी वृत्तांमुळे जनतेत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सामान्यतः सर्दी, खोकला असलेली व प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले नागरिकही डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी रांगा लावतानाचे चित्र सध्या दिसून येत आहे. विविध माध्यमातून कोरोनाच्या वृत्तांताबाबत सर्वसामान्यांवर होणारा मारा हे ‘कोरोना फोबिया’मागचे महत्त्वाचे कारण आहे. शिवाय, प्रत्येकाच्या हातात असलेले स्मार्टफोनही घातक आहेत. सोशल मीडियामुळे कोरोनाबाबत गैरसमज वेगाने पसरत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घाबरू नका, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, ऐकीव माहिती, अफवांवर विश्वास ठेवू नका, लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता मान्यताप्राप्त डॉक्टरांचा सल्ला घ्या व गरज भासली तरच जवळच्या सरकारी दवाखान्यात कोरोनाच्या निदानाची तपासणी करून घ्या, असे आवाहन आता करण्यात येत आहे.
मनाचे भेदरलेपण आणि सामाजिक स्थिती यामुळे गोंधळात पडलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे मदत उपलब्ध करून देणे, हे सामाजिक स्वास्थ्याचे उत्तम लक्षण म्हटले तर वावगे ठरणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@