कोरोना विरुद्ध केंद्र सरकार! उपाययोजना वाचा सविस्तर

    12-Apr-2020
Total Views |
India Against Corona_1&nb
 


नवी दिल्ली : संकट काळात परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहोत, असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने केली जात आहे. नागरी सामाजिक संघटनांच्या आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून लोकांना घराबाहेर पडायला लागू नये, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. 

भारतीय लष्कराच्या तुकड्या देखील कोरिनाविरुध्दच्या लढाईत आघाडीवर असून ग्रामीण भारतात अन्नधान्य वाटप करत आहेत आणि समुदाय जागृतीचेही काम करत आहेत, जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित परिस्थिती नियंत्रणात आहे, गृहमंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात, नागरी हवाई उड्डाण, ग्राहक व्यवहार आणि रेल्वे विभागचे अधिकारी राज्यांशी समन्वय साधून या वस्तूंच्या वाहतुकीतील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न करत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने पुन्हा स्पष्ट केले आहे की, 'आंतरराज्यीय आणि राज्यांतंर्गत अशा कोणत्याही प्रकारच्या मालवाहतुकीवर काहीही निर्बंध नाहीत. जीवनावश्यक वस्तू आणि इतर मालाच्याही वस्तूंवर निर्बंध नाहीत, हा सर्व माल गोदामे आणि शीतगृहांमध्ये साठवून ठेवता येईल. अत्यावश्यक सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना सहज पास मिळतील याची काळजी राज्यातील अधिकाऱ्यांनी घेतलीच पाहिजे, जेणेकरून या उद्योगांना त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही. 

सायबर गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन

सध्या आपल्यापैकी अनेक जण घरुन काम करत आहेत, सोशल मिडियाचाही भरपूर वापर सुरू आहे. याच अनुषंगाने, गृहमंत्रालयाच्या सायबर दोस्त कडून सर्वांना सायबर गुन्ह्यांपासून- गुन्हेगारी किंवा आर्थिक-दोन्ही स्वरूपाच्या, सगळी मदत आणि माहिती दिली जात आहे. सर्वांनी @cyberDost ट्विटर फॉलो करावे, त्यावर सायबर गुन्ह्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली जात आहे. यासाठी http://cybercrime.gov.in या पोर्टलचा देखील वापर केला जाऊ शकतो. या पोर्टलवर सायबर गुन्ह्यांची तक्रार दाखल करता येईल, यामुळे सायबर स्पेस वर आपल्या सुरक्षेची हमी मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.

दररोज १५ हजार ७४७ जणांची चाचणी

सध्या देशात २१९ चाचणी प्रयोगशाळा आहेत, यातील १५१ सरकारी तर ६८ प्रयोगशाळा खाजगी क्षेत्रातल्या आहेत. - ICMR आतापर्यंत कोविड१९ साठी १,८६,९०६ नमुन्यांची चाचणी केली गेली. त्यापैकी ७,९५३ नमुने ४.३% पॉझिटिव्ह निघाले. गेल्या पाच दिवसांत, दररोज सरासरी १५,७४७ नमुन्याची चाचणी केली गेली. त्यापैकी दररोज सरासरी ५८४ रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेच्या आधारे आम्ही देशभरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयातील कोविड-१९ च्या चाचण्याच्या क्षमतेत तातडीने वाढ करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती आरोग्य 
मंत्रालयामार्फत देण्यात आली.

आत्तापर्यंत ७१६ रुग्ण बरे झाले

कोविड१९ ची चाचणी क्षमता अधिक वाढवण्यासाठी आम्ही १४ प्रमुख संस्थांची निवड केली आहे, जसे AIIMS आणि NIMHANS सारख्या या संस्था सरकारी आणि इतर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड विषयक महिती देऊन रुग्णालयांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतील. आपल्या सर्व प्रयत्नांचा भर, पॉझिटिव्ह रुग्णांचे सुयोग्य वैद्यकीय व्यवस्थापन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आणि कंटेंनमेंट धोरणाची अचूक अंमलबजावणी यावर आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. आतापर्यंतच्या एकूण कोविड१९ रुग्णांची संख्या-८,३५६ कालपासून आलेले नवे रुग्ण ९०९ आणि मृत्यू ३४ आतापर्यंत या आजाराने २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७१६ जण उपचारानंतर या आजारातून बरे झाले आहेत. कालपासून देशात एकूण ७४ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

८०% रुग्णांमध्ये कोविड१९ची अत्यंत सौम्य किंवा अगदी किरकोळ लक्षणे असून त्यांच्यावर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार केले जात आहेत. मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर कोविडहेल्थ केअर सेंटर्स तर गंभीर रुग्णांवर कोविड रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. रुग्णांच्या लक्षणांनुसार त्यांना योग्य रुग्णालयात पाठवता यावे, यासाठी सुयोग्य मॅपिंग केले गेले आहे. २९ मार्चला ९२७ इतकी असलेली कोविड१९ च्या रुग्णांची संख्या आज ८३५६ पर्यंत पोहचली असली, तरीही, ऑक्सिजनची गरज असणारे वा गंभीर स्वरूपाचे रुग्ण आजही केवळ २०% आहेत. कोविडच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार गरजेपेक्षाही अधिक सज्ज आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

१ लाख पाच हजार खाटा उपलब्ध

१९६ किंवा पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २०% व्यक्तींना २९ मार्च रोजी अति दक्षतेची गरज होती, तर ४२,००० समर्पित कोविड-१९ खाटा उपलब्ध होत्या. आज, १,६७१ खाटांची गरज आहे, आमच्याकडे ६०१ समर्पित रुग्णालयात १.०५ लाखांपेक्षा जास्त समर्पित कोविड-१९ खाटा आहेत. सरकार आगामी परिस्थितीचे अनुमान करत त्यानुसार सज्जता करत आहे. कोविड समर्पित रुग्णालयांची आणि कोविडसाठी समर्पित अलगीकरण खाटांची संख्या वाढवली जात आहे. आपण अधिक जास्त सज्ज आहोत. कोविड-१९ व्यवस्थापनाच्या विविध पैलूंसंदर्भात आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यावर देखील आमचा भर आहे. जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष कार्यस्थळी कोणत्याही अडचणी येऊ नयेत. गेले दोन महिने याबाबतचे प्रशिक्षण सुरु आहे.

दुर्गम भागातही रुग्णसेवा पोहोचवण्याची तयारी सुरू

एम्स दिल्ली मध्ये सुमारे २५० बेड आहेत त्यापैकी ७० व्हेंटिलेटर बेड आहेत. सफदरजंग रुग्णालय, दिल्ली मध्ये ४०० बेड आहेत तिथे एक संपूर्ण विभाग कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी राखीव आहे, या विभागाचे काम समर्पित कोविड रुग्णालयासारखेच चालते. प्रत्येक समर्पित रुग्णालयासाठी एक विशेष वैद्यकीय अधिकारी नियुक्त केला आहे. आवश्यक उपकरणे, राज्यांशी समन्वय राखून सज्ज ठेवली जात आहेत. यात खाजगी क्षेत्र ही संपूर्ण सहभाग देत असून खाजगी क्षेत्रातही कोविड समर्पित रुग्णालये उभारली जात आहेत. लष्करी रुग्णालयात ९,००० कोविड-१९ खाटा तयार करण्यात आल्या आहेत, त्यांच्या क्षमतेत ७००० ने वाढ करता येऊ शकते. आयुध निर्माण मंडळाने अरुणाचल प्रदेशात ५० विशेष वॉटरप्रूफ तंबू बनवले आहेत जेणेकरून गरज पडल्यास, आम्ही देशाच्या दुर्गम भागातल्या लोकांपर्यंत वैद्यकीय सुविधा आणि इतर सेवा पोहचवू शकू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

२० हजार डब्यांचे रुपांतर विलगीकरण कक्षात

कोविड-१९ विरोधातील लढ्यात शक्य होईल तितक्या सर्व मार्गांनी योगदान देण्याचा प्रयत्न आमचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग देखील करत आहेत. भारतीय रेल्वे २०,००० डब्यांचे रूपांतर विलगीकरण कक्षात करणार आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५००० डब्यांचे रुपांतरण पूर्ण झाले आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशानुसार सरकार असामान्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी असामान्य प्रयत्न करत आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे आणि जशी स्थिती उत्पन्न होत आहे त्यानुसार अतिरिक्त सज्जता ठेवली जात आहे.

बरे झालात तरी उपाययोजना कायम ठेवा

चीन, जपान आणि कोरिया या देशात अलीकडेच कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची प्रकरणे आमच्यासाठी देखील चिंतेची बाब आहे. म्हणूनच आपण आतापर्यंत आपल्या प्रतिबंधक आणि सामाजिक अंतराच्या ज्या उपाययोजना करत आलो त्यांचे पालन सुरुच ठेवणे आवश्यक आहे.


युक्ती पोर्टलचे उद्घाटन

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल “निशंक” यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे ‘युक्ती’ म्हणजेच, यंग इंडिया कॉम्बेटिंग कोविड विथ ज्ञान(नॉलेज), तंत्रज्ञान (टेक्नोलॉजी) नवीनीकरण (इनोव्हेशन)या वेब पोर्टलचे उद्‌घाटन झाले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेले उपक्रम आणि उपाययोजना यांची नोंद ठेवणे तसेच त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे


रोग प्रतीरोधकांचे संशोधन सुरू

रोगप्रतिकारशक्ती उत्तम असलेल्या रुग्णाच्या शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणारी प्रतीरोधके (अँटी बॉडीज) या कोविड-१९ विषाणूच्या आक्रमणाचा मुकाबला करतात. गंभीर, संसर्गजन्य आजारावर उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या प्लाज्मामधून निर्माण झालेली प्रतिरोधके विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहेत. भारतातही, दिल्ली विद्यापीठाच्या दक्षिण परिसरात-संसर्गजन्य आजार संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्रात(UDSC-CIIDRET),प्राध्यापक विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि जैवतंत्रज्ञान विभाग व विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयच्या पाठिंब्याने हे संशोधन सुरु आहे.

नितीन गडकरींतर्फे पीईपी किट्सचे वितरण

कोविड -१९ महामारीच्या काळात नेव्हल एअर स्टेशन (एनएएस) उतक्रोश आणि मटेरियल ऑर्गनायझेशन (पोर्ट ब्लेअर) यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये गरजू लोकांपर्यंत पोहोचून अन्न वितरण केले.या नौदलाच्या हवाई तळाच्या पायाभूत विकासासाठी काम करणाऱ्या १५५ मजुरांसाठी एनएएस उतक्रोश यांनी अन्न वितरण शिबिर आयोजित केले होते. हे कामगार सध्या हवाई तळाच्या परिसरात राहत आहेत. केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्रालयांतर्गत नागपूर स्थित गारमेंट फॅसिलिटी सेंटर द्वारे निर्मित पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात पी. पी.ई. कीटस्‌चे वितरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना केले.
डॉक्टर आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिक संरक्षण

देशामध्ये काही ठिकाणी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी वर्गाचा छळ केला जात असल्याच्या घटना सामोऱ्या आल्या आहेत. हे लक्षात घेवून केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तसेच पोलिस अधिकारी वर्गाला काही निर्देश दिले आहेत. वैद्यकीय कर्मचारी वर्गाला पुरेसे पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड१९ शी संबधित उपक्रमांबाबत सीएसआर म्हणजेच, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या खर्चविषयक पात्रतेसंबंधी कार्पोरेट मंत्रालयाला विविध हितसंबंधीयांकडून अनेक प्रश्न,/निवेदने प्राप्त होत आहेत. या सर्व प्रश्न आणि निवेदनांची दखल घेत, मंत्रालयाने वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे असा एक संच तयार केला आहे जेणेकरुन या संदर्भात विविध घटकांना असलेल्या समस्यांचे निराकरण होईल.

अत्यावश्यक वस्तू वाहतूकीसाठी विशेष रेल्वे सेवा


लॉक डाऊन सुरु झाल्यापासून रेल्वेने फळे, भाजीपाला,दुध, दुग्धजन्य उत्पादने यासारख्या नाशवंत वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आणि कृषी क्षेत्रासाठीच्या बियाण्याच्या वाहतुकीसाठीच्या पार्सल विशेष गाडीकरिता ६७ मार्ग (१३४ गाड्या )निश्चित केले आहेत. १० एप्रिल पर्यंत ६२ मार्ग अधिसूचित करण्यात आले असून या मार्गावर १७१ गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत. पार्सल विशेष गाडीसाठीची लिंक भारतीय रेल्वेच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे- indianrailways.gov.in


महाराष्ट्र अपडेट्स

प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांतर्फे ३५,००० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात १३४ नव्या केसेससह एकूण १८९५ रुग्णसंख्या झाली आहे.


पीएमयुवाय लाभार्थ्यांच्या खात्यात ५,६०६ कोटी जमा

अत्यावश्यक सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना सहज पास मिळतील याची काळजी राज्यातील अधिकाऱ्यांनी घ्यावी: गृह मंत्रालय कोविड-१९ च्या आर्थिक प्रतिसादाचा भाग म्हणून, भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) अनेक उपक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत,तेल विपणन कंपन्यांनी पीएमजीकेवाय अंतर्गत एलपीजी सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी ७.१५ कोटी पीएमयुवाय लाभार्थ्यांच्या खात्यात सुरुवातीच्या टप्प्यात ५,६०६ कोटी रुपये जमा केले आहेत. या महिन्यात लाभार्थ्यांनी १.२६ कोटी सिलेंडरची बुकिंग केली आहे, ज्यापैकी ८५ लाख सिलेंडर पीएमयुवाय लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत.