कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबईला इस्रायलचीही साथ

    15-Apr-2020
Total Views |

israyl_1  H x W




मुंबई :  कोरोनामुळे लॉकडाउन अनुभवत असताना भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आणखी पुढे नेण्यासाठी तसेच महाराष्ट्र शासन आणि मुंबई स्थित स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने सर जे जे हॉस्पिटल्मधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी तसेच खोतवाडी, सांताक्रुझ स्थित त्रिरत्न प्रेरणा मंडळ या सार्वजनिक शौचायलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला हॅंड सॅनिटायझर आणि ऑटोमॅटिक सोप डिस्पेन्सरचे वाटप केले. हा प्रयत्न मशाव या इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीमुळे साध्य झाला.



१११ _1  H x W:



मशावची स्थापना इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांनी १९५८ साली त्या परराष्ट्र मंत्री असताना केली होती. आजवर मशावने शंभराहून अधिक देशांतील लाखो प्रशिक्षक तसेच तज्ञांचे प्रशिक्षण केले आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या काळातही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मशावने प्रशिक्षणाचे कार्य सुरु ठेवले आहे.इस्रायलचा वाणिज्य दूतावास महाराष्ट्र शासनाच्या जे जे हॉस्पिटलसोबत गेली काही वर्षं काम करत असून त्यात डॉक्टरांना प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इस्रायलला पाठवणे तसेच मुंबईत मेडिकल क्लाउन (विदूषक) सारख्या गोष्टींची ओळख करुन देणे इ. गोष्टींचा समावेश आहे.




या पार्श्वभूमीवर इस्रायलचे कॉन्सुल जनरल याकोव्ह फिंकलश्टाइन म्हणाले,” करोना व्हायरसमुळे आपल्याला एकमेकांपासून अंतर राखायचे असले तरी या महामारीविरुद्धच्या सहकार्यामुळे भारत आणि इस्रायल आणखी जवळ आले आहेत. हे आपल्या सर्वांसमोरील आव्हान असून त्याचा आपण एकत्रितपणे सामना करायचा आहे.” त्रिरत्न प्रेरणा मंडळाचे दयानंद मोहिते म्हणाले,”एक संस्था म्हणून आम्ही इस्रायली वाणिज्य दूतावासासोबत गेली आठ वर्षं काम करत आहोत. दरवर्षी आमच्याकडे इस्रायली विद्यार्थी/स्वयंसेवकांचा एक ग्रुप येत असून त्यांच्या माध्यमातून आम्ही खोतवाडी परिसरातील वस्त्यांमध्ये काम करतो. या मदतीमुळे आम्हाला लोकांमध्ये स्वच्छतेच्या सवयींबद्दल जागरुकता निर्माण करता येईल.