प्रत्येक घरात दूरध्वनी संभाषणात आणि प्रत्येकाच्या डोक्यात सध्या एकच प्रश्न सारखा सारखा येतो तो म्हणजे, ‘लॉकडाऊन’ केव्हा थांबणार? कोरोना केव्हा संपणार? आणि याचं खरं आणि एकमेव उत्तर म्हणजे कोरोनावर लस शोधली जाईल तेव्हाच! ही लस शोधण्यासाठी जगातील अधिकाधिक संशोधक, औषधी कंपन्या या विषयावर दिवसरात्र महेनत घेत आहेत. अर्थात, कोरोनावरील औषध हे दोन प्रकारचं असणार आहे; ते म्हणजे ज्यांना कोरोना झालाय त्यावरील उपचार म्हणून व दुसरं व अधिक महत्त्वाचं म्हणजे, कोरोना होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लस. ज्या औषध कंपन्या या लसीवर औषध शोधून काढतील, त्या कंपन्यांसाठी पुढील व्यवसायाची वाटचाल खूपच सुखकारक असणार आहे.
ज्या ज्या औषध कंपन्या लस बनवण्याच्या जवळपास पोहोचल्या आहेत किंवा ज्या कंपन्यांकडून संशोधनाची अपेक्षा आहे, त्यांचे शेअर्स रोजच वधारत आहेत. या लसीच्या संशोधनाव्यतिरिक्त अनेक संधी आरोग्य व वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध होतील. भारताच्या अर्थसंकल्पात साधारण १ टक्के खर्च हा आरोग्यावर केला जातो, पुढील वर्षाच्या बजेटमध्ये हाच खर्च किमान ३ टक्के, म्हणजे २०० टक्क्याने जरी वाढला तरी आश्चर्य वाटायला नको. आपल्या लोकसंख्येनुसार दोन हजार नागरिकांच्या मागे एक बेडची व्यवस्था उपलब्ध आहे. यामध्ये पाकिस्तानची परिस्थिती देखील आपल्यापेक्षा चांगली आहे.
त्यामुळे शासनाद्वारे आरोग्य क्षेत्रावर अधिक लक्ष देऊन आमूलाग्र बदल घडवले जातील. हे करताना अनेक संधी निर्माण होतील. इस्पितळांची संख्या जरी सरकाने वाढवायचे ठरवले तरी इस्पितळांचे बांधकाम, बांधकामाचे सामान, रंग, इलेक्ट्रीकल सामान, इस्पितळांसाठी लागणारे बेड, त्यावरील गादी, रेग्झिन, बेडशीट्स, उशीपासून ते अगदी एमआरआय, सिटीस्कॅन, व्हेंटिलेटरच्या मागण्या वाढतील.
महामारीनंतर लोकांचा आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील अधिक संवेदनशील असेल. वेळोवेळी हेल्थ चेकअप करणे, आरोग्याची अधिक काळजी घेणं, अधिक स्वच्छता राखणे, सतत हात धुणे या सवयी अंगीकारल्या जातील. त्याचबरोबर आरोग्य विमा, आरोग्य तपासणीचे पॅकेजेस यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल.
इतर देशांच्या मानाने भारताने ज्या प्रकारे कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे, त्यामुळे इतर देशांच्या भारताकडे बघण्याच्या दृष्टिकोनात देखील बदल होईल. परदेशातून अनेक नागरिक भारतामध्ये बर्याच प्रकारच्या आरोग्य सुविधा घेण्यासाठी येतात. त्याला ‘मेडिकल टुरिझम’ असं म्हणतात. या ‘मेडिकल टुरिझम’ प्रकारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील धारावीसारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या भागात शासनातर्फे अनेक छोटी-छोटी तपासणी केंद्र उघडली जातील. त्यामुळे प्राथमिक तपासण्या, त्यावर होणारा खर्च आणि त्यावरील रोजगार यामध्ये वाढ होईल. नवीन तपासणी केंद्र देखील आधुनिक प्रकारची असतील. ज्यामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला असेल. त्यामुळे आयटी किंवा तंत्रज्ञान कंपन्यांना देखील नव्या संधी आपसुक उभ्या राहतील. गेल्या आठवड्यात आम्ही ठाणे महानगरपालिका आणि हरियाणा राज्याला टेलीव्हिडिओकॉन्फरन्सिंगची सोय मोफत उपलब्ध करून दिली. ज्यामुळे अनेक नागरिकांना घराबाहेर न पडता, तज्ज्ञ डॉक्टरांकडून घरच्या घरीच तपासणी करून घेणे शक्य झाले आहे. अशा अनेक नव्या संकल्पना ज्या कंपन्या मांडू शकतील, त्यांच्यासाठी अनेक संधी आगामी काळात उपलब्ध होणार आहेत. भारतात नवसंकल्पनांना कोणतीही कमी नाही. भारतीय रेल्वेने अनेक रेल्वेच्या डब्यांना अगदी कमी वेळात ‘आयसोलेशन बेड’मध्ये रुपातंरित केले, एवढेच नाही तर एक व्हेंटिलेटर आता आठ जण वापरू शकणार आहे, हे उपायदेखील कौतुकास्पद आहेत. चांगल्या संकल्पना असणार्यांच्या पाठीशी शासन, बँका, मोठे उद्योजकदेखील आर्थिक पाठबळासह नक्कीच उभे राहतील, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे आताच जागे व्हा. कारण, या संधी पुन्हा तुमचे दार ठोठावणार नाहीत.
(क्रमशः)
- प्रसाद कुलकर्णी