‘लॉकडाऊन’च्या आड लोकशाहीवर प्रहार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |
 
narendra modi_1 &nbs
 
 
 
 
सध्या लोकनियुक्त सरकारविरोधातच लोकांना भडकविण्याचे हरतर्‍हेने प्रयत्न केले जात आहेत. आता ही परिस्थिती आणि दिल्लीत नुकतीच झालेली धार्मिक दंगल याचा एकत्रितपणे विचार करता असे दिसते की, सरकार अस्थिर करण्यासाठी याच तंत्रांचा अवलंब करण्यात आला होता. आणखी खोलात गेल्यास स्पष्टपणे दिसेल की, त्यामागे कथित बुद्धिजीवी, पुरोगामी आणि सुशिक्षित जागरुक लोकांचाच हात आहे.
 
 
एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा आणि खरे मनसुबे जाणून घ्यायचे असतील तर जीवन आणि मृत्यूशी संबंधित संकट, हा त्यासाठी सर्वोत्तम काळ असतो. याच काळात आपल्या खर्‍या स्वभावाचे दर्शन घडत असते. सध्या आपल्या देशात एकीकडे बिनडोक ट्रोल आणि गुंड आहेत, ज्यांचे एकमात्र काम आपल्या कट्टरतावादी विचारांचा प्रसार करणे हेच आहे. दुसरीकडे बौद्धिक आणि वैचारिकदृष्ट्या जागरूक समुदायाचा एक मोठा हिस्सा मोदीद्वेषाने ग्रस्त आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन परस्परविरोधी विचारधारांसोबत तुम्ही कसे संवाद साधू शकता, त्यातून सत्य कळेल का, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे.
 
 
जीन शार्प या अमेरिकी राज्यशास्त्रज्ञाने ‘सरकार कसे पाडावे’, याविषयी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी एका पुस्तकात त्यांनी अहिंसक आणि लोकशाही पद्धतीने सरकारला कसे झुकवावे आणि पाडावे, याची 198 तंत्रे सांगितली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारविरोधात चालविल्या जाणार्‍या आंदोलनांमध्ये भाषा ही शांततेची आणि लोकशाहीचीच हवी. मात्र, त्याद्वारे संपूर्ण व्यवस्थाच कशी ठप्प होईल, याची काळजी घेतली जावी आणि सरकारला बळ देणारी व्यवस्था एवढी कमकुवत करावी की, अखेरीस सरकार कोसळेल. इजिप्तमध्ये तहरीर चौकातील आंदोलनात यापैकी काही गोष्टी वापरण्यात आल्या होत्या, तर युके्रनमध्येही रशियाविरोधात असेच करण्यात आले होते. त्याचप्रमाणे याच तंत्रांचा वार करून हाँगकाँगमध्ये ७६ दिवस अराजक पसरविण्यात आले होते. यामध्ये पुढील प्रकारच्या तंत्रांचा समावेश आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांवर दगडफेक करणे, त्यांचे मार्ग उद्ध्वस्त करणे, रस्ते रोखून धरणे, अग्निशमन दलाच्या बंबांना आग लावणे, जेणेकरून अन्य ठिकाणी आग विझवण्यास ते जाऊ शकणार नाहीत. मोर्चा अथवा आंदोलनात महिला आणि लहान मुलांना उभे करणे, त्यासोबतच अ‍ॅसिड बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब फेकणे, नकारात्मक अजेंड्यास रेटण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर करणे, फेक न्यूजचा प्रचार आणि प्रसार करणे, लोकांची दिशाभूल करणे, त्यांना लोकनियुक्त सरकारविरोधातच भडकविण्याचे हरतर्‍हेने प्रयत्न केले जातात.
 
 
आता ही परिस्थिती आणि दिल्लीत नुकतीच झालेली धार्मिक दंगल याचा एकत्रितपणे विचार करता असे दिसते की, सरकार अस्थिर करण्यासाठी याच तंत्रांचा अवलंब करण्यात आला होता. आणखी खोलात गेल्यास स्पष्टपणे दिसेल की, त्यामागे कथित बुद्धिजीवी, पुरोगामी आणि सुशिक्षित जागरुक लोकांचाच हात आहे. जीन शार्प यांनी सरकार पाडण्यासाठी जी तंत्रे सांगितली आहेत, त्यापैकी किमान 70 ते 80 तंत्रांचा अवलंब दिल्लीतील घटनांमध्ये थेट करण्यात आला आहे. दिल्लीत जे काही झाले, त्याचा आणि ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’शी (सीएए) आणि मुसलमानांशी काहीही संबंध नाही, हे सर्वप्रथम ध्यानात घ्यावे. त्याचप्रमाणे आपल्या देशाचा आकार आणि लोकसंख्येस पाहता धर्मनिरपेक्षतेविषयीदेखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची गरज नाही. फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश आणि मुघलांच्या आक्रमणानंतरही भारताने केवळ आपले अस्तित्वच नव्हे, तर धर्मनिरपेक्ष संस्कृतीही जपली आहे. त्यामुळे कथित कट्टरतावादी हिंदुत्ववाद्यांचे भय या देशाला अजिबात नाही. मोठी चिंतेची बाब म्हणजे, या राष्ट्राला दशकांपासून लुटण्यात आले, अनेक दशके ‘तिसर्‍या जगातील राष्ट्र’ म्हणून राहण्याची वेळ आणली गेली. दशकानुदशके येथे भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाचे वर्चस्व राहिले. त्याहूनही भयावह म्हणजे सुशिक्षित, समजदार आणि बुद्धिजीवी म्हणवणारेही चुकीच्या माहितीच्या आहारी जात आहेत. एक गोष्ट मी नक्कीच मान्य करते, ती म्हणजे भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या स्वार्थासाठी कोणाचेही ट्रोलिंग करण्याची क्षमता असणार्‍यांची संख्या वाढली आहे. मात्र, त्याहून भयानक म्हणजे पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी जो राजकीय खेळ खेळला जात आहे, तो भारताच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वासाठी अतिशय धोकादायक आहे.
 
 
 
नेतृत्वाविषयी जुजबी माहिती असणार्‍या कोणाही व्यक्तीस हे ठाऊक असते की, नेता होण्यासाठीचा पहिला नियम म्हणजे आपल्या सहकार्‍यांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणे. मग तो सहकारी कितीही बेजबाबदार असो. कारण, नेतृत्व म्हणजे सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे हे ज्याला समजते, त्याला माहिती असते की, आपसात कितीही मतभेद असो, मात्र आपल्या चुकीसाठी सहकार्‍यांना दोषी ठरवायचे नसते. त्यांच्या कमतरता लपवून पुढे जायचे असते. मात्र, आपल्या देशात याचा अनेकांना विसर पडला आहे.
 
 
त्यामुळे काही लोकांकडून मोदींचा एवढा द्वेष का केला जातो, याचे उत्तर शोधायचा मी प्रयत्न केला असता काही गोष्टी माझ्या ध्यानात आल्या. भारत दशकांपासून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या जाळ्यात अडकला होता आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी मोदी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील उदाहरण देते. माझ्या वडिलांनी मुंबईत 1998 साली ‘गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट’ म्हणून आपल्या वैद्यकीय कारकिर्दीस प्रारंभ केला. भारतात एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा वापर सुरू करणारे ते पहिलेच. त्यांनी 12 हजार रुपये मासिक वेतनापासून सुरुवात केली आणि मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गॅस्ट्रोएंट्रोलॉजी इस्पितळ उभे करण्यापर्यंत त्यांनी प्रवास केला. मात्र, त्यांचा हा प्रवास सोपा नाही. अनेक वर्षांपासून त्यांना डॉक्टर समुदायाने जवळपास वाळीत टाकल्यासारखे केले आहे. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यांचा सामना करावा लागला आहे. एवढेच नव्हे, तर एकदा त्यांच्या सहकार्‍याला मारण्यासाठी काही गुंडांनाही पाठविण्यात आले होते. असे झाले कारण, त्याचे कारण म्हणजे माझ्या वडिलांनी नेहमीच रुग्णांना प्राधान्य दिले. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा भागीदार होण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे एखादा व्यक्ती अशा परिस्थितीतही यश मिळवित असेल तर ते सहन न होणे हा तर मानवी स्वभाव आहे आणि तो व्यक्ती एखाद्या लहान शहरातून किंवा निम्न आर्थिक स्तरातून आलेला असेल तर द्वेष आणखीनच वाढतो.
 
 
भारताच्या विद्यमान परिस्थितीशी याचा निकटचा संबंध आहे. भारताच्या 90 टक्के जनतेचे प्रतिनिधीत्व करणारा नेता गेल्या अनेक वर्षांपासून लाभला नव्हता. निम्न आर्थिक स्तराचे प्रतिनिधीत्व करणारा, चहा विकणारा, सर्वसामान्य भारतीयांची भाषा बोलणारा आणि समजणारा नेता लाभलाच नव्हता. पंतप्रधान मोदींचे स्पष्ट मत आहे की, भारतात सुधारणा घडविण्यासाठी कायद्याची नव्हे, तर आंदोलनांची, अभियानांची गरज आहे. मोदींनी आतापर्यंत देशात जे काही केले आहे, ज्या गतीने परिवर्तन घडविले आहे, ते अतिशय कौतुकास्पद आहे. मात्र, अद्याप आर्थिक पातळीवर हवे तसे यश मिळालेले नाही. अर्थात, त्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना केल्या असून त्या प्रभावी ठरणार की नाहीत, हे आता वेळच सांगेल. मात्र, कोरोना प्रकोपानंतरही वेगवान विकास शक्य असणारी एकमेव अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्था आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. कारण भारतीय अर्थव्यवस्था ही 90 टक्के आत्मनिर्भर आहे.
 
 
 
मी नुकतीच एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर आणि लेखक असलेले डॉ. शरद ठकार यांची गुजरातीमधील एक ऑडिओ क्लिप ऐकली. त्यामध्ये डॉ. ठकार आणि मोदी यांची कोरोनापूर्व परिस्थितीवरील चर्चाही आहे. डॉ. ठकार यांनी मोदींना विचारले की, “सध्या तुम्ही काय करीत आहात ?,” आता असा प्रश्न विचारल्यावर सामान्यपणे कोणीही उत्तर देईल की,“मी ठीक आहे.” मात्र, मोदी काही क्षण थांबले आणि अतिशय गंभीरपणे म्हणाले की, “मी सध्या साधना करत आहे.” “कोणत्या प्रकारची साधना?”, असे विचारले असता मोदी म्हणाले की, “झोपेवर नियंत्रण मिळविण्यासाठी साधना.” डॉ. ठकार त्यावर म्हणाले की, “तुम्ही फार कमी झोप घेता, असे मी ऐकले आहे. तर मग आणखी किती झोप कमी करणार आहात?” त्यावरही मोदी गंभीरपणे म्हणाले की, “मला झोप पूर्णपणे सोडायची आहे.” आता अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. डॉ. ठकार यांनी मोदींना आणखी एक प्रश्न विचारला, “आपण असे का आणि कोणासाठी करू इच्छित आहात?” त्यावर मोदी म्हणाले की, “राष्ट्रासाठी आणि गरिबांसाठी. हे एक महान राष्ट्र आहे, मात्र आमची अतोनात लूट झाली आहे. त्यास पुन्हा पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी 20 तास कामही कमी आहे, त्यासाठी मला पूर्ण 24 तास हवे आहेत.”
 
 
 
पुढे डॉ. ठकार यांनी मोदींनी हिमालयात घालविलेले दिवस आणि त्यांच्या ‘व्हिजन’विषयीदेखील संवाद साधला. मोदी त्यांना म्हणाले की, “मला साधू न व्हायचा आणि देशसेवा करण्याचा संदेश मिळाला आणि म्हणून मला हिमालयातून पुन्हा परत यावे लागले.” डॉ. ठकार यांनी विचारले की,“सध्या तुमच्या जीवाच्या मागे अनेक लोक लागले आहेत, हिटलिस्टवर तुम्ही अग्रस्थानी आहात, त्याची भीती वाटत नाही का?,” त्यावर मोदींचे उत्तर होते, “देशसेवा करणे हे माझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणीही माझा जीव घेऊ शकत नाही आणि एकदा माझे उद्दिष्ट पूर्ण झाले की, कोणी मला वाचवूही शकत नाही आणि मी मृत्यूला घाबरत नाही.” डॉ. ठकार म्हणाले की, “मी कोणत्याही व्यक्तीच्या मागे अंधपणे जात नाही. आपण माठ खरेदी करतो, तेव्हा चारही बाजूंनी वाजवून बघतो की पक्का आहे की कच्चा आणि इथे तर अशी व्यक्ती आहे, ज्याला अनेकवेळा आजमावून पाहण्यात आले आहे. मोदींना केवळ एकच नव्हे, तर 130 कोटी लोकांनी व्यवस्थित आजमावून पाहिले आहे आणि ते अजूनही मोदींसोबत विश्वासाने उभे आहेत. म्हणजेच मोदी काही लेचेपेचे नेते नाहीत, हे सिद्ध झाले आहे आणि अशी व्यक्ती देशाच्या नेतृत्वपदी असणे, अतिशय महत्त्वाचे ठरते.”
 
 
 
चीनच्या हुबेई प्रांतात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनांचे व्हिडिओज आणि ट्विट चिनी सरकारकडून हटविण्यात आले, तर भारतात मात्र स्थलांतर करणार्‍या कामगारांचे व्हिडिओ आणि त्यावरून सरकारवर टीका करणारे ट्विट्स आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे काही लोक दावा करतात तेवढे जर फॅसिस्ट सरकार भारतात असते, तर असे काही करायचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळाले असते का? मोदी सरकारला सत्तेत येऊन सहा वर्षे झाली आहेत आणि जर त्यांना ‘फॅसिस्टशाही’ लागू करायची असती तर ते एव्हाना झालेही असते. अमेरिकेत राहणार्‍या माझ्या एका मित्राने मला विचारले की, “नताशा, जगभरात सरकारचा निषेध करणारे लोक मी पाहिले आहेत. मात्र, भारतात ट्विटरवर ज्या पद्धतीने आणि ज्या नीचतम पातळीवर उतरून सरकारचा निषेध केला जातो, ते जगात अन्यत्र कुठेही दिसत नाही.” भारतात ट्विटरवर प्रचंड नकारात्मकता पसरविली जाते. आजही हे विरोधाचे ट्विट्स मोठ्या प्रमाणावर ‘ट्रेंड’ करीत आहेत. जवळपास 4.5 अब्ज लोक इंटरनेटचा वापर करतात आणि जर तुम्ही त्यांची अशी दिशाभूल करीत असाल, सरकार सक्षम नाही, असा विचार पसरवित असाल, तर अराजकता पसरविण्याचे तुमचे अर्धे काम तेथेच झाले, असे समजा.
 
 
 
जीन शार्प म्हणतात की, “काही व्यवस्था सरकारला बळकटी देतात, तर काही कमकुवत करतात आणि त्यासाठी तुम्हाला प्रसारमाध्यमांचा वापर करण्याची आवश्यकता असते.” त्यामुळे अनेकांनी जग्गी वासुदेव (सद्गुरू) आणि अन्य आध्यात्मिक व्यक्ती व संस्था यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. जग्गी वासुदेव यांचे कार्य खोडून काढता येत नसल्याने एका विशेष वर्गातील लोकांनी त्यांच्याविरोधात घाणेरड्या राजकारणास प्रारंभ केला आहे.
 
 
हे एक उदाहरण झाले. मात्र, ट्विटरवर असे अनेक लोक आहेत, जे काहीही न वाचता, विचार न करता एखादे ट्विट केवळ रिट्विट करतात. कारण, त्यांच्यामध्ये द्वेष ठासून भरलेला असतो. रिट्विट करणार्‍या अनेकांना तर त्यासाठी पैसाही मिळत असतो. काही लोकांना उगाच मसालेदार बातम्यांमध्ये रस असतो. ट्विटरवर एखादे ट्विट ट्रेंड करण्यासाठी 25 जणांचा समूहदेखील पुरेसा असतो. जेव्हा भारतात सायंकाळपासून रात्रीपर्यंत नकारात्मक विषयांवर ट्विट केले जातात, तेव्हा पाश्चिमात्य जगातील देश जागे असतात आणि तेदेखील त्या विषयांवर व्यक्त होऊ लागतात. त्यामुळे खोट्या प्रचारास बळ मिळू लागते. शिकले-सवरलेले बुद्धिवादी, उशिरापर्यंत जागरण करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी हे त्यांच्यासाठी सोपे लक्ष्य असतात.
 
 
आज ‘लॉकडाऊन’चा नववा दिवस आहे. भारतात आता जवळपास तीन हजार कोरोनाबाधित झाले आहेत. त्या दरम्यान, हजारो मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी पायीच निघाले असताना, संपूर्ण देश कोरोनाचा सामना करण्यासाठी कंबर कसत असताना देशातील बुद्धिजीवी, पुरोगामी आणि धूर्त राजकारण्यांमुळे देशासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. गेल्या आठवड्यात देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधानांनी हात जोडून व्यापारी, उद्योगपती यांनी कठीण काळात आपल्या कर्मचार्‍यांचे वेतन कापू नये, अशी विनंती केली होती. मात्र, दुसरीकडे या तीन आठवड्यांसाठी माझ्या घरातील मोलकरणीला फुकटचा पगार कोण देणार? तुम्ही देणार आहात का की पंतप्रधान ते करणार आहेत, ती अगदी चांगल्या अवस्थेत आहे, तिला काहीही झालेले नाही. ती कामावर येणारच, असा एका महिलेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दुर्दैवाने असे म्हणावे लागते, भारतात अशा असंवेदनशील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
 
 
 
सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळा आणि जेथे आहात, तेथेच राहा हेदेखील हात जोडून मोदींनी सांगितले. असे असतानाही दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही चूक तर झाली नाही ना, हा विचार मनात येणे स्वाभाविक आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करायला हवा होता. आता हे मान्यही करूया. मात्र, आपल्याकडे वेळ नव्हता आणि त्यामुळे तातडीने ‘लॉकडाऊन’ करणे गरजेचे होते, हे समजून घेणे आवश्यक आहे. खरे तर कोरोनासारख्या महासाथीचा सामना करण्यासाठी अशाच प्रकारच्या क्रमाने घोषणा करणे गरजेचे होते. ‘लॉकडाऊन’ काही काळ आधीच लागू केले असते तर आपण सर्व अधिक काळजीत पडलो असतो आणि जर याची घोषणा काही काळ उशिरा केली असते तर परिस्थिती आपल्या हातातून निसटून गेली असती, हे विसरता कामा नये.
राहिला प्रश्न मजुरांचा. तर त्यांच्यासाठी दिल्लीतील मैदानांमध्ये तात्पुरती व्यवस्था नक्कीच करता आली असती. मात्र, हे तुम्हालाही मान्य करावे लागेल की, पंतप्रधानांच्या संबोधनानंतर कोणत्याही प्रकारच्या अव्यवस्थेची अपेक्षा कोणीही केली नव्हती. विपरित परिस्थिती ध्यानात घेऊन सरकारने अत्यावश्यक वस्तू व सेवांचा अविरत पुरवठा, आर्थिक पॅकेजची घोषणा, वैद्यकीय सेवा व उपकरणांची जमवाजमव आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात कोणताही कसर सोडली नव्हती. चीनला हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यास दहा दिवस लागले, तर भारतीय रेल्वेने रातोरात रेल्वे डब्यांचे रूपांतर सहा हजार खाटांच्या कक्षामध्ये केले. भारतासारख्या देशात महामारीचा सामना करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अभूतपूर्व अशा आहेत.
 
 
 
खरे तर मजूर मोठ्या प्रमाणात दिशाभूल आणि ‘फेक न्यूज’चे बळी ठरले आहेत. दिल्लीतील आनंद विहार येथून गंतव्यस्थानी जाण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची ‘फेक न्यूज’ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली होती आणि त्यामुळे संपूर्ण गोंधळ निर्माण झाला. हे सर्व जीन शार्प यांनी सांगितलेल्या सरकार पाडण्याच्या 101 तंत्रांप्रमाणेच घडले आहे. अफवा पसरविण्यात आल्या आणि अराजकता पसरविण्यासाठी दहशत निर्माण केली गेली. महासाथीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशाचा आकार, लोकसंख्येची घनता आणि जनतेची समज ध्यानात घेऊन जे काही करता येण्यासारखे होते, ते सर्व केले आहे. मात्र, दुर्दैवाने त्यावर चर्चा होत नाही. मोदी सरकार अपयशी व्हावे, यासाठी राजकीय मंचावर अनेक शक्ती कार्यरत आहेत, हे दिल्लीच्या घटनेने सिद्ध केले आहे. मोदी सरकार अपयशी झाले पाहिजे, त्यासाठी राष्ट्र आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारची किंमत मोजावयास लावण्याची त्या शक्तींची तयारी आहे.
 
 
 
भारतीय राजकारणात सध्या जे काही घडते आहे, ते केवळ राजकीय विश्वासाठीच नव्हे, तर मानवतेसाठीही मोठे संकट आहे. आरोग्य सेवांच्या मर्यादा, तुलनेने कमी प्रमाणात असलेले (मात्र आता परिस्थिती सुधारली आहे) चाचणी किट्स, गरिबी, सार्वजनिक शिस्तीचा अभाव आणि वैज्ञानिक दृष्टी नाकारणारी लोकसंख्या अशी अनेक आव्हाने असतानाही मोदी सरकारने गेल्या एक आठवड्यात परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जे काही केले आहे, ते अविश्वसनीय आणि अभूतपूर्व आहे. यापूर्वीदेखील अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जगातील शक्तिशाली नेत्यांसमोर मोदींनी पर्यावरण रक्षणासंबंधी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मानवी जीवन अर्थव्यवस्थेपेक्षा महत्त्वाचे आहे, हे विकसित देशांना त्यांनी समजावण्याचे प्रयत्न केले आहेत. त्याच सिद्धांतानुसार मोदींनी सध्या आवश्यक ते निर्णय घेतले आहेत. असे असतानाही ट्विटरवर ‘ModiMadeDisaster' असा ‘ट्रेंड’ चालवून मोदींनीच भारताला कोरोना महासाथीच्या गंभीर टप्प्यावर आणल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
 
 
 
भारतातील विरोधी पक्ष पूर्णपणे नैराश्यात आहे, हेदेखील आता स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे अपयशी विरोधक मोदींच्या चांगल्या कामांना निरर्थक सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत, हेदेखील पुढे आले आहे. मोदींची प्रतिमा मलीन करण्यासाठी ते मानवी जीवनाचीही पर्वा करत नाहीत. आज लोकांचे मृत्यू होत आहेत, माणूस जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान अडकला आहे. ही वेळ देशासोबत उभे राहण्याची आहे. मात्र, विरोधक आताही मोदींना कमी लेखण्यासाठी देशातील सर्वाधिक कमकुवत वर्गाचा वापर करत आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांना मत दिले, हे तेच राक्षस आहेत, हे विसरू नका.
 
 
राष्ट्रवादी असणे म्हणजे काय, हे मला आता व्यवस्थित समजले आहे आणि खरे राष्ट्रविरोधी कोण, हेदेखील ध्यानात आले आहे. त्यामुळे मला आज माझ्या नेत्याचा अभिमान वाटतो. विपरित परिस्थितीतही संयम, हिंमत आणि धैर्य राखणे आणि विजय मिळविणे हे मोजक्याच लोकांना साधते. त्यामुळे, पंतप्रधान मोदी यांनी कोरोना महासाथीचा सामना करण्यासाठी आणि आपण सर्व भारतीयांच्या सुरक्षेसाठी जी काही पाऊले उचलली आहेत, त्यासाठी मी मोदींचे आभार मानते. त्यासोबतच मला लाजही वाटते की, आजपर्यंत माझे डावे आणि कथित लिबरल मित्र काय म्हणतील, याचा विचार करून मी मोदींना पाठिंबा दिला नव्हता. मात्र, आता मी सार्वजनिकरित्या मोदी सरकारला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करते. त्यासाठी तुम्ही मला ‘भक्त’ म्हणू शकता, सोशल मीडियावर माझ्याविरोधात बहिष्काराचे आवाहन करू शकता; मात्र मला आता त्याची पर्वा नाही.
 
 
(नताशा राठौर या हिंदी चित्रपटसृष्टीशी निगडित असून शाहरूख खान अभिनित लोकप्रिय चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यावरील त्यांचा माहितीपट चर्चिला गेला आहे. नताशा राठौर यांनी लंडन फिल्म स्कूलमधून शिक्षण घेतले असून भारतीय सिनेमाच्या त्या अभ्यासक आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून त्यांनी प्रथमच राजकीय विषयावर लिखाण केले आहे. कोरोना महामारी आणि राजकीय घटनांविषयी त्यांनी ट्विटरवर काही ट्विट्स केले होते, त्यांना एकत्रित करून त्यास लेखाचे स्वरूप देण्यात आले आहे. त्यांचे सर्व ट्विट्स हे अभ्यासपूर्ण आणि तथ्यांवर आधारित आहेत.)
 
 
 
नताशा राठौर 
(अनुवाद : पार्थ कपोले)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@