नव्या संधी घेऊन येणारी जागतिक मंदी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2020
Total Views |
Economy_1  H x


‘लॉकडाऊन’ काळात महिनाभर घरी बसल्याने नागरिकांच्या गरजा, सवयी यांमध्ये निश्चितच काही बदल होत आहेत. हे बदल ओळखून तुमच्या व्यवसायावर नेमका काय परिणाम करणारे आहेत? हे बदल तुमच्या व्यवसायासाठी चांगले आहेत की वाईट? याचादेखील सखोल अभ्यास करायला हवा.

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून जर आम्ही व्यवसायात असलो असतो तर आमच्या व्यवसायात आम्हाला खूप काही वेगळं आणि चांगलं करून दाखवता आलं असतं. आम्हीदेखील टाटा-बिर्ला होऊ शकलो असतो,” असे म्हणणार्‍या उद्योजक मंडळींसाठी सध्याचा काळ म्हणजे सुवर्णसंधी आहे. कारण असं म्हणतात की, संकट काळातच नवे नेतृत्व उभे राहते. संपूर्ण जगावर ‘कोविड-१९’ आणि जागतिक मंदीचे सावट असताना जग आमूलाग्र बदलातून जात आहे. येणार्‍या काही काळात आपण कोरोना विरुद्धची लढाई लवकरच जिंकूदेखील! परंतु, त्यानंतर येणार जागतिक आर्थिक मंदीचं संकट हे कोरोनाच्या संकटापेक्षा कैकपटीने मोठं असणार आहे.

या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वच सरकार प्रयत्न करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन ट्रिलियन डॉलरचे पॅकेज जाहीर केले, जे त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास १० टक्के एवढे आहे, तर आपल्या अर्थमंत्र्यांनी १.७० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले, जे आपल्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास केवळ ०.८० टक्के एवढेच आहे. कदाचित आपले सरकार आणखी मदत जाहीरदेखील करेल. पण, ही मदत आपल्या अर्थव्यवस्थेला किती मजबूत करेल, हे पाहावे लागेल.

आपल्या राज्याची आर्थिक परिस्थितीदेखील बेताचीच आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर तब्बल २५ हजार कोटींची महसुली घट ही मार्च २०२० मध्ये नोंदवली गेली आहे. या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्यांवर लवकरच जाणवायला लागेल. या सगळ्यासोबत खाजगी क्षेत्रातदेखील याचे पडसाद उमटायला लागले आहेत. देश ‘लॉकडाऊन’ झाल्यापासून देशातील विमान प्रवास, पर्यटन, हॉटेलिंग यांसारखे इत्यादी व्यवसाय पूर्ण पणे बंद झाले आहेत आणि हे व्यवसाय पुढील काही महिने नक्कीच या धक्क्यातून सावरणे अशक्य आहे. याचा परिणाम म्हणून या क्षेत्रातील लोकांच्या नोकर्‍या जाणं किंवा पगार निम्म्याने कमी होणं, या व इतर क्षेत्रातील घरी बसलेल्या अनुभवी लोकांचा तुम्ही कसा फायदा करून घेऊ शकता? कमी खर्चात उपलब्ध असलेले हे मनुष्यबळ तुम्ही कसे उपयोगात आणू शकता? हे तुम्ही हेरायला हवं.

‘लॉकडाऊन’ काळात महिनाभर घरी बसल्याने नागरिकांच्या गरजा, सवयी यांमध्ये निश्चितच काही बदल होत आहेत. हे बदल ओळखून तुमच्या व्यवसायावर नेमका काय परिणाम करणारे आहेत? हे बदल तुमच्या व्यवसायासाठी चांगले आहेत की वाईट? याचादेखील सखोल अभ्यास करायला हवा. ग्राहकांची मानसिकता आणि वर्तन यात होणारे बदल लक्षात घेता नव्या संधी दिसत असल्या तरीही त्या सोप्या नक्कीच नाहीत. ग्राहकांच्या मानसिकतेत होणारे बदल प्रादेशिक वा राष्ट्रीय स्तरापुरते मर्यादित न राहता, जागतिक स्तरावर असणार आहेत. अमेरिकेसारख्या प्रगत देशाला मागे टाकून चीन निर्यातीत प्रथम क्रमांकावर आहे. परंतु, ‘कोविड-१९’नंतर इतर देशांचा चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलत चालला आहे, ज्याचा फायदा करून घेण्याची भारताला ही सुवर्णसंधी चालून आली आहे. आजपासून एक दिवसाआड सुरु करत असलेल्या या नवीन लेखमालेत आपण उद्योगक्षेत्रात होणारे महत्त्वाचे बदल, ग्राहकांची बदलती मानसिकता, नव्या संधी आणि आव्हाने यांचा आढावा घेणार आहोत.

- प्रसाद कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@