वांद्रे स्थानक प्रकरणामध्ये विनय दुबेला अटक

    15-Apr-2020
Total Views |

vinay dubey_1  
मुंबई : मुंबईतल्या वांद्रे स्थानकाबाहेर लॉकडाऊनच्या काळात देखील गर्दी जमवल्याप्रकरणी विनय दुबे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईच्या ऐरोलीमधून त्याला अटक करण्यात आले आहे. तसेच, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कलम १४४चे उल्लंघन केल्याप्रकरणी ८००-१००० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
 
 
विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष आहे. मुंबईत मजुरी काम करणाऱ्या मजुरांशी त्याचा जास्त जनसंपर्क आहे. लॉकडाऊनच्या काळात मजुरांची दिशाभूल केल्याने त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विनय दुबेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी १८ एप्रिलपर्यंत ट्रेनची सोय केली नाही तर देशव्यापी आंदोलनाचा इशारा त्याने दिला होता. तसेच त्याने यासंबंधी फेसबुक पोस्ट लिहून आणि ट्विट करून चेतावणी दिली होती.
 
 
स्थलांतरित मजुरांना १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन शिथील होईल, असे त्यांना वाटले होते. तसा त्यांनी अंदाज बांधला होता. परंतू मोदींनी मंगळवारी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साडे चार वाजता वांद्र्याच्या स्टेशनबाहेर हजारो मजूरांनी एकत्र येऊन गोंधळ केला. याच प्रकरणी विनय दुबेवर आरोप ठेवत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.