समाजभान जपणारी गुणी अभिनेत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2020   
Total Views |
Ashwini_1  H x


आपल्या धारधार अभिनयाने छत्रपती संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक मालिकेत ‘राणू अक्का’चे पात्र अजरामर करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या कलाप्रवासाचा घेतलेला हा आढावा...




सातार्‍यातील वाईपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या पसरणी या गावात अश्विनी महांगडेचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अश्विनीला घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले. अश्विनीच्या वडिलांना नाटकांची खूप आवड होती. वाईमध्ये नाटकाच्या एका ग्रुपमध्ये ते काम करायचे. शेतीबरोबर नानांनी व्यवसायही सुरू केला होता. हे दोन्ही आणि संसाराची जबाबदारी सांभाळून त्यांनी नाटकाची आवड जपली. नाटकासाठी ते रोज संध्याकाळी पसरणीहून वाईला तालमीसाठी सायकलवरून जायचे आणि मध्यरात्री दोन-तीन वाजता घर गाठायचे. नाटकासाठी असलेली त्यांची ओढ, ते करत असलेली धावपळ हे सर्व अश्विनीने लहानपणापासून पाहिले होते. गावात होणार्‍या जत्रांमध्ये ते नाटक बसवायचे, त्यात अभिनयही करायचे. बालपणापासूनच अश्विनीवर त्यांच्याकडून नाटकाचे संस्कार झाले.


पसरणीमधील भैरवनाथ विद्यालयात शिकत असताना अश्विनी शाळेतल्या स्नेहसंमेलनात सहभागी व्हायची. तिथेच तिला आपल्यातील या कलागुणांची जाणीव झाली. अश्विनीच्या वडिलांनाही तिची आवड लक्षात आल्याने गावातील जत्रेमध्ये होणार्‍या ‘बळी’ या नाटकात तिला काम करण्याची संधी दिली. त्यानंतर जशी संधी मिळेल तशी अभिनय, नृत्यस्पर्धांमध्ये अश्विनी सहभागी होत राहिली. दहावी झाल्यानंतर वाईच्या महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला. महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर वाईमधील ‘प्रतीक थिएटर ग्रुप’ आणि ‘नृत्यांकुर ग्रुप’मध्ये ती सहभागी झाली. एकीकडे अभ्यास, तर दुसरीकडे अभिनय या दोन्ही गोष्टी ती करत होती. महाविद्यालयात असताना विद्यापीठांमध्ये होणार्‍या स्पर्धांमध्ये ती सहभागी व्हायची.


बी.कॉम. करत असतानाच तिने ‘हॉटेल मॅनेजमेंट’चा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर आता पुढे काय, असा प्रश्न समोर उभा ठाकला होता. तेव्हा आता स्वत:च्या पायावर उभे राहायचे हे नक्की करून तिने आईवडिलांच्या संमतीने मुंबई गाठली. कल्याणमध्ये आत्याकडे राहून नोकरीची शोधाशोध सुरू केली. नोकरी मिळाल्यानंतर अभिनयाची आवड मधूनच डोकं वर काढत होती. आत्येबहिणीच्या खंबीर पाठिंब्यामुळे तिने ऑडिशन देण्यास सुरुवात केली आणि इथूनच तिचा कलाक्षेत्रातला संघर्ष सुरु झाला.


सकाळी डोंबिवलीला नोकरीच्या ठिकाणी जायचे, तिथे काम आटोपून दुपारी जिथे ऑडिशन असेल तिथे हजेरी लावायची, असा दिनक्रम सुरू झाला. ऑडिशनला गेल्यानंतर आपल्यात काय सुधारणा करायला हव्यात, याची जाणीव तिला झाली. दरम्यानच्या काळात बोरिवलीमधील ‘हयवदन’ या नाट्यसंस्थेत ती सहभागी झाली. प्रायोगिक नाटकात सहभागी होताना भाषेचा प्रश्न होता. मात्र, मेहनत घेत तिने आपल्या या कमीवर मात केली. पहिल्याच प्रायोगिक नाटकाने तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. मात्र, या दरम्यान नोकरी आणि नाटक यांत दमछाक होत असल्याने नोकरी सोडून पूर्णपणे अभिनयाकडे वळायचा निर्णय तिने घेतला. यात तिला घरच्यांचा खंबीर पाठिंबा होताच. पुढे ती मिरारोडला मावशीकडे राहू लागली आणि तिथून नाटकांच्या तालमी आणि ऑडिशनला जाऊ लागली. दरम्यानच्या काळात तिने ‘आधी बसू मग बोलू’, ‘गोलपिठा’ सारखी नाटके आणि काही मालिकांमधून कामही केले. याच काळात तिला झी मराठीच्या ‘अस्मिता’ या मालिकेत ‘मनाली’ ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. तीन वर्षे चाललेल्या या मालिकेने तिला अभिनयक्षेत्रात स्वतःची ओळख मिळवून दिली. या मालिकेनंतर ती पुन्हा एकदा एका सशक्त भूमिकेच्या शोधात होती. परंतु, मनाजोगती भूमिका मिळत नव्हती. वर्ष उलटल्यानंतर तिला ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी ऑडिशनला बोलावण्यात आले. तिथे संभाजीराजांची महिला गुप्तहेर असलेल्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन घेण्यात आली. ऑडिशन झाल्यानंतर आठ दिवसांनी या भूमिकेसाठी दुसर्‍या मुलीची निवड झाल्याचे कळल्यावर ती निराश झाली. या प्रसंगानंतर महिन्याभरानंतर पुन्हा याच मालिकेसाठी ‘लूकटेस्ट’ला बोलावण्यात आले. तिथे गेल्यानंतर संभाजी महाराजांच्या मोठ्या बहिणीची भूमिकेसाठी निवड झाल्याचे कळल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र, त्यानंतर अश्विनीने साकारलेल्या ‘राणू अक्का’ला घरोघरी सगळ्यांकडूनच कौतुकाची थाप मिळाली आणि तिची ही भूमिका अजरामर झाली.


अश्विनी जशी गुणी कलाकार आहे, तशीची व्यक्ती म्हणूनही ती जबाबदार आणि तितकीच संवेदनशील आहे. याच सामाजिक जाणिवेतून अश्विनीने मासिक पाळीची समस्या मांडणारी ‘महावारी’ या वेबसीरिजची निर्मिती स्वत:च्या ‘मोरया प्रॉडक्शन’तर्फे केली आहे. ग्रामीण भागात जाऊन तिथल्या मुलींशी याबाबत ती आणि या वेबसीरिजची लेखिका भाग्यशाली राऊत कार्यशाळांमधून संवाद साधतात. जिथे शक्य असेल तिथे ही वेबसीरिज दाखवत, त्यांच्या मनातून मासिक पाळीबाबत असलेल्या चुकीच्या समजूती दूर करण्यासाठी ती प्रयत्न करते.


विशेष म्हणजे, हे सर्व ती विनामूल्य करते. याचबरोबर ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ नावाने एका सामजिक संस्थेची स्थापना केली असून, या संस्थेमार्फत ती अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. अभिनयासोबतच सामाजिक भान जपत समाजसेवा करणार्‍या या गुणी अभिनेत्रीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@