आम्ही कोरोनामुक्त झालो, तुम्हीही निर्धास्त राहा!

    19-Apr-2020
Total Views |

negative_1  H x



मुंबई :
कोरोनाबाधित ठरल्यापासून पालिकेत चांगले उपचार मिळाले. त्यामुळेच आम्ही कोरोनामुक्त झालो. उपचार घेताना तुम्हीही डॉक्टरांवर भरोसा ठेवा आणि निर्धास्त राहा, असे भावनिक आवाहन बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांकडून करण्यात येत आहे. चाचणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यापासून पालिकेच्या रुग्णालयात मिळणाऱ्या उत्तम सुविधा, दर्जेदार उपचार, पुरेसा व पोषक आहार आणि डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळणारी प्रेमळ वागणूक यामुळे आम्ही आता कोरोनामुक्त झालो आहोत अशी भावना घरी गेलेले रुग्ण व्यक्त करीत आहेत. 'कोरोना बरा होतो, त्यामुळे तुम्हीही घाबरू नका', असे आवाहनही 'कोरोनामुक्त' झालेल्यांना कडून करण्यात येत आहे.



मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेली असली तरी 'कोरोनामुक्त' होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी एकाच दिवसात 42 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 18 एप्रिल रोजी 281 वर पोहोचली असून यामध्ये वाढच होत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. कोरोनामुक्तमध्ये ७० वर्षांपासून अगदी तरुणांपर्यंतच्या वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती चांगलीच सुधारली आहे. तरीदेखील पालिलेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून या रुग्णांवर वेळोवेळी देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना झाल्यास किंवा लक्षणे दिसल्यास घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाबाबत नागरिकांमध्ये नाहक भीती असल्यामुळे रुग्ण कोरोनामुक्त झाले तरी नावे जाहीर करण्यात येत नाहीत. घरी जाताना त्या माणसाला टाळ्यांच्या गजरात आणि फुले उधळून प्रेमभावे निरोप देण्यात येतो. त्यामुळे त्याच्यात जगण्याची नवी उमेद येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोनाबाधितांपैकी असलेले मृत्यू हे इतर आजार असलेल्या ज्येष्ठांचे अधिक आहेत, असेही प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.



कुटुंबाशी संपर्क, पोषक वातावरण


रुग्णालयात असताना डॉक्टर, नर्ससह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळते. इथे बाहेरच्या व्यक्तींना भेटता येत नाही. मात्र मोबाईलवरून घरच्यांशी कॉल, व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क सुरू असतो. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वांशी संपर्क तुटतो ही भीती नाहक आहे. नियमित औषधोपचार, योग्य आहार आणि आत्मविश्वासाने कोरोनावर मात करता येते असेही बरे झालेल्या रुग्णांकडून समाज माध्यमांद्वारे सांगण्यात येत आहे.