
दीड वर्षे अटकेला गुंगारा : सर्वोच्च न्यायालयानेच दिले शरणागती पत्करण्याचे आदेश
विशेष वृत्त : दीड वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेच्या निमित्ताने अटक टाळणारे आरोपी आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या स्वाधीन झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अटकपूर्व जामीन फेटाळला. तसेच एका आठवड्यात 'एनआयए'च्या स्वाधीन व्हावे, असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातच बजावले होते.
एल्गार परिषद तपासात पोलिसांच्या हाती लागलेले धागेदोरे नक्षलप्रभावित भागातील अतिरेकी कारवायांपर्यंत गुंतलेले असल्याचे समोर आले होते. पुणे पोलिसांनी काही आरोपींच्या घरांवर धाडी मारून पुरावे गोळा केले. आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखा यांच्याही घरावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित अनेक आरोपींना अटक करण्यात आली. आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखा यांनाही अटक करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. मात्र सुरुवातील गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका व त्यानंतर अटकपूर्व जामीन याकरिता तेलतुंबडे , नवलखांनी याचिका दाखल केल्या होत्या. दरम्यान संपूर्ण खटल्याचा तपास राष्ट्रीय तापस यंत्रणेने स्वतःच्या हाती घेतला. आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखा यांच्या याचिकांवर सुनावणी होईपर्यंत दीड वर्षे उलटली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्यांना एका आठवड्याची मुदत आपणाहून शरणागती पत्करण्यासाठी दिली होती. ही मुदत काल संपुष्टात आली. आज मंगळवारी दुपारी एनआयएच्या कार्यलयात आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखा यांनी शरणागती पत्करल्याचे समजते.