‘तिला’ समजून घेऊया...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2020
Total Views |
womens day_1  H

गरज आहे, ती फक्त स्त्रीला सन्मान देण्याची. तिला समजून घेण्याची. तिच्या कामांची जाणीव ठेवण्याची व तिच्याविषयी मनात आदर बाळगण्याची. तो आदर मनात बाळगला की, पुरुषाच्या विचारात व आचरणात आपोआप बदल होईल. मग रोजच महिला दिवस असेल.


मन विचार करून पार गोंधळलं होतं. काही केल्या त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. मग मनानं हृदयाला विचारलं, “फार विचार केला रे, पण तरी ही स्त्री म्हणजे काय, याचं मला उत्तर नाही मिळालं. तुझ्याकडे आहे का रे या प्रश्नाचं उत्तर?” हृदयाने स्मित हास्य करीत उत्तर दिलं, “रे मना, तुला उत्तर मिळणं कठीणच आहे. कारण, तू बुद्धीने विचार केला, पण माझ्याकडे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण, मी प्रेमाने विचार केलाय की, स्त्री म्हणजे नक्की काय आणि मला सहजच उलगडलं की, स्त्री म्हणजे प्रेमाचं शाश्वत अस्तित्व!”


खरोखरंच, स्त्री म्हणजे विधात्याने निर्माण केलेली सर्वात सुंदर प्रतिकृती! स्त्री म्हणजे करुणा, माया व ममता यांचे सुंदर शिल्प! जे कोरून झाल्यावर देव समाधानानं हसला. त्याच्या हसण्यानं ते शिल्प जिवंत झालं व जग त्याला ‘स्त्री’ म्हणून ओळखू लागलं! ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ म्हणत प्रत्येक मनुष्याला सर्वाधिक प्रिय असणारा व्यक्तिस्वातंत्र्यापासूनही आपण तिला दूर ठेवलं आणि तिची रक्षा करणार्या पुरुषांनी कधी तिला जुगारात पणाला लावलं, तर कधी अग्निपरीक्षेला सामोरे जायला लावलं. मुलगी म्हणून ती जन्माला येते व घरातील खळाळतं अविरत संगीत बनते. पुढे भावाचा भरभक्कम आधार होते. नात्यांपलीकडे जाऊन कोणाची जीवाभावाची मैत्रीण होते. अर्धांगिनी म्हणून आपल्या पतीच्या आयुष्याचं श्रद्धासुमन बनते. अपेक्षांचं ओझं न मानता, संसाराचा रहाटगाडा ढकलण्याची जबाबदारी एक सून म्हणून स्वीकारते. संस्कारांचं बाळकडू पाजून लेकरांचं संगोपन करणारी माता होते व नातवंडांचे सारे हट्ट पुरविणारी लाडकी आजी होते. या सगळ्या प्रवासातील बदलांना स्वीकारताना तिचं कैकवेळा विस्कटणारं मन, अनेक वेळा नव्यानं उभारी घेतं व तिच्या कोमेजलेल्या फांदीला पुन्हा नव्यानं पालवी फुटत जाते.



तिच्या साठवलेल्या स्वप्नांना गाठ मारून तिच्या माणसांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर झिजते. ज्या घरावर तिच्या नावाची पाटीही नसते, त्या घराला सजवण्यात ती आपलं उभं आयुष्य वेचते. सर्वांची लाडकी होताना ती स्वतःची मात्र कधीच होत नाही. तिच्या या सगळ्या प्रवासात आपण मात्र तिला ‘टेकन फॉर ग्रँटेड’ घेतो! तिची कामं, तिलाच जमतात आणि तिनेच ती करायला हवीत. तिने बिचारीने कितीही केलं, तरीही तिच्याकडून आपल्या अपेक्षापूर्तीचा आलेख नेहमी उंचावतच असतो. आज तर स्त्रीला घराबाहेर पडून पुरुषाच्या बरोबरीने अर्थार्जन करणे ही अपरिहार्य झालेले आहे. घरची व बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना तिची तारेवरची कसरत होत असते. स्त्री व पुरुष ही संसाररुपी रथाची दोन समान चाके आहेत. ज्या रस्त्यावर हा रथ चालवायचा, तो रस्ता काही नियतीने अगदी गुळगुळीत करून ठेवलेला नसतो. रस्त्यावर खाचखळगे असणारच. संसाराचेदेखील तसेच आहे. परस्परांच्या सामंजस्यातून हा संसाररथ चालवावा लागतो. त्याकरिता दोघांनीही त्याग करायला हवा. केवळ स्त्रीला त्यागाची, सहनशीलतेची मूर्ती बनवू नये. घरातील सर्वांनीच तिला समजून घेतल्यास व घरकामात थोडा हातभार लावल्यास तिला थोडा आराम मिळू शकतो. तसेच तिला व्यवसाय किंवा नोकरीकरिता प्रोत्साहित करायला हवे. काही महत्त्वाच्या बाबतीत तिला स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास मोकळीक दिल्यास खर्या अर्थाने ती सुखी होईल.


आपण देवीला शक्ती, बुद्धी, ऐश्वर्य, आरोग्य व समृद्धीची वरददायिनी मानतो. भारतीय समाज नवरात्रीत दुर्गा देवीची पूजा करून सार्या जगाला स्त्री शक्तीचे महत्त्व सांगतो. ‘या देवी सर्व भूतेषु मातृ रूपेण संस्थिताः’चे नाद ज्या गाभार्यातून निनादायचे, त्याच पवित्र गाभार्याला आज बालिकांचे आकांत चित्कार ऐकावे लागत आहेत. अंधारलेल्या रस्त्यांवरून चालताना अजूनही तिच्या हात पायांना कंप सुटतो. आज ‘ट्रायल रूम्स’मध्ये कॅमेरे लावून एमएमएस बनवले जातात. माणसातली विकृती स्त्रीच्या डोळ्यातील स्वप्नं चिरडते. खेद तर या गोष्टीचा वाटतो की, समाजात स्त्रीला अजूनही भोगवस्तू मानले जाते. तिची उपलब्धी करून घेण्यातच आजही समाजाला मोठे श्रेयस व धाडस वाटते. गैरप्रकार घडल्यास ‘मुलीच्या जातीने एकटं का जावं?’ म्हणत समाज स्त्रीला किंवा तिच्या पोशाखाला जबाबदार धरतो. समाजाच्या या मनोधारणेला खतपाणी घालणे योग्य नव्हे. लैंगिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हे आढळून येतं की, समाजात एक वखवखलेला घटक आपण तयार केलेला आहे. बायकांवर आचरट विनोद रचणे हे भूषण मानल्या जातं. हा विषारी वैचारिक दृष्टिकोन बदलवणे, ही काळाची गरज आहे. स्त्रीमुक्ती अद्याप मिळवता आली नाही. विचारांची व परंपरांची शृंखला मोडणे म्हणजे खरी मुक्ती मिळवणे होय. स्त्रीमुक्ती म्हणजे तिला स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचा हक्क प्राप्त करून देणे होय. तो तिला मिळवून द्यावा, यातच खरा पुरुषार्थ आहे. सामाजिक बांध तोडून क्षितिजापार विचार आपण करायला हवा. केवळ स्त्रियांच्या शील रक्षणाचे बिगुल न फुंकता, वैचारिक दृष्टिकोन बदलवायला हवा.



एकविसाव्या शतकात समाज प्रगत झाला, सुशिक्षित झाला, ही सारी मला मिथकं वाटतात. आजही अनेक घरांमध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचं दर्शन होतं. शहरांमध्ये आपल्याला दिसतं की, स्त्री-पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. आज अनेक सुशिक्षित स्त्रिया फक्त स्वतःपुरता किंवा आजूबाजूला ज्या स्त्रिया स्वतंत्रपणे वावरताना दिसतात, त्यांच्यापुरताच विचार करताना दिसतात. पण, ग्रामीण भागातील आपल्या भगिनींचा विचार करायला नको का? स्रीभ्रूणहत्येचा आकडा कमी होत नाही. कारण, वंशाला दिवाच हवा असतो. घरात बायकोला मारहाण केली जाते, नात्यातील लहान मुलींवर विनयभंगाचे अनेक प्रसंग घडतात. हे सगळं आज थांबवायला हवं. समाजातील सुशिक्षित घटक म्हणून हे आपलं आद्यकर्तव्य आहे. याची सुरुवात आपण आपल्या घरातूनच करू शकतो. आपल्याकडे काम करणार्या ताईंची व त्यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी.
आज ८ मार्च! जागतिक महिला दिवस!! इतिहासाची पाने चाळलीत तर हे लक्षात येतं की, मुख्यतः मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी व स्त्री-पुरुष समानता निर्माण करण्यासाठी युरोपमधील महिलांनी ८ मार्च रोजी निषेध व्यक्त केला होता. त्यांचे अधिकार मिळेपर्यंत दरवर्षी ८ मार्चला किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या रविवारी महिला आंदोलन करायच्या. थोड्याच वर्षांत त्यांना हे अधिकार बहाल करण्यात आले. पुढे १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने महिला शक्तीचा यथोचित गौरव व्हावा म्हणून ८ मार्च या दिवसाला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केले.



आज वृत्तपत्रांच्या अनेक भागांमध्ये, स्त्रीशक्तीवर लेख वाचायला मिळतील. अनेक मंचांवरून नारीशक्तीचे गोडवे गायले जातील. कोठे स्त्रीमुक्तीचे महत्त्व पटविले जाईल तर कोठे स्त्री समानतेचे व स्त्री सबलीकरणाचे व्याख्यान दिले जाईल. ‘परस्त्री मातेसमान,’ ‘बेटी धनाची पेटी’ अशा आरोळ्या दिल्या जातील. महिलांचा सत्कार करण्यात येईल व पुन्हा ‘जैसे थे!’ खरं तर या सगळ्याची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त स्त्रीला सन्मान देण्याची. तिला समजून घेण्याची. तिच्या कामांची जाणीव ठेवण्याची व तिचा आदर मनात बनवायची! तो आदर मनात बनला की, विचारांत व आचरणात आपोआप येईल. मग रोजच महिला दिवस असेल. तिला कधी दमल्यावर पाण्याचा ग्लास जरी स्वतःहून दिला, एखाद्या दिवशी तिला आवडतो असा कडक चहा जरी केला किंवा ‘आज तू दमली असशील’ असं म्हटल्यानेही तिचा थकवा दूर होतो. या छोट्या छोट्या गोष्टी तिला आनंदित करतात, तर मग तिला नेहमीच ‘कॉम्प्रोमाईझ’ करायला न लावता, कधी तिला ही खूष करत जाऊया. आपल्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीवर खंबीरपणे लढण्याची हिंमत देणार्या व हृदयात वात्सल्य, पावित्र्य आणि मांगल्याचा त्रिवेणी संगम असणार्या, प्रत्येक स्त्रीला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


@@AUTHORINFO_V1@@