गुगलने डूडलच्या माध्यमातून मानले आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार!

    13-Apr-2020
Total Views |

Google _1  H x


‘थँक यु’ म्हणत गुगलकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना अनोखी मानवंदना!


मुंबई : कोरोनाविरोधातील लढाईमध्ये आपल्या जीवाची परवा न करता दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे गुगलने आभार मानले आहे. हे सर्वजण करत असलेल्या कामाबद्दल गुगलने डूडलद्वारे आभार मानले आहे. या डूडलवर क्लिक केले असता कोरोनाशी संबंधित सरकारी वेबसाईटची माहिती येते.


याआधी देखील गुगलने २ एप्रिल रोजी डूडल तयार केले होते. या डूडलद्वारे गुगलने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले होते. गुगलने तयार केलेल्या डूडलचे प्रत्येक अक्षर घरामध्येच राहून कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक कामात व्यग्र असल्याचा संदेश देत होते. तर या डूडलवर क्लिक केले असता कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती येत होती.


देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ९ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ३०८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. २४ तासांमध्ये ३५ रुग्णांचा मृत्यू झाला तर ७०५ जणांना कोरोनाची लागण झाली.