दि. ८ सप्टेंबर १९८५ रोजी ‘वंचित विकास’ या ट्रस्टची पुण्यात स्थापना झाली. समाजातील अपंग, रोगी व्यक्तींसाठी केलेले काम म्हणजे फक्त सेवाकार्य आहे. पण, समाजाचे घटक असूनही आपल्या अधिकारांपासून वंचित असे दलित, भटके-विमुक्त, वनवासी, वेश्या आणि सर्व समाजातील स्त्रिया या वंचित गटांसाठी काम करणार्या ‘वंचित विकास’ ट्रस्टच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा.
१९७४च्या दरम्यानची गोष्ट. एक पीएच.डी करणारा तरुण बाबा आमटेंना भेटायला गेला. “माझे पीएच.डीचे काम झाल्यावर तुम्हाला पटत असेल तर तुमच्याकडे यायला तयार आहे आयुष्यभरासाठी.” बाबा म्हणाले, “आयुष्यभराची कमिटमेंट देऊ नकोस. अजून लहान आहेस. मलाच कधी कधी फार निराशा येते. इतकी वर्षे काम करुनही समाज जसा होता तसाच आहे.” “असे का म्हणता बाबा? तुम्ही महारोग्यांसाठी काम केले, महारोगी उभे राहत आहेत. अजून सगळ्या समाजात काम केलेले नाही, मग सगळ्या समाजात परिवर्तन कसे येणार?” बाबा गरजले ,“स्टॅण्ड अप अॅण्ड गेट आऊट.” तरुण चरकला आणि त्यांना कारण विचारता झाला, तर बाबा म्हणाले, “तू स्वतंत्र विचारांचा आहेस. तू माझ्याकडे न राहिलेले बरे. एका मोठ्या वृक्षाखाली दुसरे वृक्ष वाढत नाहीत.” एका वटवृक्षाने दुसर्या वटवृक्षाला दिलेला बहरण्याचा तो आशीर्वाद होता. समाजकार्याचे इवलेसे रोप मनात असलेला तो तरुण म्हणजे पुण्यातील ‘वंचित विकास केंद्र’ या संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर.
शिक्षणशास्त्रातील पीएच.डी. हातात घेऊन खरं तर त्यावेळी चार आकडी पगाराचे आणि सुखवस्तू जगण्याचे स्वप्न पूर्ण झाले असते, पण इथे स्वप्न होते समाजातील वंचितांसाठी कल्पवृक्ष होण्याचे. समाजकार्य करायचे असेल तर समाजातील घटकांचे संघटन होणे आवश्यक आहे, ही जाणीव मनात घेऊन अनेक वर्षे भारतभर हिंडून समस्यांवर बोलण्याचे काम सुरू झाले. विलास चाफेकर यांनी १९८२ मध्ये ‘जाणीव’ संघटनेची स्थापना झाली. समाजातील सर्व घटकांना जगण्याचा अधिकार आहे. काही मूलभूत हक्क आहेत, याची सामाजिक ‘जाणीव’ देणारी ही संघटना म्हणजे ‘जाणीव.’ समाजातील वंचित घटकांसाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्थित्यंतर घडवून आणणे आणि जगण्याचे मूलभूत अधिकार मिळवून देणे हे जाणीव संघटनेचे लक्ष्य आहे. अभ्यास वर्ग, पथनाट्ये अशा विविध माध्यमांतून समाजजागृतीसाठी सेतू बांधला जाऊ लागला. पुण्यातील फेरीवाल्यांच्या समस्या ओळखून त्यांना नोंदणी प्रमाणपत्रे, परवाने मिळवून देणे, हप्ते देण्याच्या आणि अनधिकृत स्टॉल्स उचलून नेण्यामुळे होणार्या रोजच्या मनस्तापातून बाहेर काढून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे काम ‘जाणीव’ने केले.विमा, पेन्शन अशा अनेक जीवनावश्यक सुविधांशी फेरीवाल्यांची ओळख झाली. हा वृक्ष एकाच बहराची फुले लावणार नव्हता.‘जाणीव’चे पुढचे पाऊल एका वेगळ्या क्षेत्रात पडायचे होते. सामाजिक कामासाठीच पुण्याजवळच्या नांदेड गावी भेट दिली असता तेथील गोसावी समाजाच्या समस्या पाहिल्या आणि या लोकांसाठी ‘जाणीव’ संघटनेने काम करायचे ठरवले.
गोसावी समाजात असलेल्या अनेक जमातींपैकी ‘राखोळ्या’ समाजाची इथे वस्ती होती. महिन्याला ५० रुपयांसाठी म्हशी राखणारी ही वस्ती. या समाजाला ‘जाणीव’ संघटनेने जगण्याचे अधिकार मिळवून दिले. बँकेची कर्जे मिळवून दिली. स्वतःच्या हक्काच्या रोजगारासाठी ढोलपथके स्थापली गेली. लघुउद्योग सुरू केले गेले.आर्थिक समायोजनापाठोपाठ मुलांना शिक्षण, मुलींच्या शिक्षणाबाबत जागरुकता हे सारे करता करता या समाजाचे रुप बदलले गेले. आज ही वस्ती चाफेकर यांना देव मानते.वंचितांनी अक्षरांशी मैत्री करायची असेल तर तिथे अक्षरे पोहोचवायला हवीत या जाणिवेतून लहान मुलांसाठी ‘निर्मल रानवारा’ हे मासिक सुरू झाले. आजही या मासिकाचे काम ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अव्याहत सुरू आहे. वाचन आणि लेखन दोहोंसाठी मुलांना प्रोत्साहन दिले गेले. वाचन आणि त्याबरोबरच लेखन करण्यास प्रोत्साहित करणारा लहान मुलांचा अंक म्हणजे ‘निर्मळ रानवारा’. ‘वंचित विकास’ या संस्थेच्या विविध उपक्रमांबरोबरच सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम. अनेक संकटे येऊनही ‘निर्मळ रानवारा’ हा अंक प्रकाशित करण्याचा उपक्रम वर्षांनुवर्षे यशस्वीरित्या राबविला जातो आहे. मुलांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन, विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांना तसेच मोठ्यांनाही लेखनासाठी प्रोत्साहित करण्याचे कार्य या अंकाच्या निमित्ताने करण्यात येते. आज सर्वत्र प्रसिद्ध असलेले ‘तोत्तोचान’ याच ‘रानवारा’ मासिकातून प्रसिद्ध झाले होते.
दि. ८ सप्टेंबर १९८५ रोजी ‘वंचित विकास’ या ट्रस्टची स्थापना पुण्यात केली गेली. समाजातील अपंग, रोगी व्यक्तींसाठी केलेले काम म्हणजे फक्त सेवाकार्य आहे. पण, समाजाचे घटक असूनही आपल्या अधिकारांपासून वंचित असे दलित, भटके-विमुक्त,वनवासी,वेश्या आणि सर्व समाजातील स्त्रिया या वंचित गटांना समाजात सामावून घेणे हे व्यापक लक्ष आहे, हे तत्त्व मनात ठेवून चाफेकर यांनी ‘वंचित विकास केंद्रा’चे छत्र उभारले. वंचित गटातील मुलांसाठी ‘अभिरुची’ हा गट स्थापला गेला. ‘अभिरुची’ हा व्यक्तिमत्व विकास गट आहे. अजूनही सर्व समाजात स्त्रिया आणि मुले सर्वात जास्त वंचित घटक आहेत, असे विलास चाफेकर म्हणतात.
‘वंचित विकास’ संस्थेने पुण्यातील बुधवार पेठेतील अनेक वेश्यांचे पुनर्वसन करण्याचे काम केले आहे. आजतागायत ४० वारांगनांना या फासातून मुक्त करून मार्गी लावले आहे. सगळ्याच स्त्रियांना या व्यवसायातून बाहेर काढणे अशक्य आहे, पण त्यांना त्यातही चांगले जगण्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षण देणे गरजेचे झाले. या स्त्रियांना बचत करायला शिकवणे, वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे, त्यांच्या मुलांसाठी देखभाल केंद्र सुरु करणे अशी अनेक कामे वंचित विकास आज करत आहे. सुरुवातीला दवाखान्यात यायला कचरणार्या या स्त्रियांसाठी वैद्यकीय सेवा मोबाईल व्हॅन प्रथम सुरू केली. त्यांचा विश्वास संपादन केल्यावर आज तिथेच दवाखाना सुरू आहे. एचआयव्ही आणि इतर गुप्तरोगांबद्दल जागरुक करणे, निरोध वापरण्याची गरज समजावणे, स्वच्छतेचे महत्त्व समजावणे, टिबीसारख्या आजारांसाठी औषधोपचार देणे, हे सगळे या कार्यात अंतर्भूत होतेच, पण एचआयव्हीग्रस्त रुग्णांसाठी ‘स्पृहा’ हे देखभाल केंद्रही सुरू करण्यात आले. पुढे वैद्यकीय सेवेबद्दल पुरेशा जागृतीनंतर हे केंद्र बंद केले गेले. पण या केंद्राचे योगदान मोठे होते. या वेश्या व्यवसायातील स्त्रियांची मुले या वातावरणापासून दूर नेऊन शिक्षित करणेही महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांना या आयुष्यापासून दूर ठेवले पाहिजे, शिक्षण देऊन वेगळे आयुष्य घडवले पाहिजे, ही जागृती फक्त देऊन उपयोग नव्हता. त्यासाठी उत्तरही हवे होते म्हणूनच वेश्यांच्या मुलांसाठी निवासी व्यवस्थापन देण्यासाठी ‘नीहार’ या वसतिगृहाची ५ जुलै १९८९ रोजी स्थापना झाली. आज ‘नीहार’मधून सुशिक्षित झालेली एक पिढी समाजात सन्मानाने जगत आहे. साधारण शंभरहून अधिक मुले ‘नीहार’मधून सुशिक्षित झाली आहेत. अजूनही सगळीच वेश्यावस्तीतील मुले-मुली ‘नीहार’मध्ये पोहोचलेली नाहीत हे खरे, पण त्यासाठी ‘वंचित विकास’चे अथक प्रयत्न सुरू आहेत. सगळीच मुले ‘नीहार’मध्ये येऊ शकत नाहीत, हे लक्षात आल्यावर वेश्यावस्तीतच ‘फुलवा’ हे केंद्र सुरू झाले. जिथे बालवाडी, देखभाल केंद्र, संगणक शिक्षण अशा सुविधा दिल्या गेल्या आहेत.याबाबत चाफेकर यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले की, “देहविक्री करणार्या महिलांचे विश्व हे प्रत्यक्षात वेगळे असते. त्यातील न दिसणारे वास्तव विलास चाफेकर यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून समोर आणले आणि खर्या अर्थाने या महिलांना त्यांची ओळख झाली. त्यांनी माणसापलीकडची माणसे शोधली आणि त्यांची खर्या अर्थाने पूजा केली. अंधारातले कवडसे कोणालाच दिसत नाहीत, त्यांना उजेडात आणण्याचे काम चाफेकर यांनी त्यांच्या कार्यातून केले आहे.”
लातूर भूकंपांनंतर ‘जाणीव’ संघटनेने लातूर येथील दुर्बल घटकांना पायावर उभे राहण्यासाठी मदत केली होती. आर्थिक दुर्बल गटातील या विभागातील घटस्फोटित, विधवा व परित्यक्ता महिलांसाठी ‘सबला महिला केंद्र, लातूर’ स्थापित झाले. स्त्रियांना आत्मविश्वास देऊन स्वबळावर उभे राहण्याची ताकद देऊन उभे करणारी ही संस्था अनेकजणींचे जीवनामृत ठरली आहे. ‘सबला महिला केंद्र’ म्हणजे वंचित विकासने रेखलेला स्वाभिमानाने जगण्याचा राजमार्ग आहे.आजतागायत ४५० महिला इथून व्यवसाय शिक्षण घेऊन गेल्या आहेत. प्रशिक्षित करुन, पुनर्वसन करुन अने वंचित स्त्रियांचे जगणे सुकर झाले आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावात ग्रामीण विभागातील महिला सबलीकरणाचे कार्य स्पृहणीय आहे. जुन्नर येथील माणिकडोह धरणग्रस्तांसाठी पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेऊन प्रशिक्षणाने हा गट सबल बनवण्याचे काम ‘वंचित विकास’ने आपल्य अथक श्रमांनी करुन दाखवले आहे. स्त्रियांमधील अजून एक ‘वंचित’ घटक वनवासी मुली. पाटणबोरी येथे वनवासी मुलींचे वसतिगृह त्यांच्या सुरक्षित शिक्षणासाठी सुरू केले आहे.
भोपाळ येथे एका कार्यक्रमासाठी गेलेले असताना चाफेकर यांना नवीन समस्या तिथे दिसली. धरणामुळे वंचित झालेल्या भूधारकांची परिस्थिती अवघड झाली होती. पावसाळ्यात पाणी उतारावरुन वाहून जाणे , जमिनी कोरड्या पडण्याची समस्या जमिनीवर पाणी अडवण्यासाठी त्यांच्या जमिनी समतल करुन, बंधारा बांधण्याची अभिनव कल्पना राबवली गेली. नापीक झालेल्या शेतजमिनी सुपीक करुन ’सुजलाम् सुफलाम्’ करण्याचे भगीरथ प्रयत्न दोन वर्षात सफल झाले. परसबागेचे शिक्षण देऊन भाजीपाला उगवला गेला. पाठोपाठ स्त्रीआरोग्य, शिक्षण या राजमार्गावर समाजजीवन आणले गेले.
हे करतानाच पुण्यात ‘अभया’ मैत्रीगट सुरू आहे, ज्यात एकाकी स्त्रियांसाठी मैत्रीगट स्थापून त्यांना परस्पर मदत मिळवून देणे, एकाकीपण दूर करणे यासाठी अव्याहत काम सुरू आहे. मदत घेण्यासाठी आलेल्या घटकांना इथे इतके सक्षम बनवले जाते की ते स्वतः एक दिवस मदतदाते हात बनतात.लवकरच आगामी काळात वंचित विकास लोहगाव, पुणे येथे मध्यमवर्गीयांसाठी वृद्धाश्रम उभारत आहे. वंचित विकासच्या कार्याने समाजातील वयोवृद्ध वंचितांची दखलही घ्यायची ठरवली आहे. ‘वंचित विकास’च्या कार्याला जगण्याचा उद्देश बनवून घेऊन समाज एकसंध बनवत आहेत.
एखाद्या लेखाऐवजी प्रबंधाचा विषय ठरावे असे आभाळाएवढे कार्य ‘वंचित विकास’ आज समाजातील अनेक उपेक्षित घटकांसाठी करत आहे. वटवृक्ष झालेल्या या कार्यात विलास चाफेकर यांसोबत विजयकुमार मालरेचा, सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर आणि इतरही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य या कार्यासाठी वाहून घेतले आहे. विलास चाफेकर यांना वंचित विकासच्या अथक कार्यासाठी पुणे महापालिकेकडून ‘समाजभूषण पुरस्कार’ दिला गेला आहे.तसेच ‘समाजशिल्पी पुरस्कार’ (मुंबई, १९९५),‘समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ आणि‘हृदयमित्र प्रतिष्ठान’ने सामाजिक कार्यासाठी पुरस्कारित केले आहे. संघटन ही अतिशय मोठी ताकद आहे आणि त्यातूनच समाजातील भेदभाव मिटून समाज समतल होण्याची प्रक्रिया परिपूर्ण होणार आहे हे कृतीतून सत्यात उतवणार्या ह्या संस्थेला आणि कार्यकर्त्यांना अभिवादन...
- नूतन शेटे