पारख चांगल्या-वाईटाची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |
 पारख चांगल्या-वाईटाची!_1
 


पाकत्रा स्थन देवा हृत्सु जानीथ मर्त्यम्।

उपद्वयुं चाद्वयुं च वसवः ॥

(ऋग्वेद- ८.१८.१५)

अन्वयार्थ

(वसवः देवाः) हे वसुंनो! हे देवांनो! (पाकत्राः) तुम्ही परिपक्व ज्ञानाचे (स्थन) व्हा. (मर्त्यम्) या जगातील मरणधर्मी माणसांच्या स्वभावांना (हृत्सु) आपल्या अंतःकरणात (जानीथ) जाणा, ओळखा! (द्वयुम् च) दोन्ही पद्धतीने, दुतोंडी वागणार्‍या वाईट माणसांना आणि (अद्वयुम्) द्वंद्वरहित, एकसारखे- समानतेने वागणार्‍या चांगल्या माणसांना (पण) ओळखा. त्यांची पारख करा. कदापि धोका खाऊ नका. (जानीथ)

विवेचन

हे जग विचित्र स्वरुपाचे आहे. इथे सर्वच प्रकारचे लोक आढळतात. कोण कसा, तर कोण कसा? सगळे एकसारखे नाहीत. 'भिन्नप्रकृतयः लोकः ।' या जगात लोकांच्या प्रकृती व प्रवृत्ती वेगवेगळ्या आहेत. 'विचित्ररुपाः खळु चित्तवृत्तयः।' मानवाच्या चित्तवृत्ती, स्वभाव हे नामानिराळे आहेत. पण, असे असले तरी त्यांच्यातूनच नवनीत काढून घेतले पाहिजे. त्यांमधूनच चांगले व योग्य शोधले पाहिजे. जगाला नावे ठेवून चालणार नाही. जन्माला येताना प्रत्येक जण आपले चांगले-वाईट संस्कार घेऊन येतो. म्हणून कोणालाही दोष देऊन जमणार नाही. हे सारे जग द्वंद्वात्मक आहे. कुठे विष आहे, तर कुठे अमृत! भर्तृहरी महाराज म्हणतात-

न जाने संसारः

किममृतमयः किं विषमयः।

अशाही परिस्थितीतून वाट काढली पाहिजे. या वेदमंत्रात दोन प्रकारच्या लोकांना ओळखून त्यांच्याशी योग्य तो व्यवहार करण्याचा उपदेश मिळतो. याकरिता 'द्वयु' आणि 'अद्वयु' असे शब्द आले आहे. 'द्वयु' म्हणजे दुटप्पी वागणारे. एकविचारी व एकसारखे न वागणारे! नेहमी बदलणारे! 'द्वयु' लोक तोंडचोपडे असतात. स्वार्थापायी ते सर्वांचीच प्रशंसा करतात. लोकांसाठी कोणाचीही स्तुती करणारे असे हे स्तुतिपाठक धोकादायक असतात. ते मन, वाणी व कर्माचे पक्के व एकसारखे नसतात. 'मनसि अन्यत्, वचसि अन्यत् कर्मणि अन्यत् दुरात्मनाम्।' अशी स्थिती 'द्वयुं'ची असते. म्हणूनच त्यांना 'दुरात्मा' म्हणजे 'दुष्ट आत्मा' म्हटले आहे. 'द्वयु' लोक कधी विश्वासघात करतील, याचा नेम नाही. खरे तर हे 'आगलावेच!' कारण इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे करण्यात ते पटाईत असतात. अनावश्यक ते बोलून संबंध बिघडविण्याकरिता ते पुढारलेले असतात. यामुळे केवळ दोन व्यक्तींतच नव्हे, तर संपूर्ण मानव समूहामध्ये संघर्षाचा वणवा पेटतो. म्हणूनच अशा 'द्वयु' म्हणजेच दुतोंडी दुर्जनांपासून वेळीच सावध राहावयास हवे. याउलट 'अद्वयु' म्हणजेच एकसमान वृत्तीचे जे असतात, ते खरोखरच समाज व राष्ट्राची भूषणेच!

प्रसंगी प्राण गेले, तरी बेहत्तर, पण वचनाला सांभाळतील! दिलेला शब्द पाळतील! म्हणूनच सज्जन, सत्पुरुष, संत, महात्मे म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे कोणताही द्वंद्व नाही. परिस्थिती अथवा काळ कितीही बदलला तरी ते आपली वृत्ती सोडत नाहीत. 'मनस्येकं वचस्येकं कर्मण्येकम् च सज्जनानाम् ।' असे त्याविषयी म्हटले जाते. मन, वचन व काया एकसारखे ठेवून नेहमी इतरांचे भले करण्यात ते गढून गेलेले असतात.

अशा 'द्वयु' व 'अद्वयुं'ची पारख करून त्यांना किती महत्त्व द्यावयाचे, हे आपणास ठरवावयाचे असते. अशांना आपण आपल्या हृदयातून ओळखावे. म्हणजे त्यांचे स्वभाव व वृत्ती ओळखून त्यांच्याविषयी काहीही वाच्यता न करता त्यांना किती महत्त्व द्यायचे, ते ठरवावे. याकरिता आपणास विवेकशील व्हावे लागले. रत्नपारखी हा दगड-मातीतून रत्नांना शोधतो. तसेच या चांगल्या-वाईटांतून योग्य तेच शोधावयाचे व त्यांचा सदुपयोग करून घ्यावयाचा!

या 'द्वयु' व 'अद्वयुं'ची पारख करण्यासाठी गरज असते, ती दूरदर्शी, प्रज्ञावंत व उदारमनाच्या महात्म्यांची! या मंत्राच्या प्रारंभी याचे उत्तर मिळते.

'पाकत्रा स्थन देवा... वसवः।'

इथे 'देवाः' आणि 'वसवः' ही दोन संबोधने आली आहेत. पुढील चांगल्या-वाईटांची पारख करण्याकरिता मोठ्या मनाची माणसे लागतात. त्यासाठी 'देव' आणि 'वसु' व्हावे लागते. क्षुद्रबुद्धीचे आणि संकुचित मनाचे साधारण लोक 'द्वयु' आणि 'अद्वयुं'ना ओळखू शकत नाहीत. दिव्यगुण, दातृत्वभाव व उत्तम ज्ञानाने द्योतक म्हणजेच प्रकाशित होणारे देवगण आवश्यक असतात. म्हणूनच 'देवा' हे संबोधन अतिशय समर्थक व सार्थक ठरते.

तसेच 'वसवः' हे संबोधनसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे.

'वसु' या शब्दाचे निर्वचन करताना महर्षी दयानंद म्हणतात-

वसन्ति भूतानि यस्मिन्नथवा यः सर्वेषु वसति स वसुरीश्वरः।म्हणजेच ज्यामध्ये पृथ्वी, आकाश, आप, तेज, वायु इत्यादी (पंच) महाभूत वसतात किंवा जो सर्वांमध्ये वसतो म्हणजेच जो सर्व जड चेतनांमध्ये राहतो, तो 'वसु' अर्थात 'ईश्वर' होय. या 'वसु' शब्दाला सामान्य बनविले, तर त्याचा अर्थ 'निवासस्थान' असाही होतो. शतपथ ब्राह्मणग्रंथात वर्णिलेल्या ३३ देवतांमध्ये आठ वसुंची गणना होते, ज्यावर (ज्याच्या आधारे) सर्व प्राणी वसतात किंवा राहतात अशी पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश, चंद्र, सूर्य, नक्षत्र हे आठ वसु (म्हणजे) सृष्टीची निवासस्थाने. पण, विद्वान हादेखील वसुच आहे. कारण तो आपल्या ज्ञान, विद्या, सद्बुद्धी व उत्तम आचरणाच्या बळावर मानव समूहाला नवी दिशा देतो. सज्जन व संतरूपी व वसुंमुळेच मानव समाजाची एकूणच जगाची सुस्थिती बनते. विद्वान, ज्ञानी व शूरवीर वसुंमुळे इतरांना जगण्याचे बळ मिळते.

अशा या देवता व वसुंना 'पाकत्रा स्थन।' असे आदेश ईश्वराकडून मिळाले आहेत. पाकत्रा म्हणजे ज्ञानाने, सद्गुणांनी परिपक्व तसेच आचारणानेही पाक (पवित्र) व स्वच्छ! अशा वसु व देवांमुळे निश्चितच समग्र प्राणिसमूहाची सर्वांगिण उन्नती साधण्यास मदत मिळते. समाज व राष्ट्राच्या उभारणीत 'पाकत्रा' म्हणजेच परिपक्व बुद्धीच्या आणि दूरदृष्टी बाळगणार्‍या सत्पुरुषांची फारच गरज असते. याउलट अपरिपक्व व बुद्धिहिन माणसांमुळे राष्ट्राची पदोपदी हानीच होते. इतिहासात डोकावून पाहिले असता अशी अनेक उदाहरणे सापडतील की, सद्विचारी समजदार, धीर-गंभीर व स्थिर बुद्धी असलेल्या महातंत्रांमुळे समाज व राष्ट्राची कशी मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली. याउलट मतिहिन, दुष्ट व स्वार्थी माणसामुळे देशाची अतिशय दुरवस्था झाली!

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे - '"A little knowledge is a dangerous thing' संकुचित क्षुद्र असे अल्पज्ञान म्हणजे धोक्याचा विचार!

अगदी रामायणकाळापासून ते महाभारतापर्यंत आणि मध्ययुगीन कालखंडापासून ते आजतागायत दृष्टिक्षेप टाकल्यास हेच निदर्शनास येते की व्यक्ती, कुटुंब, समाज, देश व जागतिक स्तरावर बुद्धिमान अशा सुविचारी सत्पुरुषांमुळे प्रगतीचे शिखर पादाक्रांत झाले, तर संकुचित, अविचारी लोकांमुळे झालेली प्रगती लयास गेली. मर्यादापुरुषोत्तम श्रीराम यांनी आपल्या सर्वोत्तम अशा गुण-कर्म-स्वभाव वैशिष्ट्यांनी जे अद्भुत कार्य केले, ते त्रिकाळ अजरामर ठरले. आपल्या पाकत्र (परिपक्व विशुद्ध व प्रेरक) विचार व कार्याद्वारे त्यांनी 'द्वयु' व 'अद्वयु' लोकांना ओळखले. या दुर्जन व सज्जनांशी त्यांनी एकसारखाच व्यवहार केला. समदृष्टी ठेवून त्यांना आपलेसे केले. परिणामी शत्रूदेखील मित्र झाले. सर्व प्राणिमात्रांशी त्यांचा दया, प्रेम, सहिष्णुता, करुणा आणि आपलेपणाचा व्यवहार होता. म्हणूनच १४ वर्षांच्या वनवासातदेखील त्यांना सर्वकाही अनुकूल झाले. शत्रुपक्षातील विभीषणसुद्धा मित्र बनला.

असेच आहे महाभारतातील युगपुरुष योगेश्वर श्रीकृष्णांबाबत! जीवनभर आप्तपुरुषांप्रमाणे आदर्श शुद्धाचरण करणार्‍या कृष्णांना कौरव पक्ष व पांडव पक्ष चांगल्या प्रकारे ज्ञात होता. दोन्हीकडील भावंडांना सन्मार्ग दाखविण्यात ते अग्रेसर होते. दुर्योधनाचीसमजूत काढून महाविनाशकारी युद्ध टाळण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. जेव्हा सारेच प्रयत्न व्यर्थ ठरले असता शेवटी पांडवांची बाजू घेऊन अर्जुनाचे निःशस्त्र सारथ्य स्वीकारले, तेही 'परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय च' या पवित्र उद्देशानेच!

तात्पर्य हाच की महान ध्येय, धर्माचरण, विवेकबुद्धी, दूरदृष्टी, विश्वबंधुता, मानवता आणि प्रगल्भ विचार बाळगणार्‍या सत्पुरुषांमुळे ही वसुंधरा सुजलाम् सुफलाम् व सुखकर बनू शकते.

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@