स्वातंत्र्याची प्रेरणा आणि सामाजिक ऐक्याची भावना

    13-Apr-2020
Total Views |


dr babasaheb ambedkar_1&n


डॉ. आंबेडकर व डॉ. हेडगेवार दोघांच्याही सामाजिक ऐक्य साधण्याच्या पद्धती वेगवेगळ्या वाटत असल्या, तरी दोघांची दिशा एकच आहे. समतेचे व समरसतेचे दोघेही समर्थक आहेत. परंतु, डॉ. आंबेडकर व डॉ. हेडगेवार या दोघांचेही प्रारंभबिंदू भिन्न असल्यामुळे दोघांनी विभिन्न मार्गांचा अवलंब केला.



२०२० हे वर्ष भारतीय इतिहासावर आपला ठसा उमटविणार्‍या अनेक थोर लोकांची स्मृती जागविणारे वर्ष आहे. हे लोकमान्य टिळकांचे १६३ वे, महात्मा गांधींचे १५० वे, स्वा. सावरकरांचे १३१ वे, रा. स्व. संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवारांचे १३० वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२९ वे आणि श्रीगुरुजी यांचे ११३ वे जन्मवर्ष आहे. वरील थोरांच्या मालिकेत आढळून न येणार्‍यास, रा. स्व. संघाचे आजीवन प्रचारक व भारतीय मजदूर संघाचे प्रणेते दत्तोपंत ठेंगडी यांचेदेखील हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त या विचारांचे व आचरणाचे चिंतन व्हावे या भूमिकेतून पुढील विचारमंथन.



समाजाच्या ऐक्यासाठी वर उल्लेख केलेल्या लोकांनी प्रयत्न केले. वरवर पाहता त्यांचे मार्ग भिन्न भासत असले तरी त्यामागील उद्देश एकच होता, तो म्हणजे भारतीय समाजाचे ऐक्य.



या स्वातंत्र्यपूर्वकालीन महापुरुषांची सामाजिक पार्श्वभूमी, कालखंड व परिस्थिती भिन्न होती. आपल्या हाती असलेल्या साधनांचा उपयोग करून त्यांनी भारतीय समाजाचा उत्कर्ष कसा साधता येईल, यावर मनन व चिंतन करून प्राप्त परिस्थितीत चांगला बदल घडविण्यासाठी आपली शक्तीकृतीत उतरविली. सामाजिक समरसतेसाठी, वर्णरहित समाजासाठी यांनी एकमेकांशी सहकार्य करून कशा प्रकारे कार्य केले, याची झलक वाचकांच्या निदर्शनास यावी.



राष्ट्रीय काँग्रेसच्याच स्थापनेनंतर सन १८८५ मध्ये एक ठराव करण्यात आला होता, यात लिहिले होते, ‘या पुढे हिंदी राष्ट्र, राष्ट्रीय मतप्रवाह आणि राष्ट्रीय आकांक्षा याविषयी अधिक सुलभतेने आपण बोलू शकू... आमच्यात कितीही मतभेद असले तरी एक राष्ट्रीयत्वाला आवश्यक असणारे घटक आमच्यात आहेत.


लो. टिळकांच्याच मते, “मनुष्य जात व व्यक्ती यांच्यामध्ये ‘राष्ट्र’ म्हणून काही संस्था असते आणि हे राष्ट्र बनण्यास एक भाषा, एक धर्म, एक तत्त्वज्ञान, वाङ्मय यासंबंधी सर्वांस सारखी लागू पडणारी पूर्वपीठिका, संसारयात्रेतील सुखदुःखाविषयी एकाच तर्‍हेच्या, आशा आणि निराशा आणि सर्वांना सारखेच ठेचणार्‍या संकटातून मुक्त होऊन, आपली परंपरा राखून, आपलेपणास ऊर्जितावस्था आणण्यार्‍या या प्रधान साधनांची किंवा बंधनांची अपेक्षा असते. कालमानाप्रमाणे यातील काही बंधने ढिली व काही अत्यंत जोमाची असतात. राष्ट्रीयत्वाची बुद्धी हा कोणत्याही देशाचा आत्मा होय.



“हिंदुस्तानच्या हल्लीच्या काळी तीन-चार धर्म प्रचलित आहेत, म्हणून हिंदू धर्मास राष्ट्रीयत्व नाही हे म्हणणे चुकीचे आहे. केवळ लोकसंख्येच्या मानाने पाहिले तरीही हिंदूंचाच समुदाय मोठा आहे व एवढा मोठा समुदाय ज्या बंधनाने एकत्र आला आहे, ते ‘हिंदुत्व’ हेच होय. हे बंधन मोडून टाकणे किंवा त्याची उपेक्षा करून दृढ न राखणे म्हणजे हिंदुस्तानातील प्रजा वाळूच्या कणांप्रमाणे सैरावैरा मोकळी सोडणे होय.

टिळकांचे म्हणणे असे होते की, “आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र, लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही.


१९३३ साली गांधीजींनी आपल्या ‘हरिजन पत्रिके’च्या प्रथम प्रकाशनासाठी डॉ. आंबेडकरांचा संदेश मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती. या संदेशामध्ये बाबासाहेबांनी लिहिले होते की, “अस्पृश्यता वर्णव्यवस्थेचे उत्पादन आहे. जोपर्यंत वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत अस्पृश्यता राहील. या वर्णव्यवस्थेला नष्ट केल्याशिवाय अस्पृश्यता खर्‍या अर्थाने नष्ट होणार नाही.



महात्मा गांधींनी भारतीय राज्यघटना तयार होण्याअगोदर ‘लोकस्वराज्य’मध्ये लिहिले होते-“मी अशा राज्यघटनेसाठी प्रयत्नशील आहे, जी राज्यघटना हिंदुस्तानला गुलामी आणि आश्रित अवस्थेमधून मुक्त करणारी असेल. माझा प्रयत्न अशा भारतासाठी असेल, जेथे सर्व जातीजमाती एकोप्याने राहतील. सर्व वंशाचे लोक जेथे खेळीमेळीने राहतील. जेथे अस्पृश्यता आणि मादक पदार्थ यांना स्थान राहणार नाही. स्त्री-पुरुषांना समान हक्की राहतील. देशातील सर्व लोक शांतीने आणि एकोप्याने राहतील. जेथे लहानात लहान लष्कर ठेवलेले असेल. हा माझ्या स्वप्नातील भारत असेल. यापेक्षा कमीमध्ये मी समाधानी नसेन. मला वाटते, हिंदुस्तानचे ध्येय यापेक्षा वेगळे नसेल.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने व्हावी, यासाठी महात्मा गांधी यांनी आग्रह धरला होता.

धनंजय कीर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रात लिहितात, “अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी चर्चा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना सांगितले होते की, अस्पृश्यतेच्या समस्येच्या बाबतीत आपल्यात कितीही मतभेद असतील. मात्र, वेळ पडल्यास देशाला कमीत कमी जोखीम निर्माण होईल, असा मार्ग मी पसंत करीन.”



‘आपण हिंदू समाजाचे अंग आहोत,’ ही धारणा बाबासाहेबांच्या मनात १९३५ पर्यंत राहिली. मात्र, त्यांना असे लक्षात आले की, ‘स्पृश्य नि अस्पृश्य या उभयतांतील होऊ घातलेल्या संघटनेला व तद्जन्य हिंदू समाजाच्या सामर्थ्याला कवडीचीही किंमत स्पृश्य समाज देत नाही. स्पृश्य हिंदू समाजाने केलेल्या निराशेमुळेच त्यांना आपले व्यापक एकात्म हिंदू समाजाच्या ऐक्याचे ध्येय बाजूला ठेवावे लागले.

डॉ. आंबेडकर व डॉ. हेडगेवार दोघांच्याही सामाजिक ऐक्य साधण्याच्या पद्धती वेगवेगळ्या वाटत असल्या, तरी दोघांची दिशा एकच आहे. समतेचे व समरसतेचे दोघेही समर्थक आहेत. परंतु, डॉ. आंबेडकर व डॉ. हेडगेवार या दोघांचेही प्रारंभबिंदू भिन्न असल्यामुळे दोघांनी विभिन्न मार्गांचा अवलंब केला. १९३४च्या वर्धा येथील संघ शिबिराला महात्माजींनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले की, शिबिरात कुणाच्याही मनात स्वतःच्या जातीचे भान नव्हते, दुसर्‍यांच्याही जातीचे नव्हते, ‘आपण सर्व हिंदू आहोत’ हीच एकमात्र भावना सर्वांच्या मनात होती. त्यामुळे सर्वत्र उठणे, बसणे, जेवणखाण, झोपणे आदी सर्वच दैनंदिन व्यवहार एकत्रच होत होते. महात्माजींना या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले. दुसर्‍या दिवशी डॉ. हेडगेवारांशी त्यांची भेट झाली. त्यावेळी संघाने अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम यशस्वी रीतीने चालविला आहे, म्हणून महात्माजींनी डॉ. हेडगेवारांचे अभिनंदन केले. त्यावर डॉ. हेडगेवार म्हणाले, “संघात अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम चालविला जात नाही. आम्ही केवळ भावात्मक भूमिकेतून सांगतो की, ‘आपण सर्व हिंदू एक आहोत.या एकत्वाच्या जाणिवेमुळेच संघात जातीपातींचे किंवा स्पृश्यास्पृश्यतेचे भान कुणालाही राहत नाही. आपण सर्व हिंदू एक आहोत,’ एवढेच एकमेव भान जागे असते.”



१९३७ साली कर्णावतीच्या हिंदू महासभा अधिवेशनात जेव्हा ’हिंदू हेच राष्ट्र आहेत’ हा आपला सिद्धांत सावरकरांनी प्रकटपणे घोषित केला, तेव्हा त्यांच्या ‘राष्ट्र’ कल्पनेने अनेकांना धक्का बसला. तोपर्यंत सारे अखिल भारतीय पुढारी जो ‘हिंदी राष्ट्रवाद’ गृहीत धरीत होते, त्याच्या तळाशी असणारी ‘राष्ट्र’ कल्पना आणि सावरकरांची ‘राष्ट्र’ कल्पना यांत मूलगामी अंतर होते. भारताच्या भूमीवर राहणारे नि ब्रिटिशांच्या सत्तेखाली एकत्र आलेले हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारशी वगैरे सर्व वेगवेगळे समाज म्हणजे ‘राष्ट्र’ अशी ‘हिंदी राष्ट्रवादा’ची कल्पना होती, तर केवळ हिंदू म्हणजेच भारताच्या भूमीवरील राष्ट्र, असे स्वा. सावरकरांचे प्रतिपादन होते.



“जातिभेद निव्वळ पोथीजात आहे. जातींनी जी उच्चनीचता पोसली जाते, विषमता बळावते, ती राष्ट्रघातक आहे. जातिभेद म्हणजे चातुवर्ण्य नव्हे आणि जातिभेद नि चातुवर्ण्य म्हणजे हिंदुत्व नव्हे वगैरे” प्रमेये जातिभेदाचे स्वरूप उलगडताना त्यांनी साधार मांडली आहेत. “जातींचा जाच मोडावयाचा असेल तर ‘वेदोक्तबंदी’, ‘व्यवसायबंदी’, ‘सिंधुबंदी’, ‘शुद्धीबंदी’, ‘रोटीबंदी’, ‘बेटीबंदी’ या शृंखला तोडून हिंदू समाजाने स्वतंत्र झाले पाहिजे, असे प्रतिपादन स्वा. सावरकरांनी केले.



स्वा. सावरकरांनी ‘हिंदुत्व नि चातुवर्ण्य’ किंवा ‘हिंदुत्व नि जातिभेद’ एकरूप समजण्याची चूक कधीही केली नाही आणि हिंदुत्व नि जुन्या, भाबड्या, बुद्धिहीन रुढीही एकरूप समजण्याची चूकही कधी केली नाही.


डॉ. आंबेडकरांना रा. स्व. संघाची पूर्ण माहिती होती व संघाच्या स्वयंसेवकांचा त्यांच्याशी नित्य संपर्क, चर्चा असे. रा. स्व. संघ ही हिंदू संघटनेचे कार्य करणारी एक अखिल भारतीय संघटना आहे. परंतु, अन्य हिंदुत्वनिष्ठ पक्ष वा हिंदू संघटन करणार्‍या संस्था व संघामध्ये फरक आहे, याचे भानही बाबासाहेबांना होते. त्यांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतरही हिंदू संघटनेचे महत्त्व जाहीर सभेमध्ये स्पष्ट करून सांगितले. धर्मांतर केल्यांनंतरही, “आम्ही हिंदूंनी चालविलेल्यास संघटनेच्या कार्याला मदत करू,” अशी घोषणा त्यांनी केली होती.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिल्ली येथे दि. २५ जानेवारी, १९४७ रोजी एका कार्यक्रमामध्ये म्हणाले होते, “आपण बंधुभावाचे तत्त्व आचरणात पाळीत नाही. ही आपणामधील उणीव होय. आपण भारतीय लोक हे परस्परांचे सख्खे भाऊ होत. सर्व भारतीय जनता ही एका जिव्हाळ्याची एकच एक जनता होय, अशी जी मनात भावना असते, ती ‘बंधुभावना’ या नावाने ओळखली जाते. बंधुभावाचे तत्त्व दररोजच्या व्यवहारात यशस्वीरितीने पाळणे हे मोठे बिकट कार्य आहे. जाती सामाजिक जीवनात तुटकपणा उत्पन्न करतात. मत्सर आणि तिरस्कार निर्माण करतात. या समरसतेच्या - समतेच्या शोषणरहितेच्या प्रस्थापनेच्या मार्गातील समस्येचे खरोखर निराकरण करावयाचे असेल, तर आपल्याला दोन्ही बाजूंनी अप्रियता स्वीकारावी लागेल. ज्यांच्या हातचे अधिकार, नवीन बदलामुळे जाणार आहेत, अशा लोकांची व शोषित असल्यामुळे अतिरेकी (extremist ) बनू शकतात, त्यांचीही नाराजी पत्करून संविधानिक मार्गाने, संतुलित पद्धतीने शोषितांचे नेतृत्व केले जाण्याची आवश्यकता आहे.



१९५२ साली भंडारा येथील निवडणुकीसाठी डॉ. आंबेडकरांसाठी दत्तोपंत ठेंगडी यांनी प्रचार केला होता. या निवडणुकीत बाबासाहेब जरी हरले तरी, आकड्यांचे विश्लेषण केल्यावर त्यांच्या ध्यानी आले, सवर्णांतील अनेकांनी त्यांना मतदान केले आहे. त्यामुळे त्यांना संतोष झाला. नव्या राजकीय व्यूहरचनेचा बाबासाहेबांच्या मनातील विचार पक्का होऊ लागला. परिणामी, बाबासाहेबांनी ‘शेड्युल्ड क्लास फेडरेशन’ या नावाचा त्याग करुन सर्वसमावेशक अशा ‘रिपब्लिकन’पक्षाची स्थापना दि. ४ ऑक्टोबर, १९५६ रोजी केली. दुर्दैवाने त्यानंतर काही महिन्यांतच, दि. ५ डिसेंबर, १९५७ रोजी बाबासाहेब बुद्धवासी झाल्यामुळे हिंदू समाजातील सामाजिक अभिसरणाची क्रिया मंद झाली.


जोपर्यंत बाबासाहेब राजकारणात सक्रीय होते, तोपर्यंत त्यांच्याच संघटनेतील जाती-उपजाती आपल्या जाती-उपजातींची जाणीव विसरून त्यांच्याचमागे उभे होते. मात्र, शेवटच्या काळात संघटनेमधील छोट्या छोट्या गटांच्या नेत्या-उपनेत्यांमधील भांडणाच्या, क्वचित हाणामारीच्या बातम्याही त्यांच्या कानावर येऊ लागल्या. यामुळे त्यांना अतीव दुःख होई. आरक्षणामुळे सुस्थाापित झालेला वर्ग आत्मसंतुष्ट होऊन राजकारणग्रस्त बनला व समाजसेवेपासून दूर झाला, हेदेखील बाबासाहेबांना अपेक्षित नव्हते.



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले वर्णरहित समाजव्यवस्थेचे लक्ष्य त्यांच्या अंतिम समयीदेखील साध्य झालेले नव्हते, ही खंत मनात घेऊनच त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला.



श्रीगुरुजींच्या प्रयत्नांनी १९६९च्या डिसेंबर महिन्यात, विश्व हिंदू परिषदेचे कर्नाटक प्रांताचे अधिवेशन उड्डपी येथे झाले. ‘हिंदू बांधवांनी आपापसात उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य अशा प्रकारचा कोणताही भेदभाव बाळगू नये, या भावनेने सर्व व्यवहार करावेत व परधर्मात गेलेल्या लोकांना परत हिंदू करून घ्यावे,’ असा ठराव या अधिवेशनात संमत झाला. या अधिवेशनामधे हिंदू धर्मातील ४० पेक्षा अधिक पंथांच्या, संप्रदायांच्या प्रमुखांनी/साधू-संतांनी उपस्थित राहून आपले शुभाशीर्वाद दिले.



हिंदू समाजात काही दोष आहेत हे उघडच आहे. परंतु, या दोषांबरोबरच काही वैशिष्ट्ये ही आहेत.



‘हिंदू समाज विघटित आहे, दुर्बल आहे. सर्व माणसे ईश्वराची लेकरे आहेत,’ असे मानणार्‍या हिंदू धर्मात उच्चनीचतेचे भाव आले आहेत. असमानता आली आहे. समानतेचे साम्राज्य स्थापन करण्याकरिता, ‘सर्व माणसे ईश्वराची लेकरे आहेत’ यापेक्षा अधिक मोठा सिद्धांत सापडणार नाही, अशी धारणा असणार्‍या डॉ. आंबेडकरांनीही याबद्दल दुःख प्रकट केले आहे.



तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस, १९७४ साली वसंत व्याख्यानमालेतील आपल्या भाषणात म्हणाले होते, “संघ ‘हिंदू’, ‘हिंदू समाज’, ‘हिंदू राष्ट्र’ या शब्दाचा उच्चार करतो, म्हणून संघावर आगपाखड केली जाते. पण, हे शब्दप्रयोग १९२५ याली संघ स्थापन झाला तेव्हाच रुढ झालेले नाहीत. प्राचीन ऋषिमुनींपासून आधुनिक काळातील विवेकानंद-अरविंद-टिळक-महात्माजींपर्यंतच्या थोर पुरुषांनी हे शब्दप्रयोग रूढ केले आहेत.या देशाच्याउद्धारासाठी हिंदू संघटन आवश्यक आहे आणि हिंदू संघटन होण्याकरिता सामाजिक समरसता आवश्यक आहे. या भूमिकेतूनच विचार करण्याची आणि ‘हिंदू’ ही सांप्रदायिक वा भौगोलिक संज्ञा नसून, ती हजारो वर्षांच्या कालखंडात अनेक प्रकारची समयानुकूल देवाणघेवाण करून निर्माण झालेली जीवनपद्धती वा संस्कृतीनिदर्शक संज्ञा आहे, हे ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे. 'If Untouchability is not bad, nothing is bad in world.'

- मधू देवळेकर

(लेखक माजी आमदार आहेत.)