मुंबई महापालिकेकडून खबरदारीचा उपाय; महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती
मुंबई : कोरोना विषाणूंचा फैलाव मुंबईत दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वरळी, लोअर परेल, धारावी, दादर ही ठिकाण कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता वरळी आणि धारावी भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
“वरळी आणि धारावी परीसरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महापालिका हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा डोस देणार आहे. वय वर्ष १८ ते ५५ वयोगटातील निरोगी नगारिकांनाही हा डोस दिला जाणार आहे,” असेही महापौर म्हणाल्या.
“ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यासारखे आजार नाही, त्यांना या गोळ्या दिल्या जाणार आहे. या दाट लोकसंख्येच्या भागातील गर्दी आणि संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हे औषध दिले जाणार आहे. धारावीतील ५० हजार आणि वरळीतील ५० हजार नागरिकांपैकी ज्यांना आजार नाही त्यांना आजपासून या गोळ्या दिल्या जाणार आहेत,” असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
पुढील सात आठवडे हे औषध देण्यात येणार आहे. पहिल्या आठवड्यात प्रत्येकी २ गोळ्या आणि पुढील प्रत्येक आठवड्यात १ गोळी देण्यात येणार आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध देण्यात येईल. तसेच कोणत्याही प्रकारचा अपाय त्यामुळे होणार नाही. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येणार आहे, असेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.