भारतीय नौदलातही कोरोनाचा शिरकाव

    18-Apr-2020
Total Views |

mumbai neavy_1  



मुंबई
: भारतीय नौदलाच्या २० जवानांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही भारतीय नौदलासाठी धोक्याची घंटाच आहे. चाचणी करण्यात आलेले हे सर्व नौदल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना मुंबईच्या कुलाबातील नेव्हल हॉस्पिटल आयएनएचएस अश्विनीमध्ये दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती नौदल अधिकाऱ्यांनी दिली आहे.



कोरोना संसर्गाची नौदलातील ही पहिली घटना आहे. आता या कोरोना संक्रमित जवानांच्या संपर्कात असलेल्यांचीही चाचणी केली जाईल. नौदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आजपर्यंत मुंबईतील नेव्हल कॉम्प्लेक्समध्ये सेवा देणाऱ्या २१ जवानांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात मुंबईच्या किना-यावर उभ्या असलेल्या आयएनएस आंग्रे येथील २० खलाशी आहेत. हे ७ एप्रिल ला कोरोना पॉझिटिव्ह मिळालेल्या खलाश्याच्या संपर्कात आल्याने कोरोना संक्रमित झाले आहेत.




लष्कर प्रमुख एम.एम.नरवणे यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतीय लष्करातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या आठ पैकी दोन डॉक्टर आणि एक नर्सिंग सहाय्यक आहेत.यातील चार जणांवर उपचारांचा प्रभाव दिसून येत आहे. भारतीय नौदलामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असल्याची घटना अशावेळी समोर येत आहे ज्यावेळेस अमेरिकेच्या नौदलातील कोरोनाची लागण झालेल्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भारतीय नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांनी यावर बोलताना सांगितले, युद्धनौका आणि पाणबुडी सारख्या परिचालन मालमत्ता व्हायरसमुक्त राहतील आणि भारतीय नौसेना सदैव तयार असेल.नेव्ही कर्मचार्‍यांना संबोधित करणाऱ्या १५ मिनिटांच्या व्हिडीओ मेसेजमध्ये नेव्ही चीफ म्हणाले की, चांगल्या परिस्थितीची अपेक्षा बाळगून समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे. आपल्याला सर्वात कठीण परिस्थितीसाठी तयार राहण्याची गरज आहे. ही एक मोठी लढाई आहे." सशस्त्र दलात कोरोनाचा प्रसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सैन्याने प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला आहे.


'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' होणार

या नौसैनिकांची आता 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' होणार आहे. हे नौसैनिक गेल्या काही दिवसांत भेटलेल्या सर्वांची चाचणी केली जाणार आहे. जगातील अनेक देशांचे नौसैनिक कोरोनाबाधित असल्याचे आढळले असून त्यात आता भारताचाही समावेश झालाय.

आईही कोरोना पॉझिटिव्ह


बाधित नौसैनिकांपैकी बहुतेक सर्व जण आयएनएस आंग्रे भागात राहत आहेत. तर एक व्यक्ती आपल्या आईसोबत घरी राहत आहे. या नौसैनिकाची आईही करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नेव्हीच्या रहिवासी निवासस्थानांतील सर्वांची चाचणी सुरू करण्यात आली आहे. आयएनएस आंग्रे या तळाला सील करून त्याला संक्रमित झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.