चैत्र शुद्ध नवमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |
ram_1  H x W: 0

आज चैत्र शुद्ध नवमी तिथी म्हणजे ‘रामनवमी.’ या दिवशी रामाचा अयोद्धेत जन्म झाला. भारतभर रामनवमी उत्साहात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी रामजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. परंतु, आज तसे होणार नाही. कोरोना विषाणूच्या जागतिक संकटाने आज सार्‍या विश्वभर चिंतेचे ढग जमले आहेत. घरातच राहावे असे आदेश आहेत आणि त्याचे तंतोतंत पालन करणे, हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे घरात राहूनच आपल्याला रामाचे, त्याच्या पराक्रमाचे, बंधविमोचनाचे भक्तिपूर्वक स्मरण करायचे आहे. त्याचप्रमाणे ‘चैत्र शुद्ध नवमी’ हा समर्थ रामदास्वामींचाही जन्मदिवस. दुष्ट यवनांनी ही पवित्र भारतभूमी त्यांच्या पापांनी डागाळली होती. जुलमी यवनी सत्तेचे चटके ठोसर घराण्याला बसले होते. जांब हे रामदासांच्या पूर्वजांनी वसवलेले गाव. यवनी सत्तेचे जुलमी आदेश रामदासांच्या घराला सोसावे लागले, तेव्हा रामदास लहान होते. त्यामुळे या सुलतानी सत्तेचे सावट दूर करून स्वाभिमानाने जगण्याचा निश्चय रामदासांनी बालवयात केला होता. रामदास लहान असतानाच म्हणाले होते की, ‘चिंता करितो विश्वाची.’ आज कोरोना विषाणूच्या थैमानाने आपल्याला आपल्या देशाची व विश्वाची चिंता करण्याची वेळ आली आहे. कोरोना विषाणूविरुद्ध घरी बसून लढा देऊन हे जग विषाणूमुक्त झालेले बघायचे आहे. आजच्या दिवशी समर्थांचा जो ‘समर्थ श्रीराम’ तसेच रामदासस्वामी यांच्या पुण्यपावन चरित्राचे, त्यांच्या कार्याचे स्मरण व गुणगान प्रेरणादायी व लाभदायी ठरणार आहे.

आपल्या तपाचरणाची १२ वर्षे संपल्यावर तीर्थाटन करून आपला देश आपली संस्कृती, तेथील पवित्र मंदिरे पाहावी अशी प्रेरणा रामदासांना झाली आणि ते नाशिकहून बाहेर पडले. आपला देश पायी फिरून पाहावा, ही प्रेरणा त्यांच्या रामरायाने दिलेली असो अथवा त्यांच्या अंतरात्म्यातून आलेली असो, रामदासांचे तीर्थाटन एका अर्थाने महाराष्ट्राच्या व संस्कृतिरक्षणाच्या हिताचे झाले. रामदास बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांची आकलनशक्ती फार चांगली होती. आपला देश व तेथील राजकीय-सामाजिक स्थिती त्यांनी सूक्ष्म नजरेतून पाहिली. लोकस्थितीचे अवलोकन केले. शहाजहानच्या हुकुमाने काशी क्षेत्रांतील पाऊणशे मंदिरांचा विध्वंस झालेला त्यांनी पाहिला. अल्तमशाने उज्जयिनीतील देवळांचा केलेला विध्वंस पाहिला. अयोध्येत रामाच्या जन्मस्थानी बाबराने बांधलेली मशीद म्हणजे इ. स. १६३२ ते १६४४ हा मुघल बादशाहीचा सुवर्णकाळ समजला जातो. बाबरापासून शहाजहानपर्यंत सार्‍यांनी अपरंपार संपत्ती जमा केली. शहाजहानच्या जपाच्या रत्नजडित माळांची किंमत इंग्रजांनी २० लाख रुपये केली होती. पण, हे सारे वैभव फक्त सुलतानांसाठी आणि मुसलमान प्रजेसाठी होते. हिंदूंची अवस्था दारूण होती. रामदासांच्या हे लक्षात आले की, परक्या देशातून आलेले हे मुठभर मुसलमान आपल्या खंडप्राय देशावर जुलमी राज्य करीत आहेत. त्यांच्या दुष्ट कारवायांनी सारा हिंदू समाज त्रस्त होता. या यवनांनी आल्याबरोबर प्रथम आमची तीर्थस्थाने भ्रष्ट केली. देवालयांची, त्यातील मूर्तींची तोडफोड केली. स्त्रिया पळवून नेल्या. त्यांची प्रचंड दहशत सामान्य प्रजेवर बसली. या क्रूर कारवायांनी आपापसात ताळमेळ नसलेली हिंदू राज्ये एकामागून एक पराजित झाली.



सत्ता मुस्लिमांच्या हाती गेली. आमची हिंदू संस्कृती मोडकळीस जाण्याची वेळ आली. विचार करताना रामदासांच्या लक्षात आले की, आम्ही कधी एकसंघ नव्हतो, आमच्या राज्यात आपापसात भांडणे होती. क्वचित प्रसंगी वैर होते. मुसलमान जसे धर्माच्या नावाखाली एक होतात, तसे आम्ही कधी एकसंघ नव्हतो. आमच्या राज्यात आपापसात भांडणे होती. क्वचित प्रसंगी वैर होते. मुसलमान जसा धर्माच्या नावाखाली एक होतो, तसे आम्ही कुठल्याही कारणासाठी एक झालो नाही. आम्ही स्वकीयांना साहाय्य करण्याऐवजी परधार्जिणे झालो, आम्ही गाफिल राहिलो, दूरवरचा विचार केला नाही. परिणामत: मुसलमानांनी एका पाठोपाठ एक हिंदू राज्ये गिळंकृत केली. इकडे मुसलमानांबरोबर आलेल्या मुल्ला, मौलवी व सुफींनी हिंदूंना बाटवण्याचा सपाटा लावला. त्यामुळे सारा देश भीतीच्या सावटाखाली गेला. सामान्य हिंदू प्रजेने आशेने बघावे, असा हिंदू राजा राहिला नाही. सामाजिक स्तरावर ब्राह्मण आपल्या कर्मापासून भ्रष्ट झाले. क्षत्रिय यवनांच्या सेवेत रुजू झाले. इतर सामान्यजन बिचारे दिड्मूढ झाले, गोंधळून गेले. काय करावे ते त्यांना सुचेना. त्यांना मार्गदर्शन करणारा उरला नाही. बर्‍याचजणांनी धर्मांतराचा मार्ग स्वीकारला. ही सामाजिक दुरवस्था, सांस्कृतिक पडझड पाहून रामदासांचे मन मोडावून गेले. हे सारे पाहिल्यावर, ऐकल्यावर रामदास उद्गारले, ‘चिंतेने ऊर फाटतो.’ त्यांच्यात आमूलाग्र मन:शांती झाली. या राष्ट्राला संस्कृतीनाशापासून वाचवले पाहिजे, असा निर्धार करुनच रामदास तीर्थाटनाहून परतले. त्यांनी स्वत:ला सावरले आणि भीतीने गोंधळून गेलेल्या लोकांना सांगायला सुरुवात केली.

‘धीर्धरा धीर्धरा तकवा।
हडबळू गडबडू नका।
सांडोनि भय पोटीचे।
धरावा धीर तो मोठा॥
पण नुसते भिऊ नका, घाबरू नका, थोडे थांबा, धीर धरा असे सांगून थोडेच लोक भीतीटाकून देतील. लोकांना कुठल्यातरी अज्ञान शक्तीचा आधार हवा असतो. तो आधार देऊन लोकांचे मानसिक सामर्थ्य वाढले, तरच त्यांच्या मनातील भीती कमी होण्याची शक्यता असते. त्यासाठी उपासनेचा आधार घ्यावा लागतो.

उपासनेचा मोठा आश्रयो।
उपासना नस्ता निराश्रयो।
उपासनेवीण जयो। प्राप्त होणार नाही॥

उपास्य दैवताचे थोडेतरी गुण उपासकात उतरतात, हे रामदासांना स्वानुभवाने ठाऊक होते. पण, लोकांना कोणत्या देवतेची उपासना सांगावी, याबाबतीत रामदासांचा निर्णय होईना. कारण, हिंदूंच्या देव्हार्‍यात तर देवदेवतांची दाटी झाली होती. जो तो आपापल्या आवडीनुसार, परंपरेनुसार देवांची उपासना करीत होता. स्वामींनी हा प्रश्न कौशल्याने सोडवला. त्यांनी कोदंडधारी राम व स्वामिभक्त हनुमान यांची निवड केली. ती तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवून केली. औरंगजेब त्यांना क्रूर रावणासारखा भासला. रावण व औरंगजेब दोघेही या भूमीचे नव्हते. औरंगजेबाचे सेनाधिकारी व सैन्य रावणकाळाच्या राक्षसांप्रमाणे निर्दयी होते. म्हणून रामदास म्हणतात, ‘पूर्वी जे मारिले होते। तेचि आता बळावले॥’ ज्या राक्षसांना पूर्वी रामाने मारले होते, तेच आता बलवान झाले आहेत. तीच राक्षसीवृत्ती यांच्यात दिसून येते. रामचरित्राचा वेगळा अर्थ रामदासांच्या समोर त्या काळाच्या साम्यामुळे आला. रामाने सज्जनांना छळणार्‍या, देवांना बंदिवासात घालणार्‍या, सर्वांना भयकंपित करणार्‍या, सीतेचा मानभंग करणार्‍या वैभवशाली रावणाचा अंत केला होता. औरंगजेबाचा अंत रामावतारी पुरुषाकडून होणार, असा संदेश देण्यासाठी रामदासांनी रामोपसकांना सांगायला सुरुवात केली. रामकथा त्यांनी श्रेष्ठ मानली.

कथा नृसिंहा वामना भार्गवाची।
कथा कौरवा पांडवा माधवाची।
कथा देवद्रन्द्रादि ब्रह्मादिकांची। समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची॥

इतर देवांबद्दल आदर व भक्ती असूनही ‘रामासारखा देव नाही’ हा निष्कर्ष त्यांनी काढला. रामाचे लोकोत्तर कार्य त्याने रावणाला मारले हेच होय. या संदर्भात शिवरामपंत परांजपे लिहितात, “...रामाच्या वेळेपासून आतापर्यंत रामाचा जो जयघोष चालला आहे, तो रामाने बापाची आज्ञा पाळली किंवा राम एकपत्नीव्रतधारी होता म्हणून नव्हे; तर त्याने रावणासारख्या बलाढ्य पण दुष्ट राजाला मारले म्हणून. राम हा जुलमी राजाला मारणारा होता व त्याच त्याच्या कृत्याने त्याची किर्ती अजरामर झालेली आहे.”
महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने पंढरपूरच्या विठ्ठलाची उपासना श्रेष्ठ मानली होती. वारकर्‍यांचा भक्तिप्रिय विठोबा कमरेवर हात ठेवून भक्तिभावाची साद घालीत होता. रामदासांनी रामकथा श्रेष्ठ मानली तरी त्यांनी समन्वयाची भूमिका स्वीकारली. विठ्ठल आणि राम यांच्यात त्यांनी अभेदता मानली. राम आणि विठ्ठल एकच आहेत असे त्यांचे मत होते.
विठ्ठलाचे दर्शन घेताना त्यांना तेथे रामच दिसला. या अद्वैत साक्षात्काराने रामचंद्रच तेथे धनुष्यबाग टाकून कर कटावर ठेवून उभे आहेत, असे त्यांनी भासले.



येथे का रे उभा श्रीरामा।
मनमोहन मेघश्यामा॥
कोठे गेली सीतामाई।
येथे राही रखुमाबाई॥
कोठे गेला हनुमंत।
येथे उभा पुंडलिक॥
काय केले धनुष्यबाण।
कर कटावरी ठेवून॥



जुलमी राजसत्तेला आव्हान देऊन त्या सत्तेचा नायनाट हे रामाचे महान कार्य होते. तत्कालीन परिस्थितीत औरंगजेबाचा नायनाट हेच रामदासाच्या समोरील ध्येय होते. शिवाजी महाराजांनीही हेच ध्येय समोर ठेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. समान ध्येय असलेले रामदास व शिवाजी महाराज एकत्र येतील, यात शंका घेण्याचे कारण नाही. ते एकत्र न येतील तरच नवल.

रामदासांचा समर्थ जो श्रीराम त्याचा अलौकिक पराक्रम त्याचे चरित्र सर्वांना ठाऊक आहे. आज त्याला एवढीच प्रार्थना करायची की, पाताळ, पृथ्वी आणि आकाश येथे कोठेही राहणारे दुष्ट तुझ्या भक्ताकडे नजर वर करून पाहू शकत नाही. तेव्हा कोरोना विषाणूने चालवलेल्या मनुष्यसंहारापासून मानवजातीचे रक्षण कर.

‘पातालभूतलव्योमचारिणश्छघ्नचारिणः
न द्रष्टुमपि शक्तास्ते
रक्षितं रामनामभिः॥
(रामरक्षा)



- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@