आनंदवनभुवनी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2020
Total Views |
samarth ramdas_1 &nb

समर्थ रामदासांनी लिहिलेले ‘आनंदवनभुवनी’ हे ५९ कडव्यांचे ‘अनुष्टुप’ एक अप्रतिम काव्य आहे. त्यातील शब्दयोजना, भावनांचा आवेश, विचारांचे अर्थसौंदर्य यांचा आस्वाद घ्यायचा, तर ते काव्य मुळातूनच वाचले पाहिजे. तसेच त्यातील गेयतेची गोडी विचाराबरोबर कळेल. म्लेंच्छांची जुलमी सत्ता हे आमच्या देशावर, संस्कृतीवर आलेले मोठे संकट होते, मोठे विघ्न होते. त्या विघ्नांचा नाश करून आमच्या संस्कृतीला मोकळा श्वास घेता यावा, यासाठी कठोर परिश्रम घेणे आवश्यक होते. या म्लेंच्छरुपी संकटाचा नाश करून ‘निर्मळ जाहली पृथ्वी’ असे पाहावे, हे स्वामींचे ध्येय होते. आमचे खवळलेले देव या उत्तुंग ध्येयासाठी आम्हाला साहाय्य करणार आहेत. ही विघ्ने मोडून काढली, तरच लोकांना संस्कृती स्वातंत्र्याचा आनंद लुटता येईल. अशी कल्पना स्वामींच्या स्वप्नांच्या मुळाशी आहे. स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी तशाच प्रत्यक्षात उतरत आहेत, असा अनुभव आल्याने स्वामींना आनंद झालेला दिसतो. त्या आनंदाने स्वामींचे उत्फुल्ल मन या काव्यात प्रगट झाले आहे. रामदासांच्या या कवितेतील आवेश गद्यात मांडणे सर्वथा अशक्य आहे. यासाठी ते काव्य मुळातून वाचावे आणि त्यातील आवेश, ओघवती वाणी, विचारगांभीर्य, विस्तार पावलेली स्वप्नांची क्षितिजे पाहावीत, यासारखा आनंद नाही. रामदासांनी रामराज्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. सात्विक पातळीवर संघटना उभारून त्या संघटनेचा उपयोग हिंदवी स्वराज्य साहाय्यासाठी करण्याचे क्रांतिकारी कार्य स्वामी करीत होते. परिणामस्वरूप ते प्रत्यक्षात उतरत असलेले स्वामींनी पाहिले. तेव्हा त्यांच्या मनाला झालेला आनंद या वाक्यातून व्यक्त झाला आहे.


गुरुदेव रा. द. रानडे यांनी त्यांच्या या ‘Mysticism in Maharashtra’ ग्रंथात लिहिले आहे की, “Anandavana Bhuvana, the ‘Region of Bliss’ in which Ramadasa gives free vent to his political sentiments.'' याचा अर्थ रामदासांच्या मनात जो राजकीय स्थायीभाव निर्माण झाला होता किंवा त्यांच्या मनात जे राजकीय विचार दाटून आलेले होते, त्यांना रामदासांनी ‘आनंदवनभुवनी’ या काव्यात मोकळेपणाने वाट करून दिली आहे. रामदासांच्या मनातील राजकीय स्वप्न अथवा राजकीय ध्येय या काव्यात निःसंशय


प्रगट झाले आहे, असे म्हणावे लागते. गुरुदेव रानडे पुढे लिहितात, “आनंदवनभुवनी या काव्यात रामदासांनी पुढे काय घडणार आहे ते नजरेसमोर आणून आपले विचार प्रगट केले आहेत.” शंकरराव देवांचेही मत असेच आहे. त्यांच्या मते, रामदासांचे ‘आनंदवनभुवनी’ हे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. पुढे घडणार्‍या गोष्टी समर्थांनी आधीच सांगितल्या म्हणून त्या काव्याला कोणी ‘श्रीसमर्थकृत भविष्यपुराण’ म्हणतात. समर्थांनी या काव्यात लिहिले आहे की,


स्मरले लिहिले आहे ।
बोलता चालता हरि ।
काय होईल ते पाहावे ।
आनंदवनभुवनी ॥ ५७ ॥


समर्थ म्हणतात, पुढे घडणार्‍या गोष्टी जशा आठवतील तशा लिहून काढल्या. म्हणून या प्रकरणास ‘समर्थस्मृती’ असेही कोणी नाव देतात. या काव्यातील प्रत्येक चरण हा विचार करण्यासारखा आहे.


स्वामींचे ‘आनंदवनभुवनी’ हे काव्य मोठे प्रेरक आहे. ते वाचत असताना एक विलक्षण जोम अथवा प्रोत्साहन आपल्या मनात उत्पन्न होते. लेखक भा. वा. भट यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “प्रचलित जुलमी राजसत्ता उलथवून पाडून त्या ठिकाणी नूतन राजसत्ता प्रस्थापित करायची असेल, तर प्रचलित राजसत्तेसंबंधी लोकांच्या मनात द्वेष वाटायला लावणे व नूतन राजसत्तेसंबंधी प्रेम व आदर उत्पन्न होईल, अशा हालचाली कराव्या लागतात. शिवकालीन महाराष्ट्रात या हालचाली करण्याचे श्रेय रामदासस्वामींनाच दिले पाहिजे.” ‘आनंदवनभुवनी’ या काव्यात रामदासांनी हे साधले आहे. श्री. म. माटे म्हणतात त्याप्रमाणे, “ ‘आनंदवनभुवनी’ या काव्यातील नुसत्या ध्वनीने आपण एखाद्या मोठ्या आक्रमक कार्यप्रसंगात गुंतले आहोत व तसा प्रसंग प्रत्यक्ष पाहत आहोत असे वाटू लागते.” या काव्याच्या सुरुवातीस स्वामींनी, लोक जे दुःख भोगत आहेत, त्यासंबंधी वर्णन केले आहे.


संसार वोढिता दुःखे ।
ज्याचे त्यासीच ठाऊके ।
न सोसे दुःख ते होते ।
दुःख शोक परोपरी ॥३॥


एकंदरीने पाहता समर्थकालीन मुसलमानी राजवटीत हिंदूप्रजेची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. प्रजेला कोणी त्राता उरला नव्हता. जे दुःख वाट्याला आले, ते त्याचे त्यालाच सहन करावे लागत होते. दुसर्‍या कोणाला सांगून उपयोग नव्हता. त्यावेळी सामान्य माणूस म्हणत होता की, हे देवा, आता पुष्कळ दुःख सोसले. पुरे झाला आता हा संसार. देहत्यागासाठी आता ‘आनंदवनभुवनी’ यायचे आहे. स्वामींनी हे ‘आनंदवनभुवनी’ स्वप्नात पाहिले होते.


स्वप्नी जे देखिले रात्री ।
ते ते तैसोचि होतसे।
हिंडता फिरता गेलो ।
आनंदवनभुवनी ॥७॥


स्वामींनी स्वप्नात काय पाहिले होते आणि त्याप्रमाणेच सर्व घडून येताना दिसत आहे, असे स्वामी म्हणतात. यात स्वामींचा नेमके काय म्हणायचे आहे, याचा शोध घेतला पाहिजे. ‘विनाशाय च दुष्कृताम्’ त्यांच्या काळातील दुष्टांचा संहार व्हावा, अशी रामदासांची प्रबळ इच्छा होती. सज्जनांना, निरुपद्रवी ऋषिमुनींना त्रास देणार्‍या राक्षसांचा रामाने सर्वनाश केला होता. रामदासांच्या काळातही हिंदू धर्माचा उच्छेद करणारे म्लेंच्छ रावणाप्रमाणे मदांध दैत्याप्रमाणे क्रूरकर्मा होते. रामाने अवतार घेऊन जसा राक्षसांचा, राक्षसीवृत्तीचा, गर्विष्ठ रावणाचा नाश केला, तसा आता शिवरायांच्या अवताराने हिंदवी स्वराज्य उभारले जात असताना या दुरात्मा औरंगजेबाचा शेवट करावा. त्याचप्रमाणे म्लेंच्छांनी उच्छिन्न केलेली तीर्थक्षेत्रे, मंदिरे, देवळे पुनर्स्थापित करावीत, असे रामदासांना वाटत होते. तसे झाल्यावर धार्मिककृत्ये करायला हिंदूंना मोकळे वातावरण तयार होईल. तीर्थक्षेत्रातील उदंड पवित्र जलाचा लोक आनंद घेतील. पण, हे सारे सोप्पे नव्हते. ही भग्न मंदिरे, तीर्थक्षेत्रे पुनर्निर्मितीच्या कामात म्लेंच्छ अनेक विघ्ने निर्माण करतील, हे सर्वांना ठाऊक होते. पण रामदासांच्या मनात होते की, घाबरण्याचे कारण नाही. त्या कामात वीर हनुमान आपले साहाय्य करेल. या पवित्र कार्याच्या आड येणार्‍या विघ्नांना तो चिरडून रगडून टाकेल, असा विश्वास बाळगा. रामदासांना हे दिसत होते.


विघ्नांच्या उठिल्या फौजा ।
भीम त्यावरी लोटला ॥
घर्डिली चिर्डिर्ली रागे ।
रडविली बडविली बळे ॥१०॥



स्वधर्माच्या आड येणारी विघ्ने देवाने कापून काढली आहेत. स्वामींना हे चित्र स्पष्ट दिसत होते म्हणून ते पुढे म्हणतात, “हाकबोंब बहू जाली । पुढे खत्तल्ल मांडले।’ मुख्य देवच या कार्यासाठी उठल्याने लोकसुद्धा खवळून युद्धास तयार झाले आहेत. ‘आनंदवनभुवना’त पुढे असेही दिसत होते की, स्वर्गीची गंगा धावत आली आहे. त्यामुळे तेथील तीर्थाची तुलना कशाशी करता येणार नाही. पूर्वीच्या ग्रंथांतून सांगितले आहे की, गंगेच्या गुप्त प्रवाहात अनेक गुप्त भुवने आहेत. देवांची ही साक्षिरूप भुवने पाहून खूप आनंद होतो. तेथे त्रिभुवनातील देव, गंधर्व, मानव, ऋषिमुनी असे महायोगी पुरुष ब्रह्मांडाचा आनंद घेत आहेत.


सकळ देवांचिये साक्षी । गुप्त उदंड भुवने ।
सौख्यासी पावणे जाणे ।
आनंदवनभुवनी ॥१५॥
त्रैलोक्य चालिले तेथे । देव गंधर्व मानवी ।
ऋषिमुनी महायोगी ।
आनंदवनभुवनी ॥१६॥


समर्थवाङ्मयात अनेकदा मतभेदाचे प्रसंग येतात. ’आनंदवनभुवनी’ या शब्दसमुच्चयाचा अर्थ काय, याबद्दल विद्वानांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते, यातील वर्णन शिवकालीन महाराष्ट्राचे आहे. काहींच्या मते, हे वर्णन वाराणसी (काशी) क्षेत्रास लागू आहे. या वादातील निष्कर्षाप्रत पोहोचण्याच्या अगोदर हे मात्र समजून घेतले पाहिजे की, ’आनंदवनभुवनी’ काव्य लिहिताना स्वामींचे मन उत्साहाने, उल्हासाने, आवेशाने भरलेले होते


- सुरेश जाखडी
.
@@AUTHORINFO_V1@@