एका युद्धसमाप्तीची १५५ वर्षे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2020   
Total Views |
American Civil war _1&nbs
 
 
 

जगाच्या पाठीवर अमेरिकेच्या संविधानिक इतिहासाची उद्धरणे विचारात घेतली जातात. मात्र, अमेरिकी संविधानाचे हे वैशिष्ट्य की, तेथील राज्यघटनेवर जितके बौद्धिक संस्कार झालेत, त्याहून अधिक भौतिक संस्कार झाले आहेत. तसे इतर जगाच्या बाबतीत उदाहरण सापडत नाही. कोणतेही लिखित स्वरूपाची राज्यघटना नसताना विकसित होत गेलेली ब्रिटनची व्यवस्था किंवा कोणतेच लिखित संविधान यशस्वी झाले नाही म्हणून नवनवीन आवृत्त्या जन्माला घालणारा फ्रेंचांचा घटनावाद!

घटनावादातील दोन टोकांमधील मध्यममार्ग शोधताना प्रत्यक्ष जीवनपद्धतीबाबत मात्र टोकाला जाऊन बदल घडवणारा, असा अमेरिकेच्या संविधानाचा इतिहास आहे. अमेरिकेच्या संविधानात व आधुनिक राज्यशास्त्राच्या संकल्पनांत मूलभूत बदल घडविणारे अनेक टप्पे त्या इतिहासात येऊन गेले आहेत. महिलांच्या मतदान अधिकाराचा लढा व कृष्णवर्णीयांनी लढलेले गृहयुद्ध हे त्यातील अभ्यास करण्यायोग्य टप्पे आहेत. गृहयुद्धाच्या समाप्तीला काल १५५ वर्षे पूर्ण झाली. गृहयुद्धाची सुरुवात, यापेक्षा जास्त त्याचा शेवट अधिक परिणामकारक झाला होता. क्रांतीची सुरुवात धाडसी असते, मात्र त्याची समाप्ती अनकेदा मूळ उद्देशाच्या विपरीत परिणाम देणारी ठरते. अमेरिकन गृहयुद्धाच्या बाबतीत त्याची समाप्ती अधिक समर्पक ठरली. म्हणून या घटनेचे व त्यासंबंधी इतिहासाचे स्मरण जगाने केले पाहिजे.

 

दक्षिण अमेरिकेतील अनेक वसाहतींचे नेतृत्व करणारे अब्राहम लिंकन या स्थित्यंतराचे केंद्रबिंदू ठरतात. स्वातंत्र्याचा जाहीरनामा मांडणार्‍या थॉमस जेफरसनकडे स्वत:चे खासगी गुलाम होते, असा आरोप केला जातो. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणार्‍या एका नेत्याचीच ही अवस्था होती. प्रत्यक्ष अमेरिकेत परिस्थिती काय असावी, याचा विचारही करणे अवघड आहे. जेफरसनकडे साधारणतः ६०० कृष्णवर्णीय गुलाम होते. मानवाचे अधिकार, 'कॉमनसेन्स' हा निबंध लिहिणारा थॉमस पेन असो अथवा सॅम्युएल अ‍ॅडम, कृष्णवर्णीयांच्या गुलामीची दखल मात्र कोणत्याच 'पेनाने' घेतली नाही. त्याउलट गुलामांचा व्यापार नियमित करणारे कायदे इ. तरतुदी केल्या जात होत्या. अखेर हा प्रश्न गृहयुद्धासारख्या रक्तरंजित मार्गाने सोडवला गेला.

 

एका लोकशाही देशात स्वतःच्या न्यायहक्कांच्या मागणीसाठी लोकांनी शस्त्र उचलली, हे पटत नाही. त्यात युद्धनेता लिंकनसारखा प्रगल्भ माणूस होता, हेदेखील काल्पनिक वाटते. अमेरिकेत असे घडले व तो इतिहास स्वीकारला पाहिजे. पण, इतक्या उग्रवादी परिस्थितीमध्येही लिंकनसारख्या नेतृत्वाने आपली परिपक्वता सोडली नाही. अमेरिकेने व्हिएतनाम युद्धापर्यंत लढलेल्या सर्व युद्धात बळी गेलेल्यांच्या संख्येपेक्षा एकट्या गृहयुद्धात मारले गेलेल्यांची संख्या जास्त आहे. एकाच मातृभूमीचे दोन पुत्र एकमेकांविरोधात लढत होते. ४ एप्रिल, १८६५ रोजी साडेचार वर्षांच्या मोठ्या काळानंतर याला पूर्णविराम मिळाला.

 

रक्तरंजित व महाभयानक घटनाक्रमाची पार्श्वभूमी असूनही अमेरिकेत लोकशाही व्यवस्था टिकून राहिली. संविधानिक व्यवस्था अधिक बळकट झाली. आवश्यक तसे बदल त्यात केले गेले. मात्र, व्यवस्था उलथवून टाकण्याचे प्रकार झाले नाही. कृष्णवर्णीयांचे नेतृत्व करणार्‍या लिंकन यांनी दाखविलेली राष्ट्रीयता व त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणारा समाज यांना त्याचे श्रेय आहे. 'आपण देश म्हणून एक आहोत. आपले राष्ट्र एकसंधच राहणार आहे,' अशी भूमिका लिंकन यांनी घेतली. देश तुटू दिला नाही. लिंकन यांची भूमिका अमेरिकेने स्वीकारली. म्हणून तेथील व्यवस्था उद्ध्वस्त झाली नाही. व्यवस्थेतील अन्याय दूर झाला. मात्र, व्यवस्था आजतागायत तशीच आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्रीय मन अशा घटनांनी तयार झालेले असते. त्यामुळे जगाचे आकलन करताना त्यांचा अन्वय या पूर्वपीठिकेचा आहे. आपल्याकडे हिंदुत्वाचे सांस्कृतिक प्रबोधन इतके बळकट होते की गुलामीसारख्या अमानुष प्रथांनी कधी भारतात टिकाव धरला नाही. भारतीय व्यवस्थेत अन्याय असला तरी त्याचे स्वरूप गुलामीसारखे भीषण नव्हते. पाश्चिमात्य देशातील प्रज्ञाप्रवाहाला भूल पाडताना भारतातील अनेक फुटीरतावादी मोठ्या चलाखीने भारतात घडणार्‍या घटनांचा अमेरिकेत घडून गेलेल्या इतिहासाशी साम्य दाखविण्याचा प्रयत्न करतात. तेथील वृत्तपत्रातून लिहिणारे भारतीय पत्रकार हे प्रयत्नपूर्वक करीत असतात. पाश्चिमात्य जगाची जडणघडण विचारात घेऊन त्यातून आपल्याकडील राष्ट्रजीवनाचे भेद दाखविण्याची गरज आहे. तसे झाले तर भारतात गृहयुद्ध घडविण्याचे प्रयत्न यशस्वी होण्याच्या शक्यता शून्यवत होतील.






@@AUTHORINFO_V1@@