बाबासाहेबांनी दिलेला वसा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2020   
Total Views |
maya damodar_1  



विदर्भातील सामाजिक कार्यात, साहित्यवर्तुळात समर्थपणे ठसा उमटवणार्‍या माया दामोदर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाने कृतीत अंगीकारावे, यासाठी त्या कार्य करतात. त्यांच्या जीवनाचा हा मागोवा...




“माझी शाळा घरापासून चार किलोमीटर दूर. काही कारणांमुळे एक दिवशी मी न जेवताच शाळेत गेले. आजीला ते कळले. तिने घरातून भाकरी बांधून घेतली. रणरणत्या उन्हात ती शाळेत चालत आली. माझ्या हातात भाकरी देत म्हणाली, “भूक लागली असेल माया हरिणीले, जाय लवकर जेऊन घे.” आजीचे ते शब्द माझ्या काळजात आजही आहेत. भुकेलेल्यांची भूक आणि तहानलेल्यांची तहान, गरजवंतांची गरज भागवावी हीच माणुसकी, ही माझ्या आजीची शिकवण. ती शिकवण आयुष्यात खूप काही शिकवून गेली.” शेगावच्या माया दामोदर सांगत होत्या.


बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगावची महाराष्ट्रात गजानन महाराजांमुळे ख्याती. त्या शेगावमध्ये माया यांचे सामाजिक कार्य शब्दातीत. त्या शेगावमधील सावित्रीबाई फुले महिला मंच, माया सेवाभावी संस्था, शीलरत्न सार्वजनिक वाचनालय, तथागत शील संवर्धन समिती, अनुभूती कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र या व अशा सामाजिक संस्थांच्या अध्यक्षा आहेत. तसेच, जागृती महिला असोसिएशन, निरंजना महिला मंडळाच्या त्या मुख्य प्रवर्तक म्हणून कार्य करतात. त्या विदर्भ साहित्य संघाच्या सदस्य आहेत. आजपर्यंत त्यांची ३२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर, कार्यांवर, तथागत गौतम बुद्धांच्या पंचशिलावर आधारित असलेली त्यांची लेखनशैली समृद्ध आहे.


‘जागृती’, ‘संस्कृती’, ‘मंथन’,‘कोटी कोटींची माऊली रमाई’, ‘बौद्ध स्तूपम’, ‘बाबा! आम्ही कोठे पोहोचलो?’, ‘बाबासाहेब म्हणतात’, ‘स्त्रियांचा संघर्ष : सामाजिक परिवर्तन’ आणि अशी त्यांची इतरही अनेक पुस्तके सामाजिक संदर्भांचा आशय व्यक्त करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज हा माया यांच्या साहित्याच्या चिंतनाचा केंद्रबिंदू. त्या म्हणतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व सर्वस्पर्शी आहे. जातीय विषमतेतून अत्यंज स्तरावर असलेल्या समाजासाठी त्यांचे कार्य आणि विचार जितके महत्त्वाचे आणि एकमेवाद्वितीय आहेत, तितकेच त्यांचे राष्ट्र, पर्यावरण, महिला सबलीकरण किंबहुना मानवी जीवनाच्या सर्वच पैलूंबाबत बाबासाहेबांचे विचार महान आहेत. कार्य महान आहेत.”


माया यांनी बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये रूजवण्यासाठी कार्य सुरू केले. त्यासाठी संविधान जागर सुरू केला. संविधान गावातील सर्वस्तरावर कसे पोहोचविता येईल, यासाठी काम सुरू केले. ग्रामीण भागातल्या महिला या घरी आणि शेतातही राबतच असतात. त्यांच्या उन्नतीसाठी काम सुरू केले. माया यांनी पाहिले की कित्येक महिलांना मुलगा होत नाही, तोपर्यंत मुलांना जन्म द्यावा लागे. ‘कधी ना कधी मुलगा होईलच,’ या आशेपोटी त्यांच्यावर आई होण्याची सक्तीच केली जाते. हे कसे थांबणार? यासाठी माया यांनी गावातल्या महिलांमध्ये जागृती केली. दोन मुले झाल्यावर शस्त्रक्रिया करणार्‍या मातापित्यांचा सत्कार करण्यास सुरुवात केली.


तसेच कौटुंबिक स्तरावर एका महिलेला सगळ्यात त्रासदायक काय असते, तर दारूडा नवरा! नवरा जर दारूडा असेल, तर त्याच्या पत्नीच्या हालअपेष्टांना अंत राहत नाही. गावातल्या महिलांचे होणारे हाल माया पाहत होत्या. दारूड्यांना माणसात कसे आणता येईल, यासाठी माया यांनी गावातल्या महिलांना सोबत घेऊन काम सुरू केले. यामध्ये स्वत:हून दारू सोडणार्‍या व्यक्तींचा संस्थेच्या आणि मान्यवर गावकर्‍यांच्या हस्ते त्यांनी सत्कार करायला सुरुवात केली. कालपर्यंत ‘दारूडा’ म्हणून हिणवणारे, निंदा करणारे गावकरी, त्यातही प्रतिष्ठित लोकांच्या हस्ते सत्कार होतोय, आदर मिळतोय, हे पाहून स्वत:हून दारू सोडणार्‍यांची संख्या गावात वाढत गेली. माया म्हणतात, “घरच्या प्रमुख पुरुषाने दारू सोडली आणि ते अख्खे घर वाचले.”


डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ हे माया यांचे आदर्श. माया म्हणतात, “डॉ. बाबासाहेबांनी जातीअंताची लढाई लढली. गावाकुसाबाहेरच्या समाजबांधवांना माणसाचे जगणे दिले. जातीच्या बेड्या तोडायच्या कशा? तर त्यासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे आहे,” हा नुसता विचारच माया व्यक्त करत नाहीत, तर आंतरजातीय विवाह करणार्‍यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते. मायांनी काय केले, तर कायद्यानुसार सर्व अटी पाळत आंतरजातीय विवाह करणार्‍यांना समाजाचा रोष, अवहेलना स्वीकारावी लागू नये म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले. तसेच आजही समाजात विवाह म्हटले की, मोठी खर्चिक बाब असते. मुलीच्या वडिलांची तर सत्वपरीक्षाच. मायांनी गाव आणि परिसरात सामुदायिक विवाह पद्धती सुरू केली. त्यामुळे गरीब वधुवरांचा खर्च वाचला.


गावात माया दामोदर यांना मान आहे. कारण, त्या साहित्यिक, विचारवंत आणि तितक्याच कृतिशील समाजसेविका आहेत. पण, त्याचबरोबर त्यांचे पती भीमराव दामोदर हे सैनिक होते. देशासाठी लढणार्‍या सैनिकाची पत्नी म्हणूनही त्यांना समाजात, गावात मान आहेच. भीमराव आता हयात नाहीत. २०११ साली त्यांचा मृत्यू झाला. मात्र, सहजीवनामध्ये त्यांनी माया यांना कधीही सामाजिक कार्यापासून परावृत्त केले नाही. माया यांचे माहेर बुलडाण्याचे धामगणगाव होय. त्यांचे वडील सदाशिव वानखेडे आणि आई मीराताई हे दोघेही कष्टकरी. कधी कधी घरी एकच भाकरी चार जणांमध्ये वाटून खावी लागे. घरची गरिबीच. पण, त्या गरिबीमध्येही वानखेडे कुटुंबीयांनी मुलांना संस्काराची श्रीमंती दिली. माया म्हणतात, “कवी संमेलने, आरोग्य शिबिरे, जागृती प्रबोधनपर कार्यक्रम करताना समाजापर्यंत एकच गोष्ट पोहोचवायची असते की, माणसाने माणसासोबत माणसासारखेच वागावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मानवतेचा वसा घ्या, उतू नका, मातू नका, समाजबांधवांना विसरू नका.”


@@AUTHORINFO_V1@@