नवी दिल्ली : देशावर कोरोनाचे संकट असताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सतीश चंद्रा यांनी देशाला मदतीचा हातभार दिला. आपल्या एकूण पगाराच्या ३० टक्के रक्कम पुढील एक वर्ष मदत म्हणून देण्यास ऐच्छिक पुढाकार घेतला आहे. सोमवारी मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी या देशव्यापी संकटाला तोंड देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सरकारला लागणाऱ्या आर्थिक स्त्रोतांची आवश्यकता लक्षात घेता त्यांनी हा पुढाकार घेतला आहे.
आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संकटाच्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी गुंतलेल्या सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत दिली जात आहे. यामध्ये आयोगाच्या उच्च अधिकाऱ्यांनी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आर्थिक सहाय्य म्हणून एप्रिल २०२० पासून पुढच्या एका वर्षाच्या मासिक पगाराच्या ३०टक्के कपात करण्याचे ठरविले आहे.