आव्हान समर्थपणे पेलूया!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2020   
Total Views |


corona awareness_1 &



‘लॉकडाऊन’मुळे देशातील बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. ‘लॉकडाऊन’चा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. तो आणखी वाढू न देण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. कोरोनाच्या संकटावर मात केली की देशाची अर्थव्यवस्था आणि अन्य सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्याचे मोठे आव्हान आपणा सर्वांना स्वीकारायचे आहे. त्याची सिद्धताही आपणास याच दरम्यान करायची आहे.



हे संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भीषण संकटात लोटले आहे. त्यास आपला भारतही अपवाद नाही. भारतातही या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रोज अनेकांना संसर्ग होत आहे, तर अनेक मृत्युमुखी पडत आहेत. जगातील काही प्रगत देशांमध्ये या विषाणूची लागण झाल्यामुळे मरण पावणार्‍यांची प्रचंड संख्या पाहिली की किती भयावह परिस्थिती जगापुढे निर्माण झाली आहे याची कल्पना येते. भारताची १३० कोटींची प्रचंड लोकसंख्या आणि त्या तुलनेत या महामारीचा फैलाव कमी झाला असला तरी या साथीने संपूर्ण देशाला ग्रासले आहे हे विसरता नये. कसलाही गाफिलपणा, निष्काळजीपणा न करता आणि जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यांचे काटेकोर पालन केल्यास या महामारीवर भारत नक्कीच मात करू शकेल.



संपूर्ण देश कोरोनाने जे संकट निर्माण केले आहे, त्यास तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे २२ मार्च रोजी जो देशव्यापी ‘जनता कर्फ्यू’ योजण्यात आला होता आणि त्यानंतर गेल्या ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी, आपणा सर्वांना तिमिरातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देण्यासाठी ज्या प्रकाशपर्वाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावरून दिसून आले! संपूर्ण देश या संकटाचा सामना करण्यासाठी सिद्ध असल्याचे दर्शन सर्वांना झाले. राष्ट्रपुरुषाच्या विराटशक्तीची एक झलक यानिमित्ताने संपूर्ण विश्वास अनुभविण्यास मिळाली. तसाच निर्धार कायम ठेवून आपण वर्तन केल्यास हे संकट दूर होण्यास वेळ लागणार नाही. देशातील बहुतांश जनता या संकटाशी झुंजत आहे. आरोग्यसेवा, स्वच्छता सेवक, अत्यावश्यक सेवांची जबाबदारी असलेले कर्मचारी, पोलीस, अन्य सुरक्षा दले त्यांच्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती डोळ्यांमध्ये तेल घालून पार पाडत आहेत. या संकटांमुळे सर्वांपुढेच आव्हान उभे केले आहे. असे असतानाच या महामारीच्या काळात शेजारच्या पाकिस्तानकडून सीमेवर आगळिकी सुरू आहेत. त्यांचा प्रतिकार करताना आपले जवान धारातीर्थी पडत आहेत. या संकटाच्या काळात देशातील कोणीही उपाशी राहू नये म्हणून केंद्र आणि राज्यांच्या सरकारांनी उपाययोजना केल्या आहेतच. त्याच्या जोडीनेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी गरजू, पीडित जनतेला, कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंची उणीव भासू नये म्हणून देशव्यापी मदतकार्य सुरू केले आहे. संघाच्या शाखांवरच समाजसेवा करण्याचे बाळकडू संघ स्वयंसेवकांना मिळत असल्याने, कोणीही न सांगता हजारो कार्यकर्ते या मदतकार्यांमध्ये स्वत:ला झोकून काम करीत आहेत. स्वत:च्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, यासाठी ते जनतेचे प्रबोधन करीत आहेत. आपल्या देशबांधवांची नि:स्वार्थपणे सेवा करण्याच्या निर्धाराने संघ स्वयंसेवक कार्य करीत आहेत.

 



कोरोनाला पराभूत करण्यासाठी देशवासीय लढत असतानाच काही नतद्रष्ट या सर्व प्रयत्नांना ‘खो’ घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दिल्लीमध्ये निजामुद्दीन येथे मार्च महिन्यात ‘तबलिगीं’चा जो मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यात सहभागी झालेल्या काही मुल्लामौलवींच्या समाजद्रोही वर्तनामुळे अनेकांना कोरोनाची बाधा झाली, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. या मेळाव्यात विदेशातून आलेले अनेक मुल्ला-मौलवी सहभागी झाले होते. आपण दुसर्‍या देशात आलो असल्याने त्या देशात हिंडताना त्या देशातील नियम पाळणे आपल्याला बंधनकारक आहे, हे ते जाणूनबुजून विसरून गेले! देशाच्या अनेक राज्यांमध्ये ते गेले. हे करताना आपल्या आगमनाची माहिती पोलीस यंत्रणांपासून दडवून ठेवली. विविध मशिदींमध्ये ते लपूनछपून राहिले. त्यातील काही कोरोनाबाधित होते. पण, त्याची चिंता न करता ते लोकांमध्ये मिसळत राहिले. कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास आपल्याच समाजातील काही बेजबाबदार कारणीभूत आहेत, हे मान्य करण्याची तयारी त्या समाजातील धर्मांध नेत्यांची नसल्याचा अनुभव यानिमित्ताने देशाने घेतला. असे कठीण प्रसंग घडूनही सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.

 



या सर्व प्रयत्नांना सर्व समाजाने साथ देण्याची नितांत गरज आहे. गर्दी टाळणे, एकमेकांपासून अंतर राखून वावरणे असे काही खात्रीचे उपाय सर्वांनी केले तर आणि तरच आपण या महामारीचा प्रादुर्भाव नक्कीच रोखू शकू. घराबाहेर न पडण्याचा निर्धार करून तो पाळला तर या आजाराची संक्रमण साखळी तोडण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. लवकरात लवकर देशाला या संकटातून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. तुमच्या आमच्यावर ते प्रामुख्याने अवलंबून आहे. आपली स्वत:ची, आपल्या कुटुंबाची काळजी घेत, सर्व निर्बंधांचे पालन केल्यास हे संकट परतवून लावणे कठीण नाही. या आधी देशाने अनेक संकटे झेलली आहेत. परतवून लावली आहेत. कोरोनाचे संकट आम्ही परतवून लावणारच, असा निश्चय सर्व देशवासीयांनी केला आहे. कोरोनाने निर्माण केलेल्या संकटामुळे देशापुढे आर्थिक संकट उभे राहणार असले तरी आपल्या संघटित शक्तीच्या बळावर देश त्यावरही मात करील, अशी खात्री आहे. सध्या कठीण प्रसंगातून आपण जात आहोत. पुढे कोणती आव्हाने उभी राहणार आहेत, त्याची काहीशी कल्पना या वातावरणामुळे येऊ लागली आहे. असे असले तरी कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायचे आणि त्यावर मात करायची अशी भारतीयांची विजीगिषु वृत्ती आहे. आम्ही अमृताचे पुत्र आहोत. त्यामुळे आम्हाला कसले आले आहे भय? आपण सर्वांनी एकात्म भावना राखून, एकदिशेने आणि एकदिलाने प्रयत्न केले की कोरोनाला नक्कीच पळवून लावण्यात यशस्वी होऊ. त्यानंतर देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्याच्या कार्यात आपण सर्व स्वत:ला झोकून देऊ. आपल्या या कृतीतून भारत संपूर्ण जगापुढे एक आदर्श निर्माण करील याची प्रत्येक भारतीयास खात्री आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@