‘मिस इंग्लंड’ बनली ‘आरोग्यदूत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Bhasha mukharjee_1 &


२०१९चा ‘मिस इंग्लंड’ किताब जिंकणारी इंग्लंडस्थित भारतीय वंशाच्या भाषा मुखर्जी या तरुणीने इंग्लंडमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया तिच्या कार्याविषयी...


काही दिवसांपूर्वीच आपण एक बातमी ऐकली की, आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर स्वत: कोरोना विषाणू विरोधातील लढाईत उतरले आहेत. देशवासीयांच्या रक्षणासाठी त्यांनी पुन्हा डॉक्टर म्हणून आपली सेवा देण्याचा निर्णय घेतला. राजकारणात येण्यापूर्वी ते डॉक्टर होते आणि देशातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतला. सोशल मीडियावर त्यांचे कौतुकही झाले. यावेळी सर्वांची एकच भावना होती, अशा गंभीर काळात प्रत्येक देशाला अशा नेत्याची गरज आहे.


असाच निर्णय आता भारतीय वंशाच्या भाषा मुखर्जी हिनेदेखील घेतला आहे. इंग्लंडस्थित भाषा ब्रिटिशांसाठी आरोग्यदूत बनली आहे. ती आता इंग्लंडमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होणार असून, कोरोना रूग्णांवर उपचार करणार आहे. ‘मॉडेलिंग’च्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी भाषा मुखर्जी हिने कनिष्ठ डॉक्टर म्हणून काम केलेले आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहून तिने वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच भाषा एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अन्य देशांच्या यात्रेसाठी भारतात आली होती. त्या दरम्यान तिने रस्त्यावर भीक मागणार्‍या लहान मुलांसाठी काही देणग्या जमा केल्या व त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या दिल्या. ती आणखी काही दिवस भारतात राहणार होती. परंतु, तिला इंग्लंडमध्ये कोरोनाच्या वाढत्या साथीबद्दल माहिती मिळाली.

त्यानंतर मात्र भाषाने ती सुरुवातीला ज्या रुग्णालयात कनिष्ठ डॉक्टर म्हणून कार्यरत होती त्या रुग्णालयाशी संपर्क साधला व त्वरित इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट २०१९ मध्ये ‘मिस इंग्लंड’चे विजेतेपद जिंकल्यानंतर तिने वैद्यकीय व्यवसायाला राम राम ठोकत ‘मॉडेलिंग’ क्षेत्रात कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाषा म्हणते की, तिला हा निर्णय घेणे फार कठीण नव्हते. मी आफ्रिका, तुर्कीला जाऊन आले. ज्या आशियाई देशांच्या दौर्‍यावर मी जाणार होते त्यापैकी पहिला भारत होता. मात्र, कोरोनामुळे इतर देशांमध्ये न जाण्याचा मी निर्णय घेतला आणि यावेळी मी ठरवले होते, माझ्यासाठी दवाखान्यात परत जाण्याचा निर्णय हाच योग्य आहे.”
२४ वर्षीय भाषाचा जन्म भारतातील कोलकाता शहरात झाला. मात्र, वयाच्या नवव्या वर्षी ती परिवारासोबत इंग्लंडला गेली. तेथूनच तिने वैद्यकीय शिक्षण घेतले. ती सांगते, “मॉडेलिंग क्षेत्रात माझी कारकिर्द तेव्हाच सुरू झाली होती जेव्हा मी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते.” भाषाला अभ्यासाबरोबरच मॉडेलिंग या क्षेत्रात अधिक रुची होती. पण तिने ठरवले होते की, अभ्यास आणि आवड या दोन्ही क्षेत्रांचा समतोल साधायचा. शाळेत ती शिक्षकांची सर्वात प्रिय विद्यार्थिनी होती. तिच्या वर्गातील सर्वात वेगवान आणि हुशार विद्यार्थी म्हणून तिला ‘आईन्स्टाईन पुरस्कारा’नेदेखील गौरविण्यात आलेले आहे.

भाषा दोन विषयांमध्ये पदवीधर आहे. प्रथम तिने मेडिकल सायन्स विषयामध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर तिने औषधोपचार आणि शस्त्रक्रिया या विषयांमध्ये पदवी घेतली. तिचे पदवीचे शिक्षण नॉटिंगहॅम विद्यापीठातून झाले आहे. तिला हिंदी, इंग्रजी, बंगाली, जर्मन आणि फ्रेंच अशा पाच भाषा अवगत आहेत. ‘मिस इंग्लंड’चा किताब जिंकल्यानंतर, ती विविध सेवाभावी संस्थांसाठी राजदूत म्हणून काम पाहत आहे आणि यामुळे तिला जगातील बर्‍याच ठिकाणी प्रवास करावा लागतो. वैद्यकीय शिक्षण पूर्ण होताच ती बोस्टनमधील पिलग्रीम हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ डॉक्टर म्हणून कार्यरत झाली होती. ती श्वसनविषयक रोगांची तज्ज्ञ आहे. म्हणून तिने कोरोना या आजाराशी लढणार्‍या रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ती सांगते, “आज संपूर्ण जग कोरोनाशी लढते आहे. अशावेळी माझ्यासारख्या डॉक्टरांची रुग्णांना गरज आहे. अशावेळी मी माझ्या सौंदर्यासाठीचा मुकुट चढवून काय करू. आता तो मुकुट उतरवून मी रुग्णसेवा करण्यासाठी तयार आहे. त्यातच माझं खरं सौंदर्य आहे.”

भाषा इंग्लंडला परतली असून आता पुढील १४ दिवस ती घरीच ‘क्वारंटाईन’ राहणार आहे. हा अवधी संपताच ती वैद्यकीय सेवेत रुजू होईल. भाषाचे सहकारी डॉक्टर रात्रंदिवस काम करत आहेत आणि यावेळी त्यांना यापूर्वी कधीही नसलेल्या आव्हानांचा सामना करावा लागत होता. अशावेळी भाषाला त्वरित ‘टास्क फोर्स’मध्ये सामील व्हायचे होते, असेही ती सांगते. सध्या ब्रिटन सर्वात कठीण काळाला सामोरे जात आहे. ब्रिटनच्या पंतप्रधांनादेखील या विषाणूने कचाट्यात घेतले होते. २७ मार्च रोजी बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ७ एप्रिलला त्यांची प्रकृती अधिक खालावली. परंतु, त्यांनी उपचाराला योग्य साथ देत डॉक्टरांच्या आरोग्यविषयक सल्ल्याचे पालन केले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना १० एप्रिलला घरी सोडण्यात आले. पुढील १४दिवस ते घरीच ‘क्वारंटाईन’ आहेत. ब्रिटनमध्ये या महामारीने थैमान घातले असून लाखो लोकांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. अशावेळी ही परिस्थिती हाताळण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे भाषा सांगते. अशा कठीण प्रसंगी आपला सौंदर्यवतीचा मुकुट उतरवत वैद्यकीय पेशा स्वीकारीत कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी या लढ्यात उतरलेल्या भारतीय वंशाच्या ‘मिस इंग्लंड’ भाषा मुखर्जीला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
@@AUTHORINFO_V1@@