गायत्री-उपासना (भाग १)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2020
Total Views |
gaytri upasana_1 &nb
‘ओ३म्’ अर्थ व महत्त्व
ओ३म् भूर्भुवः स्वः।
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो नः प्रचोदयात् ॥
(ऋ.३।६२।१०, यजु. ३६।३,
साम. ६।३।१०)


अन्वयार्थ

(ओ३म्) हे सर्वत्र व्यापक, सर्वरक्षक परमेश्वरा! तू (भूः) सत्, प्राणस्वरुप, स्वयंभू (भुवः) चित्, समग्र दुःखे दूर करणारा, (स्वः) आनंद स्वरुप, सुखदाता आहेस. (तत्) अशा त्या (सवितुः) सकल जगताच्या उत्पत्तीकर्त्या, निर्मात्या (देवस्य) दिव्य गुणांनी युक्त देवाच्या (वरेण्यम्) वरणीय स्वीकारण्यायोग्य गुणांचे व (भर्गः) पवित्र व शुद्ध स्वरुपाचे (वयम्) आम्ही सर्वजण (धीमहि) ध्यान करतो. त्यास जीवनी धारण करतो. (यः) असा जो महान ईश्वर (नः) आम्हा भक्तजनांच्या (धियः) बुद्धींना व कर्मांना (प्रचोदयात्) नेहमी सत्प्रेरणा देवो, सन्मार्गावर नेवो!


विवेचन

आज सकल प्राणिसमूह व त्यातही मानवसमाज मृत्युभयाने त्रस्त झाला आहे. भौतिक साधने, धनवैभव, पैसा-अडका आणि सर्व प्रकारच्या सुविधा असूनही मानसिकदृष्ट्या तो पोखरलेला आहे. आधिदैविक, आध्यात्मिक व आधिभौतिक या त्रिविध दुःखांनी (तापांनी) वेढलेला माणूस किंकर्तव्यमूढ बनला आहे. अनेक उपाय शोधण्याची त्याची धडपड त्याला शाश्वत वळणावर येऊ देत नाही. कारण, त्याचा प्रयत्न हा योग्य दिशेने झालेलाच नसतो, पण वेदमार्ग म्हणजेच ज्ञानमार्ग हाच त्यासाठी एकमेव आश्रमस्थान ठरतो. कारण, वेद (ज्ञान) हे शाश्वतसुखाचे केंद्र आहेत. त्याच वेदराशीतील सर्वाधिक श्रेष्ठ मंत्र म्हणून वरील मंत्राचे माहात्म्य आहे. जगाच्या पाठीवर आस्तिक्य भाव बाळगणारा जो कोणी ईश्वरभक्त असेल, तो या मंत्राला उच्चारतो, जपतो किंवा त्याचे ध्यान करतो. या मंत्राला न ओळखणारा अज्ञ माणूस क्वचितच सापडेल.


लहान बाळ विद्याग्रहणासाठी पितृकुल सोडून गुरूकुलात प्रविष्ट होते, तेव्हा आचार्य त्यास आपल्या सान्निध्यात ठेवून सर्वप्रथम त्याचा ‘व्रतबंध’ म्हणजेच उपनयन संस्कार करतात. यालाच ‘यज्ञोपवीत संस्कार’ असेही म्हणतात. त्यानंतर ब्रह्मचारी बटूच्या विद्याग्रहणास प्रारंभ होतो. यावेळी आणखी एक महत्त्वाच्या संस्कार होतो तो म्हणजे, ‘वेदारंभ संस्कार’! विद्येचा आरंभ तर घरी माता-पित्यांच्या घरीच होतो, पण विशेष ज्ञान म्हणजेच वेदज्ञान ग्रहणाचे पवित्र कार्य गुरुंद्वारे सुरू होते. याप्रसंगी गुरू (आचार्य उपाध्याय) हे पहिल्यांदा हा वरील मंत्र बटूस शिकवितात, म्हणून याला ‘गुरुमंत्र’ म्हणतात. दुसर्‍या एका अर्थाने इतर मंत्रापेक्षा हा मंत्र मोठा (गुरु) गहन अर्थ व भाव अभिव्यक्त करणारा असल्या कारणानेदेखील यास ‘गुरुमंत्र’ म्हटले जाते. या मंत्राचा प्रतिपाद्य विषय (देवता) हा ‘सविता’ असल्याने याला ‘सावित्री मंत्र’ असे म्हणतात. त्याचबरोबर यास बहुतांश ‘गायत्री मंत्र’ या नावाने सर्वत्र ओळखले जाते. त्याचे कारण ‘तत्सवितुर्वरेण्यं’पासून ‘प्रचोदयात् ’पर्यंत गायत्री छंदाची अक्षर संख्या आहे, म्हणून ‘गायत्री मंत्र’! किंवा ‘गायन्तं त्रायते इति गायत्री’ या व्याख्येनुसार या मंत्राचा अर्थपूर्वक जप किंवा गायन करणार्‍याचे त्राण (रक्षण) होते. म्हणून यास ‘गायत्री मंत्र’ असे संबोधण्यात येते. त्याच बरोबरच ईश्वराची स्तुती, उपासना व प्रार्थना या तीन तत्त्वांचा त्रिवेणी संंगम या मंत्रात असल्याने हा मंत्र इतर सर्व मंत्रापेक्षा सरस सर्वोत्तम व महदाशय असल्याकारणाने यास ‘महामंत्र’ असेही म्हणतात.


अशा या सर्वोत्तम मंत्रात प्रारंभी ‘ओ३म्’ हा प्रणव शब्द योजिला आहे. तसे तर प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला व शेवटी ओ३म् उच्चारण्याची परंपरा आहे. कारण, ओ३म् हे ईश्वराचे मुख्य नाव आहे. महर्षी मनू याविषयी म्हणतात -


“ब्रह्मणः प्रणवं कुर्यादादावन्ते च सर्वदा।” 


अर्थात, वेदमंत्राच्या प्रारंभी व शेवटी नेहमीच प्रणव म्हणजे ‘ओ३म्’चा प्रयोग करावा. तशी ईश्वराची गुणवाचक व कर्मवाचक खूप नावे आहेत. उदा. ब्रह्मा, महादेव, विष्णू, रुद्र, आदित्य, नारायण, गणेश, महेश, वरुण, सविता, सच्चिदानंद इत्यादी! पण, सर्वात श्रेष्ठ अशा सर्वांनाच उच्चारण करण्यास सोप्या वाटणार्‍या ‘ओ३म्’ शब्दात जो गहन अर्थ दडला आहे, तो इतरांत नाही. म्हणूनच महर्षी पतंजली म्हणतात - ‘तस्य वाचकः प्रणवः।’ त्या क्लेश, कर्म, विपाक आशय इत्यादींपासून दूर (वेगळा) असलेला ईश्वराचा वाचक शब्द ‘प्रणव’ (ओ३म्) आहे. कठोपनिषदातदेखील म्हटले आहे - ‘तत्ते पदं संग्रहेण ब्रवीमि ‘ओ३म्’ इत्येतत।’ ज्या पदाचे(शब्दाचे) उच्चारण, पुरश्चरण वेद करतात आणि ज्यासाठी तपस्वी व ब्रह्मचारी साधक अहर्निश तपाचरण करतात, ते पद संक्षिप्तरुपाने ‘ओ३म्’ हेच आहे, असे मी सांगतो.


ओंकाराचा अर्थ खूपच व्यापक आहे. अनेक स्मृति, उपनिषद व ब्राह्मणग्रंथात याचे अर्थ विवेचन करण्यात आले आहे. ‘ओ३म्’ हे पद आप्लृ व्याप्तौ व अव् रक्षणे या दोन धातूंपासून बनतो. याचा अर्थ जो सर्वव्यापक आणि सर्वांचे रक्षण करणारा आहे. तो ‘ओ३म्’ होय. यात ‘अ‘, ‘उ’, ‘म्’ या तीन अक्षर किंवा मात्रा आहेत. या तिन्ही अक्षरांतून परमेश्वराच्या विविध नामांचा बोध होतो. मांडुक्य उपनिषदात म्हटले आहे.


‘अ’कार म्हणजे ईश्वराचे जागृतस्थान व त्याचे वैश्वानर (नेता) रुप, ‘उ’कार म्हणजे त्याचे स्वप्नस्थान व तैजस रुप आणि ‘म’कार म्हणजे त्या भाग्यवंतांचे सुषुप्त स्थान व प्राज्ञारुप! ‘अ’ म्हणजे सृष्टीचा कर्ता व निर्माता. ‘उ’ म्हणजे सृष्टीला धारण करणारा विधाता आणि ‘म्’ म्हणजे सृष्टिहर्ता! अर्थात उत्पत्ती, स्थिती व प्रलयकर्ता ईश्वर असा ‘ओेंकारार्थ’ होय. वेद व व्याकरणशास्त्राचा आधार घेतल्यास ‘अ’ या अक्षराचे विराट, अग्नी, विश्व असे तीन अर्थ होतात, तसेच ‘उ’ म्हणजे हिरण्यगर्भ, वायू, तैजस आणि ‘म्’ म्हणजे ईश्वर, प्राज्ञ व आदित्य असे तीन अर्थ होतात. ‘ओ३म्’ हा ईश्वरवाचक शब्द उच्चारताच साधकाच्या मनात हे सर्व एकाच वेळी व्हावयास हवेत. केवळ शब्दांचे उच्चारण नको, तर एकाग्रतेने अर्थ व भाव यांच्याशी आपल्या आत्म्याचा संबंध जोडला पाहिजे. यासाठीच महर्षी पतंजलींनी स्पष्टपणे सांगितले आहे.


‘तज्जप: तदर्थभावनम्’ अशा ‘ओ३म्’ जपामुळे कोणता लाभ होतो? याविषयी ते म्हणतात, ‘तत:प्रत्यक्चेतनाधिगमोऽ प्यन्तरायाभावश्च।’


‘ओ३म्’ नामाच्या अर्थपूर्ण जपामुळे आत्मज्ञान व आत्मचैतन्याची प्राप्ती होते आणि विघ्ने पण नाहीशी होतात. ‘ओ३म’ हे ईश्वराचे नाव कसे आहे? तर ते आकाशाप्रमाणे सर्वव्यापक आणि सर्वांमध्ये मोठे बृहत् महान आहे. यजुर्वेदात याचे प्रमाण आले आहे. ‘ओ३म् खं ब्रह्म:।’ (यजु. ४०।१७) मानवाचे मुख्य कार्य म्हणजे अशा भगवंताचे (ओ३म्चे) स्मरण!

ओ३म् क्रतो स्मर । (यजु ४०।१५)
ओ३म् प्रतिष्ठ (यजु २।१३)


हे कर्मशील माणसा, त्या परमेश्वराच्या ओ३म् नामाचे स्मरण कर आणि त्याच नावावर आपली पूर्ण प्रतिष्ठा व आस्था विश्वास ठेव. खरेतर जन्म-मृत्यूच्या भवसागराला तरावयाचे असेल तर प्रणव (ओ३म्)चे अर्थासह उच्चारण व जप हेच एक महत्त्वाचे साधन आहे. ‘प्रणव’ या शब्दाची उत्पत्ती ‘प्र + नवति इति’ अशी होते. म्हणजेच ईश्वराचे ‘ओ३म्’ना हे नेहमी (नित्य) नूतन असते. ते कधीच जुने भासत नाही. एकांत स्थळी शांत वातावरणात एक विशिष्ट जे की, आपल्याला सुखपूर्ण भासेल (स्थिर सुखम् आसनम्) अशा आसनात बसून मनाला सर्व विषयांपासून दूर सारत नासिकाग्र, भ्रूकुटीमध्य, हृदयस्थान यांपैकी एके ठिकाणी ध्यान लावत ‘ओ३म्’ शब्दरुपी धनुष्यावर आत्मा हा बाण चढवला आणि ब्रह्म ईश्वर हेच अंतिम लक्ष्म ध्येय वेधावे, याकरिता योगसाधक भक्तास सर्वप्रकारच्या विकार व प्रसाद दोषापासून दूर राहावे लागेल आणि तन्मय बनावे लागेल.
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य 
@@AUTHORINFO_V1@@