किसके रोके रुका है सबेरा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2020
Total Views |
medicine_1  H x



खात्रीपूर्वक वैद्यकशास्त्रावर निर्धास्त विश्वास ठेवा. कुठल्याही संकटावर मात करून मार्ग दाखविणार्‍या ऊर्जेला ‘शास्त्र’ म्हणतात. वैद्यकशास्त्राला केवळ संजीवनी देता येते. म्हणून आपल्याला जे शास्त्रीयदृष्ट्या सांगितले जात आहे, ते फक्त करा.


आपण कोरोनाच्या बिकट महामारीशी सामना करीत आहोत. हळूहळू सगळीकडे नांगी टाकत कोरोनाचा विंचू आपल्याला चहुबाजूंनी डंख मारत आहे. आपल्याला वेदना होत आहेत. भविष्याबद्दल आपण संदिग्ध आहोत. पुढे काय होणार, आपले कसे होणार? माझ्या एक क्लायंट मला म्हणाल्या, “मॅडम, यमाला मला उचलून घेऊन जायचे असेल तर काही हरकत नाही. पण, त्याच्या पाया पडते की, मला नरकयातना नको रे देऊ बाबा.” अगदी अशा पद्धतीचे टोकाचे विचार आपल्यापैकी बर्‍याचजणांच्या मनातही घोंघावत आहेत. मृत्यू परवडला, पण या कोरोनाच्या यातना नको. इतक्या प्रचंड प्रमाणात आपल्या मनात या आजाराविषयी भीती वाढली आहे. ही भीती भयाण आहे. अमानवी आहे. आपल्या सहनशक्तीच्या पलीकडची आहे. आत्मा गोठवणारी आहे. कोरोना म्हटले की, समोर शब्द उभा राहतो, तो ‘समाप्त’ किंवा ‘The End.’ त्याच्या अलीकडे विचार करणे सध्यातरी कठीण आहे. कोरोनामुळे ‘लागले नेत्र रे पैलतीरी’ असे काहीसे चित्र आपल्या मनात निर्माण झाले आहे. पैलतीर काही आरामदायी किंवा आल्हाद देणारा वाटत नाही.


ही वेळ जगाला ढवळून काढणारी आहे. यांच्यामध्ये आपल्या स्वतःच्या अंतकाळाची भीती, प्रियजनांपासून होणारा विरह आणि आपला भविष्यकाळ सामाजिक आणि आर्थिक चणचणीत हरवणार आहे, याची चिंता आपलं आयुष्य दुरापास्त करत आहे.


इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांनी खूप आशादायक आणि ऐतिहासिक वाक्य उच्चारले की, “भविष्यकाळात या पृथ्वीवरील येणारी पिढी आपण कोरोनासारख्या मृत्यूशी मिठी मारायला लावणार्‍या संकटाला आणि आव्हानाला कसे तोंड दिले, ते ध्यानात ठेवेल.”


या वाक्यात आपण जगातल्या अशक्यप्राय आणि कालातीत काळाला सामोरे जात आहोत, हे स्वीकारताना मनात ऊर्जा निर्माण होते. आपल्यानंतर जन्म घेणारी नवीन पिढी आपल्या सगळ्यांना एक सक्षम आणि समर्थ पिढी म्हणून ओळखणार आहे. कोरोनाशी आज आपण देत असलेला लढा ऐतिहासिक तर आहेच. पण, तो अजरामर लढा ठरणार आहे. त्या अवकाशात पृथ्वीचे अस्तित्व जोपर्यंत राहील, तोपर्यंत कोरोनाचं आणि माणसांचं महायुद्ध कित्येक युगे स्मरणात राहणार आहे. आज 99 टक्के वैश्विक ऊर्जा फक्त कोरोनाशी संबंधित बुद्धिवाद, अस्तित्ववाद आणि भविष्यवादातच रमली आहे. आपले आजच्या या काळातील भाव, कल्पना व कृती ‘कोरोना’ या एक केंद्रबिंदूभोवती प्रदक्षिणा घेत आहे. ‘अब करोना के सिवा जिंदगी में कुछ बचा ही नही’ असा टोकाचा निराशावाद माणसाच्या अस्तित्वाच्या आकाशात स्थिरावला आहे.


आपल्या जगात संसर्गजन्य आजार आले आणि थैमान घालून निघूनही गेले. फरक इतकाच होता की, आपलं वैद्यकशास्त्र या संसर्गजन्य आजारांच्या बाबतीत सज्ञानी होतं. देवी म्हणा, डेंग्यू म्हणा, सार्स म्हणा, स्वाईन फ्लू म्हणा, या सगळ्यांनी या पृथ्वीतलावर मनसोक्त तांडव केले. पण, माणूसच अखेर वरचढ ठरला. विज्ञानावरचा आपला विश्वास अढळ होता. म्हणून आपला आत्मविश्वासही अतूट होता. तेव्हा आपल्याला खात्री होती की, आपल्याला खूप काळ या रोगांचा सामना करायला लागणार आहे. काही काळ या संसर्गजन्य आजारामुळे भरपूर सोसायला लागणार आहे. पण, आपल्याला नक्की शाश्वती होती की, हे नक्की जाणार आहे. साहिर लुधियानवींच्या आशादायक शब्दांत सांगायचे तर-


रात जीतनी भी संगीन होगी
सुबह उतनी ही रंगीन होगी
गम न कर गर है बादल घनेरा
किसके रोके रुका है सबेरा
रात भर का मेहमा अंधेरा
किसके रोके रुका है सबेरा

आपण आज वैद्यकशास्त्राच्या उत्तम परिघात उभे आहोत. कोरोना हे आव्हान जितके आपल्या अस्तित्वाचे आहे, तितकेच ते आधुनिक वैद्यकशास्त्राच्या समोरही ‘आ’ वासून उभे ठाकले आहे. वैद्यकयशास्त्र किंवा सर्वसामान्यपणे ‘शास्त्र’ ही संकल्पना संकटांचा गुलाम कधीच नव्हती. आजही नाही आणि उद्याही असणार नाही. खात्रीपूर्वक वैद्यकशास्त्रावर निर्धास्त विश्वास ठेवा. कुठल्याही संकटावर मात करून मार्ग दाखविणार्‍या ऊर्जेला ‘शास्त्र’ म्हणतात. वैद्यकशास्त्राला केवळ संजीवनी देता येते. म्हणून आपल्याला जे शास्त्रीयदृष्ट्या सांगितले जात आहे, ते फक्त करा.


स्वच्छता राखा, वेळोवेळी हात दुवा, ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवाच, मनाने एक राहा, पण एकमेकांपासून निदान सहा फूट अंतर मात्र तेवढे ठेवा.

- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@