अन्न हे पूर्णब्रह्म...(भाग-२)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2020
Total Views |
Diet_1  H x W:


हल्ली बरेचदा ‘व्याधिक्षमता’ वाढविण्यासाठी काय खावे, असे विचारले जाते. पण ‘व्याधिक्षमता’ म्हणजे काय? ती अशी वाढवता येते का? वाढली की कायम तशीच राहते का, याबद्दल कधी विचार केलाय का? आज याबद्दल जाणून घेऊया.


सद्यपरिस्थितीमध्ये स्वस्थ व्यक्ती, बाल-तरुण-वृद्ध तसेच, विशिष्ट आजार सोडल्यास इतर व्याधींनी ग्रस्त असे सर्व प्रकारचे लोक घरात आहेत. रोजचे दैनंदिन जीवन ठप्प होऊन घरातूनच सर्व कामे सुरू आहेत. ऑफीस, शाळा, क्लास यांचे काम ऑनलाईन सुरू आहे. थोडक्यात काय तर शारीरिक हालचाल न करता, सगळे काही घरातच येऊन ठेपलं आहे.


घरी म्हटल्यावर हवे तेव्हा आणि हवे तसे खाणेही सुरू आहे. गृहिणी व (नव, परिस्थितीमुळे घरी असलेल्या) गृहिणी विविध पक्वान्ने करत आहेत, शिळ्याचे ताजे, एकाचे दुसरे असे विविध रुचकर पदार्थ तयार करून घरच्यांना खाऊ घालतात आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरून त्याचे दर्शन घडवितात.


पण, हालचाल कमी आणि आहाराचे प्रमाण मात्र तेवढेच (आणि काही वेळेस ओव्हर डायटिंग) असे बहुतांशी होत आहे. त्यात भर पौष्टिक पदार्थ, व्याधी क्षमता वाढविणारे अन्न पदार्थ इ. चे पोस्ट वाचल्यावर, आहाराबरोबर त्याचेही सेवन होते. मराठीत एक म्हण आहे - ‘अति तेथे माती!’ कितीही पौष्टिक, आरोग्यास हितकर अन्न असले, तरी ते आपल्या पचनशक्तीच्या क्षमतेनेच खावे, हे मात्र कायम लक्षात ठेवावे. एकच आहार सगळ्यांना जसा पचत नाही, तसेच एकच औषध सगळ्यांना तेवढेच लागू पडत नाही. ‘बॅलन्स्ड डायेट’ म्हणजेच ‘षड्रसात्मक’ आहाराचे सेवन नियोजनबद्ध पद्धतीनेच होणे गरजेचे आहे. तेव्हाच ते शरीरास, मनास आणि बुद्धीस उपायकारक ठरते, अन्यथा नाही. शरीरातील अग्नी म्हणजेच पचनशक्ती होय. जसे यज्ञातील अग्नी सतत तेवत राहण्यासाठी वेळोवेळी आहुती दिली जाते, तूप घातले जाते, तेच कार्य आपल्या आहाराचे आहे. अग्नी सतत तेवत राहावा, त्याचा भडकाही उडू नये आणि तो मंद होऊन विझूही नये. कारण, पचनशक्ती संपुष्टात आली, म्हणजे आयुष्यही संपुष्टात येईल. तेव्हा कितीही पोषक, पूरक अन्न असले, तरी ते तनमनतेनेच खावे.


हल्ली बरेचदा ‘व्याधिक्षमता’ वाढविण्यासाठी काय खावे, असे विचारले जाते. पण ‘व्याधिक्षमता’ म्हणजे काय? ती अशी वाढवता येते का? वाढली की कायम तशीच राहते का, याबद्दल कधी विचार केलाय का? आज याबद्दल जाणून घेऊया.


‘व्याधिक्षमता’ ही दोन प्रकारची असते. १) ज्याने व्याधीचा प्रतिरोध केला जातो, ज्याच्यामुळे रोगाचा शरीरात शिरकाव करू दिला जात नाही, हा पहिला प्रकार म्हणजे, शरीराचे ‘सुरक्षाकवच’ असे म्हणा. ‘No Entry’ आणि २) ज्याने व्याधी जरी झाली, तरी शरीरात त्याचे वास्तव्य, त्याची प्रसरणशीलता, त्याची प्रखरता कमी करणे आणि लवकर व्याधिमुक्त करणे. सध्या दोन्ही प्रकारची व्याधिक्षमता असणे, वाढविणे गरजेचे आहे.


व्याधिक्षमता मुख्यतः ३ प्रकारची असते. १. सहज २. कालज आणि ३. युक्तिकृत.


सहज म्हणजे जन्मजात मिळालेले ‘सुरक्षाकवच.’ यालाच ‘Innate immunity' असेही म्हटले जाते. आई-वडिलांची, पूर्वजांची अनुवांशिक बैठकीतून जे अर्भकास प्राप्त होते, जे बदलता येत नाही, त्याला ‘सहज व्याधिक्षमता’ म्हणतात. ‘कालज’ आणि ‘युक्तिकृत व्याधिक्षमता’ ही ’Acquired immunity’च्या अधीन येते.


‘कालज’ म्हणजे ‘Seasonal.’ ऋतुसापेक्ष. थंडीमध्ये स्वाभाविकतः प्रतिकारशक्ती (रोगप्रतिकारशक्ती) उत्तम असते. उन्हाळ्यात कमी आणि पावसाळ्यात त्याहून कमी, तसेच तरुणावस्थेत बाल्यावस्थेपेक्षा आणि वार्धक्यापेक्षा रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते. रुग्णावस्थेपेक्षा निरोगी अवस्थेत रोगप्रतिकारशक्ती, प्रतिकारशक्ती अधिक चांगली असते ती अजून वाढवता येऊ शकते. ऋतुसापेक्ष आहार-विहार केल्यास, ध्यान-धारणा, व्यायाम केल्यास हे अधिक चांगल्या पद्धतीने करता येते.


‘युक्तिकृत’ या प्रकाराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे पूर्णत: आपल्या हातात असते. स्तन्यपान करविणे. (० ते ६ महिन्याच्या बाळाला) हेे ‘युक्तिकृत’ रोगप्रतिकारशक्तीचे नैसर्गिक पद्धतीने होणारे त्याचे उदाहरण आहे. ‘नॅचरल’ आणि ‘लसीकरण’ हे ‘अनैसर्गिक युक्तिकृत’ रोगप्रतिकारशक्तीचे उदाहरण आहे.


‘युक्तिकृत’ रोगप्रतिकारशक्ती आहाराने, विहाराने, आचारणाने उत्तम करता येते. सर्वांगिण व्याधिक्षमत्व आणि एकांगी म्हणजे (त्या त्या सिस्टिमचे) व्याधिक्षमत्व वाढविणे शक्य आहे. सध्याच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर खालील काही सूचना आपण बघूया.


जीवाणूंचा प्रवेश शरीरात होऊ न देणे यासाठी ‘मास्क’ आपण वापरतो. त्याचबरोबर नस्याचाही अवलंब करावा. रोज सकाळी प्रात:र्विधी आटोपून झाल्यावर दोरी नाकपुड्यांच्या आत तेल लावावे. (तिळाचे अथवा खोबरेल तेल) नस्य करतेवेळी नाकात दोन-दोन थेंब तेलाचे घालावेत, याला ‘प्रतिमर्श नस्य’ म्हणतात. पण, ते न जमल्यास किमान दोन्ही नाकपुड्यांना आतून तेल लावावे. याने श्वसनमार्गातील अडथळे निघून जातात. श्वसन मार्गाची प्रतिकारशक्ती वाढते आणि क्षमताही सुधारते.


जसे नाकाला आतून तेल लावल्याने फायदा होतो, तसेच अभ्यंगानेही उपयोग होतो. अंघोळीपूर्वी किमान १० मिनिटे संपूर्ण अंगाला तेल चोळावे. तिळाचे किंव खोबरेल तेल हलके गरम असल्यास अधिक उत्तम... ते हलके जिरवावे. कोमट-गरम पाण्याने अंघोळ करावी. श्वसन मार्गाची क्षमता सुधारण्यासाठी उपाशीपोटी दीर्घश्वसन करावे.


योगासने, प्राणायाम इ. तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालील करावे. ऑडिओ ऐकून अथवा व्हिडिओ बघून, पुस्तके वाचून करू नयेत. प्रत्येकाची क्षमता आणि गरज भिन्न आहे. ज्यांना सराव नाही, अशांनी फक्त दीर्घश्वसन रोज दिवसांतून दोन वेळा चार ते पाच मिनिटे करावे.


खाण्यातून, आहारातून ताजे अन्न जे पचायला हलके आहे, असे खावे. शरीरात कफ वाढेल, सर्दी, पडसे होईल, असे खाऊ नये. पाणी कोमट-गरम प्यावे. फ्रीजमधील थंड पाणी टाळावे. थंड दूध, कोल्ड कॉफी, सरबते, ज्याने घसा धरेल, खवखव होईल ते टाळावे. दही, श्रीखंड, लोणचं, सीताफळ, मिल्क शेक्स घेऊ नये. पाव, ब्रेड, मैद्याचे पदार्थ टाळावेत. खाल्लेच तर दिवसा आणि थोड्या प्रमाणात खावे. जेवल्या जेवल्या आडवे राहू नये, झोपू नये. आहारात आल्याचा, लिंबाचा, जिर्‍याचा वापर असावा.


सध्याच्या काळात घरात उद, गुग्गुळ, ओवा, बाळंत शेपा, गोवर्‍या इ. घालून धूप करावा. मन:शांतीसाठी संगीताचा आणि विविध रंगछटांचा खूप चांगला फायदा होतो. गायन, वादन, चित्र काढणे, रंगविणे इ. करावे. रोज काहीतरी नवीन शिकल्यास मनाला आलेली मरगळही दूर होते आणि बुद्धीवर गंज येत नाही. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी दोरीच्या उड्या, सूर्यनमस्कार इ. व्यायाम घरच्या घरी करावा.
(क्रमश:)


- वैद्य कीर्ती देव
@@AUTHORINFO_V1@@