ईएमआयमधील सूट सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याची गरज : रजनीश कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2020
Total Views |

Moratorium _1  


दिल्ली : कोरोना विषाणूमुळे आरबीआयने बँकांना ग्राहकांच्या ईएमआयला तीन महिन्यांची सूट देण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक बँकांनी त्याची अंमलबजावणीही केली आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी ही तीन महिन्यांची सूट सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. कोरोना विषाणूचा सामना करण्यात बँकाकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाची भूमिका महत्त्वाची असू शकते, असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर कॉर्पोरेट कर्जावर बँकांना गॅरंटी देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.


कोरोना विषाणूमुळे केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे आरबीआयने सर्व भारतीय बँका आणि भारतीय आर्थिक संस्थांना १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० दरम्यानचे ईएमआय ३ महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यास सांगितले. ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी आरबीआयने बँकांना सूचना केली होती. त्यानंतर सरकारी बँकांसह खासगी बँकांनीही ग्राहकांना याचा फायदा दिला.


कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना हप्ते फेडण्यास समस्या उद्भवू शकते. रजनीश कुमार पुढे म्हणाले की, सर्वांत आधी एकत्रित स्तरावर अर्थव्यवस्थेस सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर वाहतूक, हॉटेल, रेस्तराँ आणि इतर सेक्टर्सला एक-एक करुन मदत करण्याची गरज आहे.


लॉकडाऊनमुळे बहुतांश कंपन्या संकटातून जात आहेत. त्यांच्याकडे रोख रकमेचा अभाव दिसत आहे. त्यामुळे भविष्यात कॉर्पोरेट कर्जाची मागणी वाढू शकते. सरकारकडून कर्जासाठी गॅरंटी मिळाल्यानंतर बँकांना कर्ज देण्यास सोपे जाईल, असेही त्यांनी म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@