पांडवांचे स्वर्गारोहण (भाग-१)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |


pandav_1  H x W


श्रीकृष्णासारखा सखा सोडून गेला म्हणून अर्जुन खूपच दुःखी झाला होता. एकामागून एक वाईट घटना घडल्यामुळे त्याच्या मनावर भयंकर ताण आला. तो हस्तिनापुरात कसाबसा पोहोचला व बेशुद्धच पडला. त्याच्या मुखावर सुगंधी पाणी शिंपडल्यावर तो शुद्धीवर आला. त्याने सर्वांना बलराम, सात्यकी व श्रीकृष्ण यांचे देहावसान झाल्याचे सांगितले. समुद्राने त्यानंतर द्वारका कशी गिळली तेही कथन केले. दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये आपले गांडीव धनुष्य निष्प्रभ झाले हेही सांगितले. आता जगण्याला काहीच अर्थ उरला नाही, असे सर्व पांडवांचे एकमत झाले.


सारे पांडव एकमताने अखेरच्या प्रवासाला निघाले. युधिष्ठिराने राज्य परिक्षिताच्या हाती सोपवले. त्याचा सल्लागार म्हणून युयुत्सु व गुरू म्हणून कृपाचार्य यांची नेमणूक केली. त्यांनी वल्कले परिधान केली. नागरिकांचा प्रेमळ निरोप घेतला. द्रौपदी पण त्यांच्यासह निघाली. सारे नगर शोकाकुल झाले. मात्र, पांडवांच्या मुखावर आत्मशांती विलसत होती. ते प्रथम द्वारका नगरीकडे निघाले. जिथे समुद्राने ती नगरी गिळंकृत केली होती, तिथे किनार्‍यावर उभे राहून श्रीकृष्ण, बलराम व वृष्णी घराण्यातील सर्वांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासमोर प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट झाला. तो म्हणाला, “अर्जुना, तुझ्यासाठी मी वरूण देवाकडून गांडीव धनुष्य व बाणांचा भाता मागून घेतला होता. आता तुला त्याची काही गरज उरली नाहीच. म्हणून तू तो स्वहस्ते वरूणदेवांना परत दे.अर्जुनाने अत्यंत दुःखी होऊन, परंतु आदराने आपले गांडीव धनुष्य व भाता प्रदक्षिणा घालून ते समुद्रार्पण केले. त्यांनी हिमालयाकडे प्रयाण केले. जाता जाता मेरू पर्वत लागला. तिथून पुढे निघताना द्रौपदीचे देहावसान झाले. भीमाला तिचा विरह असह्य झाला. त्याने युधिष्ठिराला विचारले, “भ्राता, द्रौपदी तर निर्दोष होती. तरी तिला मरण का आले?” युधिष्ठिर म्हणाला, “भीमा, आपण पाच जण तिचे पती होतो खरे. परंतु, द्रौपदीचे सर्वाधिक प्रेम अर्जुनावर होते. हे एकप्रकारचे पाप तिच्या हातून घडले म्हणून ती इथवरच पोहोचू शकली.

पुढील टप्प्यात सहदेवाने देह सोडला. युधिष्ठिर म्हणाला, “सहदेवाला त्याच्या बुद्धिमत्तेचा गर्व झाला होता म्हणून त्याला देहत्याग करावा लागला.” पाठोपाठ नकुलानेही देह ठेवला. युधिष्ठिराने भीमाला सांगितले, “नकुलास आपल्या सौंदर्याचा पोकळ गर्व होता. म्हणून तो मृत्यू पावला.” त्यानंतर अर्जुनाचाही मृत्यू झाला तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, “आपण सर्व योद्ध्यांना एकटेच मारू, अशी प्रतिज्ञा करून अर्जुनाने इतर महान योद्धांचा अपमान केला म्हणून तो मरण पावला.” काही अंतर जाताच भीमावर पाळी आली तेव्हा भीमाने विचारले, “भ्राताश्री, मी काय केले म्हणून मला मरण येत आहे?” युधिष्ठिर म्हणाला, “भीमा, तू माझा अत्यंत लाडका भाऊ! परंतु, तुझ्यातही दोष असा आहेत की तुला तुझ्या शक्तीचा अवास्तव अहंकार आहे. शिवाय तू महाखादाड होतास म्हणून तुला मृत्यूला सामोरे जावे लागते आहे.

आता युधिष्ठिर एकाकी पडला. तो आणि त्याचा कुत्रा पुढे मार्ग आक्रमत होते. अचानक मार्गात प्रकाश पसरला. इंद्रदेव आपल्या रथातून उतरत होते. ते म्हणाले,“युधिष्ठिर, तुला या रथातून माझ्याबरोबर स्वर्गात प्रवेश करायचा आहे.युधिष्ठिराला आपले सारे बंधू व पत्नी नसताना स्वर्गात कसे जायचे, याचा संकोच झाला. तो म्हणाला,“एकामागून एक माझे चारही बंधू व माझी पत्नी मला सोडून गेले. ते जर बरोबर नसतील, तर मी तुझ्याबरोबर स्वर्गात येणार नाही.” इंद्र हसला व म्हणाला, “युधिष्ठिर, ते सारे स्वर्गातच आहेत. त्यांनी आपले मानवी देह मात्र इथे ठेवले आहेत. मी तुला सदेह स्वर्गात प्रवेश देण्यासाठी इथे आलो आहे.यावर युधिष्ठिर म्हणाला, “देवा, हा माझा मोठा सन्मानच आहे. परंतु, कृपा करून मला सोबत करणार्‍या या श्वानाला पण स्वर्गात प्रवेश करू दे. त्याने माझी खूप काळ साथ केली आहे व त्याची माझ्यावर नितांत भक्ती आहे.युधिष्ठिराचे हे श्वानावरचे प्रेम पाहून इंद्रदेवांना हसू आले. ते म्हणाले, “युधिष्ठिरा, तुला अमरत्व मिळते आहे. तू भाग्यवान आहेस. माझ्या बरोबरीचा आहेस. परंतु, या श्वानाला स्वर्गात जागा नाही. त्याला इथेच सोडावे लागेल.” युधिष्ठिराने हट्ट सोडला नाही. इंद्र म्हणाला, “तू अगदी मूर्खपणाचे वर्तन करतो आहेस. अजूनही तू मर्त्य मानवासारखा भावनांमध्ये गुंतून पडला आहेस. त्या कुत्र्याला माझ्या रथात मी घेऊ शकणार नाही.” यावर युधिष्ठिर म्हणाला, “या कुत्र्यावरची करुणा व दया मी जर सोडली, तर पुण्यकर्मांमुळे ज्यांना स्वर्गवास लाभला आहे, त्या सर्वांचाच नाश होईल. त्याचा त्याग करायचा नाही. हा माझा नियम आहे. तो माझ्यावरती विसंबून आहे म्हणून मी त्याला सोडू शकत नाही.त्याचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून त्या कुत्र्याने आपल्या शरीराचा त्याग केला व त्याच्या जागी युधिष्ठिराला आपल्या पित्याचे म्हणजे यमधर्माचे दर्शन झाले. ते म्हणाले, “माझ्या पुत्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या करुणेने माझे हृद्य जिंकले आहे. आज मी पुन्हा तुझ्या सदाचरणाची परीक्षा घेतली. मी तुझ्यावर अतिप्रसन्न आहे. तू तुझ्या पुण्याईने इंद्रासोबत स्वर्गात प्रवेश कर.प्रवेशद्वारावर स्वर्गातील सर्व देव व रहिवासी यांनी युधिष्ठिराच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. तो पहिलाच मानव होता, जो सदेह स्वर्गात प्रवेश करत होता. (क्रमश:)

- सुरेश कुळकर्णी

@@AUTHORINFO_V1@@