दीपस्तंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2020   
Total Views |
sucheta rege_1  


आयुष्यात कोणत्याही कटू प्रसंगाबद्दल तक्रार नाही, तर आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा उत्सव करून त्या उत्सवामध्ये समाजालाही सकारात्मक आनंद देणार्‍या, कर्तव्यकठोर पण तितक्याच भावनाशील, स्वतंत्र विचारधारेच्या मात्र घरदार, संस्कृती जोपासून सगळ्यांचा मान राखणार्‍या, आयुष्यात अनेक यशाची शिखरे पार करणार्‍या सुचेता रेगे म्हणजे उत्साहाचा सागरच. त्यांचे जीवन आणि कार्य म्हणजे कर्तव्य, निष्ठा आणि सकारात्मक आशाच होय. आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा...

‘तिला’ त्या दररोज पाहायच्या. ‘ती’ त्यांच्या सोसायटीमध्ये कचरा उचलायचे काम करायची. ‘ती’ गरोदर होती. ‘तिला’ कचरा उचलताना त्रास व्हायचा. त्यांना वाटले ‘तिला’ आपल्या घरात कामाला ठेवावे. थोडे घरकाम करेल. ‘तिला’ही आर्थिक मदत होईल. ‘ती’ त्यांच्या घरी कामाला लागली आणि आजूबाजूच्या महिला त्यांना भेटायला आल्या. काळजीने आणि अगदी इशारा द्यावा अशा स्वरात त्या म्हणाल्या, “अगं बाई, तू कचरावालीला का घरात घेतेस? तिच्या हातचे काम तुला चालते का?” पण, यावर त्या म्हणाल्या, “हो! न चालायला काय झाले? ती चांगले काम करते. ती कचरा वेचते म्हणून तिने तेच काम करायचे का?” त्यानंतर ती त्यांच्या घरात कामाला लागली. कचरा वेचणार्‍या महिलेला घरात कामाला ठेवताना मिक्सरपासून फ्रिज ते वॉशिंग मशीन्सपर्यंतची यंत्रे कशी हाताळावीत हे सगळे शिकवावे लागले. इतकेच नव्हे, तर तिच्या तीन मुलींचे शिक्षण ते त्यांना चांगली नोकरी मिळवून देणे हे सगळे स्वत:हून केले. ना नात्याची ना गोत्याची, पण त्या महिलेचे आयुष्य तिच्या मुलांचे आयुष्य उज्जवल व्हावे, यासाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न त्यांनी केले. त्या कोण आहेत? आजकाल अशी लोक खरंच समाजात आहेत का? तर हो, नक्की आहेत. सुचेता रेगे यांना भेटल्यावर जाणवते की, आजही समाजात अशा परोपकारी व्यक्ती आहेत, ज्यांना दुसर्‍यांसाठी काही सत्कर्म करणे म्हणजे आपले कर्तव्य वाटते.


सुचेता या ‘रोट्रियन’ म्हणजे रोटरी क्लबच्या सदस्य. त्यांनी रोटरी क्लबची अनेक पदे भूषवली आहेत. पण, याही पलीकडे त्यांची ओळख आहे ती म्हणजे, ‘कोटक एज्युकेशन फाऊंडेशन’च्या ‘व्हॉलेंटरिंग डिपार्टमेंट’च्या त्या व्यवस्थापक आहेत.


‘कोटक एज्युकेशन फाऊंडेशन’ गरजू मुलांना शैक्षणिक मदत करते. त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी साहाय्य करते. मुंबईमध्ये वस्तीपातळीवर युवकांसाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष स्वयंरोजगार उपलब्ध करून देते. या संस्थेमध्ये पहिल्यांदा केवळ एका केंद्राच्या समन्वयक असलेल्या भावना या आपल्या कर्तृत्वाने पुढे अनेक केंद्राच्या समन्वयक बनल्या. ‘कॉर्पोरेट नेटवर्किंग’चे व्यवस्थापकीय पदही भूषवले. आता त्या ‘व्हॉलेंटरिंग डिपार्टमेंट’च्या व्यवस्थापक आहेत. एकापेक्षा एक मोठ्या जबाबदार्‍या हाताळताना सुचेता यांनी सगळी आव्हाने पेलली. सुरुवातीला त्या ‘कोटक एज्युकेशन फाऊंडेशन’मध्ये एका केंद्राच्या समन्वयक म्हणून रूजू झाल्या. त्यावेळी सेवा वस्तीतील मुलांना अमूक एक शिक्षण द्यावे, तेही विशिष्ट पद्धतीने द्यावे असा ठरलेला अभ्यासक्रम होता. पण, सुचेता यांना जाणवले की, अभ्यासक्रमात असलेल्या गोष्टींपेक्षा शिकण्यास येणार्‍या मुलांच्या आयुष्यातील प्रश्न आणि त्यावरची उत्तरे वेगवेगळी आहेत. आपल्याला वाटते म्हणून आपल्या दृष्टीने योग्य असलेले शिक्षण त्या मुलांसाठीही योग्य असेलच असे नाही. त्या ‘कोटक एज्युकेशन फाऊंडेशन’मध्ये नोकरी करत होत्या. दिलेले चाकोरीबद्ध शिकवून झाले की आपले कर्तव्य संपले असेही त्या करू शकत होत्या. पण, सुचेतांनी तसे केले नाही. त्यांनी जी सामाजिक परिस्थिती आहे, ती वरिष्ठांना सांगितली. इतकेच नव्हे, तर बदलत्या काळानुसार नवे काय शिकवायला हवे, याबाबतही सूचना दिल्या. त्या नुसत्या ‘सूचना’ नव्हत्या, तर या क्षेत्रातील नामवंतांना भेटून त्यांनी तसा अभ्यासक्रमही करून घेतला.


हे सगळं कशासाठी? तर आपले काम हे पैसे कमावण्याचे साधन नाही, तर आपल्याला आत्मिक समाधान मिळवून देणारे उद्दिष्ट आहे असे सुचेता यांचे म्हणणे. सुचेता म्हणतात, “मला सकारात्मक नावीन्याचा ध्यास आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर नवे दर्जेदार बदल हवेत. ज्या बदलांमुळे आपले आणि समाजाचेही आयुष्य लक्षणीय अर्थाने बदलेल.” त्यांचा जीवनपट पाहिला की वाटते, ‘बापरे इतकी नि:स्वार्थी आणि तितकीच प्रखर ऊर्जा, उत्साह सुचेता यांच्याकडे येतो तरी कुठून?’


या गोष्टीचा मागोवा घेतल्यावर जाणवते की, सुचेता यांचे आई-वडील, इतकेच काय सासरचेही अशाच विचारांचे! ‘आनंदी राहा, स्वत:बरोबरच दुसर्‍यांच्याही आयुष्याला दीप्तिमान करा,’ या विचारांचे. सुचेता यांचे वडील श्रीनिवास प्रभू हे सरकारी ऑफिसर, तर आई सुनंदा या शिक्षिका. घरात समाजवादी वातावरण. मृणालताई गोरे, मधु दंडवते, सदानंद वर्दे यांचा घरोबा. किंबहुना, ‘गोरेगावचे समाजवादी घर कोणते तर प्रभूंचे’ अशीच परिस्थिती. मृणालताईंचे समाजकार्य सुचेता यांनी लहानपणापासून जवळून बघितलेले. घरी असंख्य कार्यकर्त्यांचा राबता असायचा. आई-वडील जमेल तशी आणि तितकी लोकांना मदत करायचे. श्रीनिवास प्रभू यांचा सुचेतांवर प्रभाव. कामात सचोटी, शिस्त हवीच. आयुष्यात कर्तव्यात आणि भावनेतही कुठलाही भ्रष्टाचार करू नये, ही त्यांची शिकवण. सुचेता यांच्या लहानपणीची आठवण. श्रीनिवास हे मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. त्यात ‘काळा पैसा’ कमावण्याची संधी. पण, ते त्यापासून कटाक्षाने चार हात लांबच राहिले. एकेदिवशी एक माणूस त्यांना भेटायला आला. तो परोपरीने त्यांना काम करा सांगत होता. देवाणघेवाणीविषयी बोलत होता. पण, श्रीनिवास यांनी त्याला स्पष्ट निर्वाणीच्या भाषेत नकार दिला. या माणसाने घरात येताना बाहेरच खेळत असलेल्या छोट्या सुचेताला बिस्कीटचा पुडा दिला. सुचेता घरात येऊन बिस्कीट खाऊ लागल्या. श्रीनिवास यांनी ते पाहिले, त्यांनी सुचेतावर आयुष्यात पहिल्यांदा हात उचलला. डोळ्यांत पाणी आणून ते म्हणू लागले, “त्याने बिस्कीट का दिले माहीत आहे का? आणि तू का घेतलेस? फुकटची गोष्ट तू कशी घेतलीस?” तो प्रसंग आजही सुचेतांच्या मनात घर करून बसला आहे.


सुचेता यांनी ‘मॅनेजमेंट’चे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात त्या नाटकांमध्येही काम करू लागल्या. राज्यस्तरीय नाट्यस्पर्धांमध्येही त्यांनी चांगला ठसा उमटवला. त्यावेळी त्यांची ओळख स्त्रीमुक्ती संघटनेशी झाली. हे सगळे करत असताना त्या कामही करत असत.


पुढे त्यांचा विवाह सुनील रेगेंशी झाला. रेगे कुटुंब अतिशय धार्मिक. सण, व्रतवैकल्य, सोवळे-ओवळे पाळणे ओघाने होतेच. सुचेता यांच्या माहेरी हे यापैकी काहीच नव्हते. पण, सासरी आल्यावर त्यांनी या गोष्टीही नवीन संधी म्हणून स्वीकारल्या. आपला हट्ट, गर्व उगीचच पाजळून घरातील आपल्या माणसांशी संबंध बिघडवण्यापेक्षा त्या संबंधांना जपणे हेसुद्धा एक कर्तृत्वच असते. ते कर्तृत्वही सुचेता यांच्याकडे आहे.


त्यांचे पती सुनील हे उद्योगपती. सुचेता या काही काम न करता घरात बसून राहू शकत होत्या. पण, ‘मला काहीतरी चांगले करायचे आहे, तेही नावीन्यपूर्ण,’ ही ओढ त्यांच्यात उपजतच होती. त्यामुळे लग्नानंतर त्या ‘टाईपसेटिंग’ करायला शिकल्या आणि त्या व्यवसायात स्थिरावल्या. पुढे मुलगा झाल्यावर त्यांना कामाला जास्त वेळ देता आला नाही. मुलाला नर्सरीत टाकावे लागले. त्यावेळी सुचेता यांच्या मनात आले की, आपण लहान मुलांसाठी संगणक कोर्स सुरू केला तर? मुलांचे मनोरंजनही होईल आणि मुलांचे आधुनिक शिक्षणही होईल. मनात आले आणि सुचेतांनी अशा प्रकारचे कोर्स सुरू केले. त्यालाही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कालांतराने त्यांची ओळख अभिनेत्री सुहास जोशी यांच्याशी झाली. सुचेता यांना नाटकाची आणि अभिनयाची जबरदस्त आवड होतीच. सुहास यांनी सुचवले की, येऊरला माझा बंगला आहे. तिथे काही सुरू करायचे असेल तर कर. सुचेता यांनी ठरवले की, कमी शुल्कात अभिनय शिबीर घ्यायचे. त्या मुलांसाठी कार्यशाळा घेऊ लागल्या. प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना जाहिरात किंवा अभिनयाचे व्यासपीठही मिळवून देऊ लागल्या. इथेही चांगले बस्तान जमले. पण एके दिवशी एका मित्राने विचारले, “तू स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करणार का?” ती संस्था होती - ‘कोटक एज्युकेशन फाऊंडेशन.’


माहेरी समाजसेवेचे वातावरण होते, नव्हे तर सुचेता यांच्या रक्तातच ते भिनले होते. त्यामुळे त्यांनी तिथे रूजू होण्याचे ठरवले. यापूर्वी स्वयंसेवी संस्था काय आहे? तिचे काम काय असते, याची त्यांना अजिबात माहिती नव्हती. पण, नवीन कार्यक्षेत्र, समाजासाठी काहीतरी कार्य करायला मिळणार यासाठी त्यांनी आनंदाने ‘कोटक एज्युकेशन फाऊंडेशन’चे काम सुरू केले. इथेही पैसे कमावणे हा उद्देश नव्हता, तर आपल्या बरोबर समाजाचीही प्रगती करण्याचा उद्देश होता. आज मुंबईच्या वस्तीतील हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना प्रगतीचा मार्ग देऊन त्यांचे आयुष्य उज्जवल करण्याचे काम सुचेता यांनी केले आहे. हे काम करताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण, प्रत्येक प्रसंगात त्या दीपस्तंभासारख्या ठाम उभ्या राहिल्या. अग्नीतून तापून सोने जसे आणखीन तेजस्वी होते, तशा त्या आणखीन कार्यशील झाल्या. इतक्या की, ज्यांनी त्यांना कधीकाळी मुद्दाम त्रास दिला, त्यांनीही पुढच्या कालावधीत सुचेता यांचे कर्तृत्व बिनशर्त मान्य केले. कोणाचाही हेवा नाही. मत्सर नाही. आपल्या समोरील काम निष्ठेने आणि आनंदाने करणे, हेच एक ध्येय सुचेतांनी ठेवले. सुचेता आपल्या यशस्वी जीवनासाठी चांगल्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांना धन्यवाद देतात. पण, अनुराधा दत्तागुप्ता, उल्हास कार्ले यांचाही त्या नामोल्लेख करतात. मात्र, आयुष्यात कधी त्रास झाला का? यावर त्या आत्मविश्वासाने गोड हसत म्हणतात,“नाही. कारण, आयुष्य आपलेच आहे. ते चांगलेच असणार. आपण ते कसे स्वीकारतो, ते आपल्यावर आहे.” आत्मविश्वासाचे स्वकर्तृत्वाचे तेज म्हणजेच सुचेता रेगे होय.

@@AUTHORINFO_V1@@