पूर्वपदावर येण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2020   
Total Views |

china_1  H x W:


जागतिक आरोग्य संघटनेने ‘लॉकडाऊन’ शिथील करण्यासाठीच्या पूर्वशर्थी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जग ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडण्याविषयी हालचाली करू लागल्याची ही लक्षणे आहेत. इटली ४ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’मधून बाहेर येण्याची तयारी करीत आहे. स्पेनसुद्धा २७एप्रिलपर्यंत संपूर्णतः ‘लॉकडाऊन’मधून बाहेर येईल, असा प्रयत्न करतो आहे


जगाच्या पाठीवर अनेक देशातील ‘लॉकडाऊन’ आता शिथील करावेत, अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत. अमेरिकेत ‘लॉकडाऊन’ रद्द करावे, याकरिता काही लोकांनी निदर्शनेही केली. तुर्कस्तानने सशक्त वयोगटातील नागरिकांसाठी ‘लॉकडाऊन’ शिथील करण्याचा विचार सुरू केला आहे. वयवर्षे २० ते ६५ मधील लोकांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते. शारीरिकदृष्ट्या सक्षम लोकांसाठी तुर्कस्तानचे सरकार ‘लॉकडाऊन’चे नियम लागू करणार नाही, अशी शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते, हा एक चांगला पर्याय असू शकतो. तसेच ट्रम्प यांनीही अमेरिकेतील परिस्थिती १ मेनंतर पूर्ववत करण्याविषयी सुतोवाच केले आहेत. त्यामुळे जग कोरोनाच्या संकटाशी लढताना नव्या पर्यायांचा विचार करते आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अमेरिकेच्या बाबतीत ट्रम्प यांनी संबंधित राज्याच्या राजप्रमुखावर हा निर्णय सोपवण्याचे संकेत दिले आहेत.



दरम्यान, चीनपासून अत्यंत नजीकच्या अंतरावर असलेल्या तैवानसारख्या राज्याने ‘लॉकडाऊन’च्या माध्यमातून कोरोना प्रादुर्भावावर जवळपास नियंत्रण मिळवले आहे. ३९०कोरोनाबाधित व केवळ सहा मृत्यू वगळल्यास तैवानमध्ये पूर्णतः नियंत्रित स्थिती आहे. अडीच कोटींची लोकसंख्या असलेल्या बेटासाठी हे शक्य झाले. तैवानकडे असलेले नैसर्गिक संरक्षण हेच यामागील कारण नाही. ‘सार्स’च्या संकटातून काही धडे तैवानच्या जनतेने व व्यवस्थेने गिरवले आहेत. त्याचादेखील हा परिणाम होता. जागतिक आरोग्य संघटनेने ‘लॉकडाऊन’ शिथील करण्यासाठीच्या पूर्वशर्थी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जग ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडण्याविषयी हालचाली करू लागल्याची ही लक्षणे आहेत. इटली ४ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’मधून बाहेर येण्याची तयारी करीत आहे. स्पेनसुद्धा २७एप्रिलपर्यंत संपूर्णतः ‘लॉकडाऊन’मधून बाहेर येईल, असा प्रयत्न करतो आहे. युरोपियन देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात लक्षणीय घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इटली, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, स्पेन, फ्रान्स, युके, जर्मनी या सर्वच देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात साधारणत: सात-आठ टक्के घट होण्याचे अंदाज आहेत. त्यामुळे ‘लॉकडाऊन’चा कालावधी अजून वाढविणे अनेक देशांना परवडणारे नाही. मे महिन्याच्या प्रारंभापर्यंत सर्वच देश ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडण्याची धडपड करीत आहेत. कारण, ‘लॉकडाऊन’ म्हणजे मोठे नुकसान टाळण्यासाठी अल्प नुकसान सोसण्याचा निवडलेला मार्ग आहे. ‘लॉकडाऊन’ या समस्येवरील अंतिम उपाय नाही. मात्र, हे अल्प प्रमाणातील नुकसान संभाव्य नुकसानापेक्षा अधिक झाले तर काही अर्थ उरणार नाही. कोरोनाच्या संकटातून ज्या प्रमाणात नुकसान होईल, त्यापेक्षा ‘लॉकडाऊन’मुळे होणारे नुकसान कमी असायला हवे. हे गणित जुळवणे सध्या धोरणकर्त्यांसमोरील मुख्य प्रश्न असला पाहिजे.



भारताच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, अजूनही असे विषय आपल्या चर्चांच्या केंद्रस्थानी नाहीत. मध्यमवर्गीय आर्थिक स्तरातील मंडळींना या ‘लॉकडाऊन’चे दुष्परिणाम प्रकर्षाने जाणवत नसतील. मात्र, ‘लॉकडाऊन’च्या संकटाची झळ मध्यमवर्गीय समाजात पोहोचेपर्यंत अनेक घटक त्यातून पोळून निघालेले असतील. आपल्याकडील दृक्श्राव्य स्वरुपाची प्रसारमाध्यमे अक्षरशः ‘लॉकडाऊन’ साजरा करीत आहेत. कुठे गर्दी होते, कोण मास्क घालत नाहीत, काय रद्द होणार, काय सुरू होणार याच्याच चर्चा सुरू आहेत. मग धोरणांच्या बाबतीत पुढील तयारी काय असणार, हे प्रश्न कोण विचारणार? सारे जग ‘लॉकडाऊन’ संपवण्याच्या दृष्टीने जनजीवन सुरक्षित करण्यासाठी सक्रिय होते आहे. त्यासाठीची तयारी, उपाययोजनांचा विचार केला जातो. भारताच्या बाबतीत अजूनही कोरोनाचा एका अर्थाने ‘हनिमून काळ’ संपलेला नाही. देशाच्या आर्थिक राजधानीचे भवितव्य काय, यावर आपण बोलायला तयार नाही. पाश्चिमात्त्य देशात संकटातून पुढे निघून जाण्याची तयारी सुरु झाली. आपल्याकडे प्रतिमानिर्मिती व प्रतिमाभंजनासाठीच या संकटाचा उपयोग केला जातो आहे. इतर देशात सुरू असलेल्या हालचालींचा योग्य बोध घ्यायला हवा. त्यातून आपण देश म्हणून या संकटातून बाहेर पडण्याविषयी विचार सुरू केला पाहिजे.
@@AUTHORINFO_V1@@