‘भट्टी’ जमली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2020   
Total Views |
neela upadhye_1 &nbs


चुनाभट्टी म्हणजेच चुनानिर्मिती करणारी भट्टी. पण, आजच्या पिढीला ‘चुनाभट्टी’ हे केवळ मुंबईच्या हार्बर उपनगरीय रेल्वेमार्गावरील एक स्थानक सोडल्यास त्याचा मागचा-पुढचा संदर्भही फारसा ठावूक नसावा. जास्तीत जास्त त्या परिसरात कोणेएकेकाळी चुनाभट्ट्या होत्या, इथवरचं ज्ञानसीमा. परंतु, नीला उपाध्ये यांनी आपल्या संशोधनाला मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंशी जोडून एक अनोखा मिलाफ साधला आहे.



मुंबईचा इतिहास हा आजवर अनेक संशोधकांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मग अगदी सात बेटांवर वसलेल्या मुंबईपासून ते ब्रिटिशांनी उभारलेल्या गॉथिक पद्धतीच्या इमारतींवरही शोधनिबंधांची पानेच्या पाने प्रकाशित झाली. पण, दुर्देवाने मुंबईच्या इतिहास संशोधनात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत संशोधक सोडले, तर सामाजिक दृष्टिकोनातून मात्र फारशी संशोधन साहित्यनिर्मिती झाली नाही. त्याला सरकारदरबारची अनास्थाही म्हणा तितकीच कारणीभूत. पण, तरीही अरुण टिकेकरांचे ‘स्थल-काल’, गोविंद माडगावकरांचे ‘मुंबईचे वर्णन’, डॉ. अरविंद जामखेडकरांचे ‘पुरा संचय’ वगैरे मौलिक संदर्भग्रंथांनी मराठी इतिहास संशोधन साहित्यात मोलाची भर घातली.


त्यातही मुंबईच्या सामाजिक इतिहासाचा प्रामुख्याने विचार करता, डोळ्यासमोर येतो तो मुंबईचे मूलनिवासी म्हणून ओळख असलेला कोळी समाज, त्यांची संस्कृती आणि एकूणच जडणघडण. पण, इतिहासाची पाने चाळता, आगरी समाजाची भूमिकाही मुंबई तसेच नवी मुंबई शहराच्या उभारणीत अनन्यसाधारण म्हणावी लागेल.


‘ओल्ड बॉम्बे बांधली चुनाभट्टीवाल्या आगऱ्यांनीच’ हा शोधनिबंधाचा विषय घेऊन मराठी वृत्तपत्रसृष्टीतल्या ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक नीला उपाध्ये यांनी एका दुर्लक्षित विषयावर सखोल संशोधनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. ‘एशियाटिक सोसायटी’ची ‘समाजशास्त्र’ विषयातील ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशीप’ मिळाल्याने नीलाताईंनी आपला मोर्चा या विषयाकडे वळवला. या शोधनिबंधाचे त्यांनी पुस्तकात रुपांतर केले आणि हे पुस्तक वाचून असेच म्हणावे लागेल की, या विषयाची ‘भट्टी’ चांगलीच जमली आहे.


सोप्या शब्दांत सांगायचे तर चुनाभट्टी म्हणजेच चुनानिर्मिती करणारी भट्टी. पण, आजच्या पिढीला ‘चुनाभट्टी’ हे केवळ मुंबईच्या हार्बर उपनगरीय रेल्वेमार्गावरील एक स्थानक सोडल्यास त्याचा मागचा-पुढचा संदर्भही फारसा ठावूक नसावा. जास्तीत जास्त त्या परिसरात कोणेएकेकाळी चुनाभट्ट्या होत्या, इथवरचं ज्ञानसीमा. परंतु, नीला उपाध्ये यांनी आपल्या संशोधनाला मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंशी जोडून एक अनोखा मिलाफ साधला आहे.


भारतातील वर्णव्यवस्था ही व्यवसायाधारित होती, हे आपण जाणतोच. तेव्हा, या चुनाभट्ट्या शिलकावण्याचा उद्योग आणि मिठागरांवरील कामे ही प्रामुख्याने आगरी समाजाकडे होती. त्यातही नीला उपाध्ये या माहेरच्या नीला गायकर. चुनाभट्टीच्या आगरी कुटुंबातच जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांची आजी सीताबाई गायकर ही चुनाभट्टीतील एकमेव महिला उद्योजिका असावी, असे नीलाताई अगदी अभिमानाने नमूद करतात. आगरी समाजाविषयी असलेली आपुलकी, समाजमनाशी जोडलेले ऋणानुबंध आणि एकूणच कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय असल्याने, या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात नीलाताईंचा ‘आगरी’ आपलेपणा प्रतिबिंबित होतो.


नीलाताईंनी पुस्तकाच्या प्रस्तावनेतच या संशोधनामागील प्रेरणा व भूमिका तपशीलात विशद केली आहे. त्यानंतर थेट चुनाभट्टीच्या इतिहासात डोकावण्यापूर्वी लेखिकेने मुंबईचा इतिहास, ‘ओल्ड बॉम्बे’ यांचे थोडक्यात, पण तत्कालीन मुंबईचे चित्र डोळ्यासमोर उभे करणारे शब्दचित्रण उत्तम मांडले आहे. इथे लेखिकेच्या संशोधक वृत्तीला त्यांच्यामधील पत्रकाराने जमेची साथ दिलेली दिसते. कारण, कुठलाही फाफटपसारा न मांडता अगदी ‘टू द पॉईंट’ नीलाताई त्यावेळच्या ‘बॉम्बे’चे भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय पैलू वाचकांसमोर ठेवतात. या ‘ऑल्ड बॉम्बे’च्या उभारणीवेळी भारतात सिमेंटचा वापर होत नव्हता. म्हणजे, साहजिकच ब्रिटिशांच्या आज डौलाने, तोऱ्यात उभ्या असलेल्या इमारतींना या चुनाभट्टीच्याच चुन्याने एकप्रकारे चिरकालता प्रदान केली, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.


आजच्या पिढीला चुना म्हणजे एक तर खायचा चुना आणि दुसरा भिंतीवर लावायचा चुना, एवढीच काय ती सर्वसाधारण पुस्तकी माहिती. पण, लेखिकेने या चुन्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातूनही उचित ऊहापोह केला आहे. त्याकाळी ‘बॉम्बे’त तीन प्रकारच्या चुनाभट्ट्या सुरु होत्या. एक भिंतींना गिलावा करण्यासाठी लागणारा चुना, दुसरा बांधकामातील दगड-विटा यांच्या सिमेंटीकरणासाठी लागणारा चुना आणि तिसरा तो खायचा चुना. याच प्रकरणात चुनाभट्ट्यांतून चुन्याची निर्मिती नेमकी कशी केली जाते, याची सविस्तर प्रक्रियाही अगदी सोप्या शब्दांत लेखिकेने वाचकांसमक्ष मांडली आहे. त्याचबरोबर सुरुवातीला चुनाभट्ट्यांचा उद्योग हा मेमन व्यापाऱ्यांशी निगडित होता व हे चुनाउत्पादक मेमन कमी पडू लागल्यावर या कामासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आगरी समाजातील गायकर कुटुंबातील सात कर्त्या पुरुषांना यासाठी खास सुरतेहून प्रशिक्षित केले आणि व त्यांना मुंबईच्या वेशीबाहेर (पूर्वेला शीव आणि पश्चिमेला सांताक्रुझपुढे) भाडेतत्तावर जमिनीचे पट्टेही देण्यात आले. पण, पावसाळ्याच्या चार महिन्यात भट्ट्या शिलगावता येत नसल्याने हे चुनाभट्टीवाले मासळीवर ताव मारण्यात वेळ घालवत असतं. चेंबूरपासून चुनाभट्टीमार्गे शीवपर्यंत जाणारा आजचा जो वि. ना. पुरव मार्ग दिसतो, तो प्रामुख्याने याच चुन्याच्या ने-आण करण्यासाठी वापरला जायचा, अशी माहितीही लेखिका देते.


चुनाभट्ट्यांच्या प्राथमिक माहितीनंतर आगरी समाजाच्या इतिहासापासून, मुंगीपैठणाच्या दंतकथेपर्यंतचा लेखिकेने संदर्भासहित उलगडा केला आहे. त्याचबरोबर आगरी समाजाची भाषाशैली, त्यांच्या खानपानाच्या सवयी, जीवनशैली अशा एकूणच सर्वांगाने या आगरी संस्कृतीची नीलाताईंनी अगदी मुद्देसूद मांडणी केली आहे. पण, केवळ माहितीवजा इतिहासावर लक्ष केंद्रीत न करता लेखिकेने आगरी समाजातील साहित्यिक, लेखक यांचाही थोडक्यात परिचय वाचकांना करुन दिला आहे. त्यामुळे भूतकाळाबरोबरच आगरी समाजाच्या वर्तमानस्थितीचीही वाचकांना इत्यंभूत कल्पना आल्याशिवाय राहत नाही.


विशेष म्हणजे, या वयातही नीलाताईंनी या शोधनिबंधाच्या माहिती संकलनासाठी केलेली पायपीट सर्वार्थाने कौतुकास्पदच म्हणावी लागेल. त्यांचा उत्साह, जिद्द ही अगदी तरुण संशोधकांनाही लाजवेल अशीच. तेव्हा, केवळ गुगल आणि ई-बुक्सच्या पलीकडे जणू संशोधन शक्यच नाही, असा काहीसा गैरसमज करुन घेणाऱ्या नवसंशोधकांच्या डोळ्यांत नीलाताईंचा शोधनिबंध अंजन घालणारा ठरावा. विशेष म्हणजे, या प्रदीर्घ संशोधन प्रक्रियेत त्यांच्या हाती जे लागले, जसे लागले, ती तपशीलवार माहिती त्यांनी सर्व पुराव्यांनिशी सादर केली आहेच. पण, जी माहिती त्यांना संशोधनासाठी आवश्यक होती, परंतु विविध कारणास्तव उपलब्ध होऊ शकली नाही, त्याचीही प्रांजळ कबुली द्यायला नीलाताई विसरलेल्या नाहीत. त्यामुळे एक संशोधक, साहित्यिक आणि पत्रकार म्हणून सर्वात महत्त्वाचा असणारा प्रामाणिकपणा, आपल्या संशोधनातील शब्द अन् शब्द खरा आहे, हे सांगण्याइतपत विश्वासार्हता हेच त्यांच्या संशोधनाचे गमक म्हणावे लागेल. त्यातच सविस्तर संदर्भसूची आणि परिशिष्ट या पुस्तकाला एक संदर्भमूल्य प्रदान करते.


एकूणच चुनाभट्टी, आगरी समाज याचे विविधांगी पैलू या संशोधनाधारित पुस्तकातून लेखिकेने वाचकांसमक्ष ठेवले आहेत. लेखिकेची ओघवती भाषाशैली आणि विषयाची लांबड न लावता, प्रत्येक मुद्द्याला दिलेला योग्य न्याय, हा या पुस्तकाच्या वाचनीयतेत भर घालतो. पुस्तकाच्या आकर्षक मुखपृष्ठापासून ते चुनाभट्टीची ग्रामदेवता असलेल्या मुक्ताई देवीचे छायाचित्र असलेल्या मलपृष्ठापर्यंत विषयाची स्पष्टता अधोरेखित होते. तेव्हा, हाच विषय केंद्रस्थानी ठेवून नवखे संशोधक अधिक खोलवर संशोधन करु शकतात, याचीही खात्री वाटते.


पुस्तकाचे नाव : चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज
लेखिका : नीला वसंत उपाध्ये
प्रकाशन : दर्पण प्रकाशन
पृष्ठसंख्या : ११२
मूल्य : रु. १५०
@@AUTHORINFO_V1@@