
कोरोनाच्या लढ्यात आपण एकत्र आहोत म्हणत स्वित्झर्लंडकडून भारताचे कौतुक
स्वित्झर्लंड : सध्या जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये एकजुटीचा संदेश देण्यासाठी आणि या लढ्यात भारताचे कौतुक करण्यासाठी स्वित्झर्लंड येथील ‘मॅटरहॉर्न पर्वता’वर नुकतीच भारताच्या तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. ‘The Embassy of India to Switzerland’च्या ट्वीटर अकाऊंटवरून रोषणाईचे विहंगम दृश्य शेअर करण्यात आले आहे. दरम्यान हा फोटो रिट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या जागतिक आरोग्य संकटावर माणुसकीचा धर्म लवकरच मात करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शुक्रवार रात्री सुमारे १४,६९० फीट उंच पर्वतांवर प्रसिद्ध लाइट आर्टिस्ट असणाऱ्या गेरी हॉफस्टेटर याच्या संकल्पनेमधून ही रोषणाई करण्यात आली आहे. जिनेव्हा येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारी असणाऱ्या गुर्लीन कौर यांनाही या पर्वताचे फोटो शेअर केले आहेत. “हिमालयापासून ते आलप्सपर्यंतची मैत्री”, असे कॅप्शन या फोटोला गुर्लीन यांनी दिले आहे. दरम्यान मागील आठवड्याभरापासून भारतासोबतच या पर्वतरांगांवर जपान, जर्मनी, युके, फान्स, इटली, अमेरिका सह अनेक देशांच्या झेंड्यांची रोषणाई केली होती. झरमॅट मॅटरहॉर्न या पर्यटनाला चालना देणार्या वेबसाईटकडून भारताच्या तिरंग्याची रोषणाई फेसबुक पेजवरदेखील शेअर करण्यात आली होती.