वन विभाग आणि 'राॅ' प्राणिप्रेमी संस्थेचा पुढाकार
मु्ंबई (विशेष प्रतिनिधी) - मुरुबाडमधील असोला गावात बेवारस अवस्थेत सापडलेल्या चौशिंग्याच्या दोन पिल्ल्लांना शनिवारी वन विभागाने 'राॅ' या प्राणिप्रेमी संस्थेच्या मदतीने ताब्यात घेतले. या पिल्लांना त्यांच्या आईकडे सोपविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यामध्ये यश न मिळाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील देखरेखीसाठी त्यांची रवानगी बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त करण्यात आली आहे.
राज्यात सध्या लाॅकडाऊन असले, तरी वन विभाग आणि अनेक वन्यजीव बचाव संस्थेचे कार्यकर्ते वन्यजीवांच्या बचावासाठी पुढाकार घेत आहेत. शनिवारी 'राॅ' या प्राणिप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मुरबाड मधून चौशिंग्याच्या दोन पिल्लांना ताब्यात घेतले. वनवासी शेळीपालकाने जंगलात चरण्यासाठी नेलेल्या शेळ्यांच्या कपळातून ही पिल्ले असोला गावात आली. ही पिल्ले शेळीचे दूध पिण्याचा प्रयत्न करत होती. ती वेगळी दिसल्याने शेळीपालकाने लागलीच त्याची माहिती वन विभागाला दिली. वनकर्मचाऱ्यांनी या पिल्लांना त्यांच्या आईकडे पुन्हा सोडण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या आईचा ठावठिकाणा न लागल्याने 'राॅ' संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने शनिवारी त्यांना मु्ंबईत हलविण्यात आले.
चौशिंग्याच्या या पिल्लांना 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या वन्यजीव बचाव गटाच्या ताब्यात वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांच्या उपस्थितीत दिल्याची माहिती 'राॅ'चे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली. या पिल्लांची देखरेख उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. ही संपूर्ण कारवाई ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर आणि मुरबाड वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश रसाळे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत करण्यात आली.