आसर्‍याचा झाला जुगार अड्डा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2020   
Total Views |

pravar_1  H x W

 



सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर असताना निराधार आणि बेघर नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावर उपाय म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी अशा बेघर आणि निराधार नागरिकांसाठी आसरा निर्माण करून दिला.

 

 

आपल्याला दिलेली ही सुविधा माणुसकीच्या धर्मातून केलेली सेवा आहे. याचा विसरच सध्या या निवार्‍यात आश्रय मिळालेल्या काही नागरिकांना पडला असल्याचे त्यांच्या वर्तनावरून दिसून येते. मनमाड रेल्वे स्थानक परिसरामध्ये राहणार्‍या बेघर असलेल्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था मनमाड नगरपालिकेच्यावतीने शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बसस्थानकामध्ये करण्यात आली. मात्र, या बेघर नागरिकांनी बसस्थानक हे घाणीचे माहेरघर आणि जुगाराचा अड्डा बनविले आहे. मनमाड बसस्थानकात बेघर लोकांना ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान गेल्या २२ दिवसांपासून विविध सामाजिक संस्था, तसेच समाजसेवक मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात. गेल्या २२ दिवसांपासून सुमारे ३०० हून अधिक बेघर नागरिक या ठिकाणी वास्तव्य करीत असताना दिवसभर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून होणारे अन्नदान हे मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने हे लोक आता प्रत्येक गोष्ट घेताना आवडीनिवडी पाहू लागले असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारचे ‘सोशल डिस्टन्सिंग’ या ठिकाणी दिसून येत नाही, तसेच रात्रीच्या वेळेस आणि दिवसा शहराच्या विविध भागांमध्ये फिरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या लोकांचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिकेच्यावतीने या लोकांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे शौचालय जरी उपलब्ध करून देण्यात असले, तरी या शौचालयाचा वापर न करता हे नागरिक उघड्यावरच सर्व विधी करत असल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. याशिवाय मोबाईलवर गेम खेळणे, दिवसा आणि रात्रभर जुगार खेळणे आणि समाजसेवकांनी दिलेले अन्न फेकून देणे, असा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याने या लोकांची व्यवस्था पालिका प्रशासनाने गावाच्या बाहेर करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. या नागरिकांना आपले वर्तन चुकीचे आहे, हे समजणे तसे दुरापास्त आहे. मात्र, आता प्रशासनाने तरी या नागरिकांची सोय गावकर्‍यांच्या आरोग्यासाठी गावाबाहेर करणे आवश्यक आहे.
 


सेवाभावाची अशीच जोपासना व्हावी

 
कीकडे मनमाडमधील चित्र समोर येत असताना दुसरीकडे राज्यात सेवाभावाचा चमकता अंकुर दिसून येत आहे. राज्यातील माजी सैनिक, डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉय आदी आरोग्यरक्षकांनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित २१ हजारांपेक्षा जास्त सेवानिवृत्तांनी स्वयंस्फूर्तीने शासनाकडे कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले योगदान देण्यासाठी अर्ज केले आहेत. आजवर सुमारे २१ हजार अर्ज दाखल झाले असल्याचे समजते. त्यात डॉक्टर्स, परिचारिका, फार्मासिस्ट प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्डबॉय, पॅरावैद्यकीय, समाजसेवक, वैद्यकीय स्वयंसेवक अशा अनेकांचा समावेश आहे. त्यांनी केलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू असून छाननीअंती हे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले जाणार आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरून आपले योगदान द्यावे, असे २१ हजार नागरिकांना वाटले. हे येथे महत्त्वाचे आहे. सेवानिवृत्तीपश्चात आरामदायी आणि सुखवस्तू जीवन जगणे हे प्रत्येक सेवानिवृत्त नागरिकाचे स्वप्न असते. मात्र, आपल्या अंगी असणारे कौशल्य, अनुभव यांचा फायदा हा समाजाला अशा भीषण स्थितीत व्हावा, असे मनोमन वाटणे हे सेवाभावाचे लक्षण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजच्या आधुनिक काळात माहिती-तंत्रज्ञान फोफावत असताना व्यक्ती व्यक्तीपासून दुरावला जात आहे, असे बोल नेहमीच ऐकावयास मिळत असतात. जग स्वार्थी असून माणसे मानवधर्मच विसरत चालल्याची ओरडदेखील ऐकावयास मिळत असते. अशा वेळी सेवानिवृत्त नागरिकांची ही इच्छाशक्ती समाजात आदर्श निर्माण करणारी नक्कीच आहे. कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणूचा इतिहास नसल्याने त्याचा अभ्यासदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे अजून ठोस असे औषधेदेखील बाजारात उपलब्ध झालेले नाही. तरीही २१ हजारांपेक्षा जास्त लोकांना या लढ्यात सहभागी व्हावेसे वाटले, हे नक्कीच संवेदनशील समाजाचे द्योतक आहे. राज्याच्या वैचारिक जडणघडणीत संतांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी मानवधर्म आणि सहिष्णुता यांची शिकवण दिली आहे. समाजसुधारकांनी आपल्या कार्याने आदर्श वस्तुपाठ उभा केला. समाजावर पिढ्यान्पिढ्या होत आलेले ते संस्कार अजून बरेच कायम आहेत, हे सेवानिवृत्तांच्या प्रचंड संख्येच्या अर्जांनी पुन्हा एकदा सिद्ध केले, आहे असे वाटते.

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@