पेरले तेच उगवले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2020
Total Views |
shoaib kapil_1  


भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे क्रिकेट मालिका खेळविण्यास सुरुवात करावी, अशी मागणी पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली आणि क्रिकेट विश्व पुन्हा एकदा ढवळून निघाले. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी जशास तसे प्रत्युत्तर देत शोएब अख्तरची ही मागणी कशी चुकीची आहे, हे सर्वांसमोर दाखवून दिले. आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नफा मिळावा या हेतूनेच अख्तरने ही मागणी केली, यात शंकाच नाही. शोएब तर हा एक खेळाडू राहिला आहे. क्रिकेट बोर्डाच्या आर्थिक परिस्थितीची चिंता करण्याचा शोएबचा तसा फारसा संबंध नाही. मात्र, या मागील बोलविता धनी कुणी आणखीनच आहे, हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. कोरोना संकटातही तातडीने नफा कमवायचा असेल, तर भारत-पाकिस्तान सामने खेळविण्याशिवाय काही पर्याय नाही, हे पाकिस्तान बोर्डालाही चांगलेच ठाऊक आहे. ‘इंडियन प्रीमिअर लीग’सारखी (आयपीएल) मोठी स्पर्धा आयोजित करून कोट्यवधींचा आर्थिक लाभ करून घेण्याची संधीही पाकिस्तानकडे नाही. त्यामुळेच पाकिस्तानचे माजी खेळाडू अशा प्रकारच्या मागण्या करून आपल्या बोर्डाचे हित चिंतत आहे. भारताप्रमाणे एकेकाळी पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन होत असे. भारताप्रमाणेच पाकिस्तानही बड्या देशांसोबत क्रिकेट मालिका आपल्या धर्तीवर खेळवत असे. ‘शारजा’ या जगप्रख्यात क्रिकेट स्टेडियमवरील अनेक सामने गाजल्याचा इतिहास आहे. मात्र, या सर्वांतून कमावलेला नफा पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरला. क्रिकेटचा काळाबाजार, ‘फिक्सिंग’ आदी बरीच प्रकरणे पाकिस्तानात गाजली. क्रिकेट सामन्यांदरम्यानही दहशतवादी हल्ले घडवून आणले. परिणामी, अनेक देशांनी पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळणे सोडले. स्वदेशी धर्तीवर क्रिकेट सामन्यांचे आयोजन होत नसल्यामुळे बोर्डही आर्थिक डबघाईला आले. ही परिस्थिती अचानक उद्भवलेली नाही. जे पेरले तेच आता उगवले, असे काहीसे पाकिस्तानसोबत झालेले दिसते.


अख्तर ‘क्लीन बोल्ड’




सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. जगातील अनेक देशांत भयानक परिस्थिती असून या महामारीमुळे संपूर्ण जग थंडावले आहे. अशा परिस्थितीतही पाकिस्तानातील काही खेळाडूंना मात्र जगावेगळ्या आणि मूर्खपणाच्या कल्पना सुचत आहेत. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अर्थात पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान या दोन्ही उभय देशांमध्ये क्रिकेट मालिका सुरू करण्याबाबत सूतोवाच केले. अख्तरचे हे म्हणणे सध्याच्या घडीला पूर्णपणे चुकीचे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारत-पाकिस्तानच्या आजी-माजी क्रिकेपटूंनी याबाबत आपले मत व्यक्त करत शोएब यावेळी बोलताना पूर्णपणे ‘क्लीन बोल्ड’ झाल्याची टीका केली. जग कोरोनाशी झुंज देत असतानाही शोएबने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळविण्याबाबतचे विधान का करावे, या प्रश्नदेखील जाणून घेणे महत्वाचे आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत आधी झालेल्या कराराप्रमाणे दहा वर्षांमध्ये क्रिकेटच्या एकूण चार मालिका खेळविणे अपेक्षित आहेत. यापैकी दोन मालिकांचे आयोजन भारतात, तर दोन पाकिस्तानात करावे, असे या करारात नमूद करण्यात आले होते. २००९ साली पहिली मालिका भारतात खेळविण्यात आली. भारताने या मालिकेचे आयोजन स्वदेशात करत मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ करून घेतला. त्यानंतर पुढील मालिका पाकिस्तानात खेळविण्यात येणार होती. मात्र, श्रीलंकेच्या खेळाडूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगातील एकाही देशाने पाकच्या धर्तीवर क्रिकेट खेळणे पसंत केले नाही. दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतानेही या मुद्द्यावरून पाकिस्तानसोबत क्रिकेट मालिका खेळण्यास नकार दिला. विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी अथवा आशिया चषक आदींचा अपवाद सोडल्यास भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचे सामने होताना दिसत नाहीत. पाकिस्तानला क्रिकेट मालिकांचे आयोजन आपल्या धर्तीवर करता येत नसल्याने नफा मिळत नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आता आर्थिक चणचण जाणवत आहे. क्रिकेट बोर्डाकडे पैसे नसल्याने खेळाडूंना वेळेवर मानधन न मिळणे, त्यांच्या सोयी-सुविधांची कमतरता या समस्या उद्भवतात. अशी परिस्थिती असताना सध्या कोरोनाचे संकटही उद्भवले आहे. त्यामुळे कठीण परिस्थितीत जर मोठा नफा कमवायचा झाल्यास भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळविण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच अख्तरने हे विधान केले, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.


- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@