गोष्ट जिद्दी प्रवासाची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2020
Total Views |
Rajshree_1  H x

‘स्वतःला विसरून एखाद्या कामामध्ये झोकून दिले पाहिजे,’ असे बरेचदा लिहिले किंवा बोलले जाते, पण प्रत्यक्षात ‘झोकून देणे’ कशाला म्हणतात हे अनेकांनी स्वकर्तृत्वाने सिद्ध केलेले असते. आपल्यावर आलेली प्रत्येक जबाबदारी ही कोणत्याही परिस्थितीत व्यवस्थित पार पाडली पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष असतो. त्यासाठी त्यांना स्वत:ची बुद्धिमत्ता आणि सर्व क्षमता पणाला लावतात.घड्याळाकडे पाहून तर कधीच काम करत नाहीत. दिवसाला पंचवीसावा तास आणि महिन्याला बत्तीसावा दिवस असता तर आणखीन काम करता आलं असतं, असं वाटण्याइतकी कामाविषयीची असोशी त्यांच्या मनात असते. आज राजश्री प्रशांत गायकवाड या ‘आरपीजी इंडस्ट्रीज’च्या संचालिका असून ‘राजश्री असोसिएटस्’, ‘आरपीजी पेपर प्रॉडक्टस्’, ‘आरपीजी गारमेंटस्’, ‘आरपीजी अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड डेअरी प्रॉडक्टस्’, ‘आरपीजी प्रॉडक्शन’, ‘आरपीजी ब्युटी स्पा अ‍ॅण्ड सलोन’, ‘आरपीजी फाऊंडेशन’ अशा त्यांच्या अनेक उद्योगांच्या जबाबदार्‍या त्या लीलया पेलत आहेत. त्यांचा उद्योग प्रवास म्हणजे जिद्दीची कहाणी.


‘आरपीजी’ म्हणजे आधुनिकता, ‘आरपीजी’ म्हणजे गुणवत्ता, ‘आरपीजी’ म्हणजे सचोटी, ‘आरपीजी’ म्हणजे विश्वासहर्ता. ‘आरपीजी’ म्हणजे क्रांतीच. ‘सर्वोत्तम दिले म्हणजे सर्वोत्तम मिळणारच’ असं मानणार्‍या राजश्री गायकवाड या आधुनिक स्त्रियांसमोर उद्यमतेचा आदर्श निर्माण करत आहेत. राजश्री गायकवाड या पूर्वाश्रमीच्या राजश्री शरद शिंदे. राजश्री यांचा पिंडच उद्योजकतेचा. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर राजश्री यांनी काही काळ नोकरी केली. परंतु, नोकरीत त्यांचे मन रमेना.


राजश्री यांचा नोकरी सोडण्याचा निर्णय घरच्यांना अजिबातच पसंत नव्हता. तरीही त्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या. आपण स्वतंत्र व्यवसाय करायचा असा विचार त्यांनी केला. व्यवसायासंबंधीची तयारी, त्याची जुळवाजुळव, शासकीय कागदपत्रांची पूर्तता याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी थोडा वेळ घेतला आणि त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला.


२००३ मध्ये त्या बीपीओ क्षेत्राकडे वळल्या आणि त्यांनी ‘राज इन्फोटेक’ या नावाने १० संगणकांचा सेटअप उभारला. ‘डेटामेटिक्स’ आणि ‘ट्रायकॉम’ या दोन कंपन्यांची कामे त्यांच्याकडे चालत असत. सर्व काही सुरळीत चालू होते. परंतु, राजश्री यांना नंतर मोठ्या कंपन्यांचे काम मिळाले आणि त्या कामालासुद्धा छान प्रतिसाद मिळत होता. २५० कॉम्प्युटरचा सेटअप उभारला होता. परंतु, चांगल्या कामाला दृष्ट लागावी असं झालं आणि ज्यांच्याकडून कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते, त्यांनी हळूहळू पैसे देणे बंद केले. त्यावेळेस ‘राज इन्फोटेक’ला २७ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. हा काळ सत्वपरीक्षेचा होता. पैशांच्या जुळवाजुळवीसाठी त्यांनी शर्थीने प्रयत्न केले.


राजश्री सांगतात, “हा काळ खूप कठीण होता.पण, या काळात त्यांनी स्वतःला सावरले. एखादा दिवस, एखादी वेळ अशी येते की, तुमच्यासाठी ते आव्हान ठरतं आणि तेव्हा सगळ्या भूमिका बाजूला ठेवून तुम्हाला त्या आव्हानाला भिडावं लागतं. स्वतःमधली ऊर्जा, क्षमता त्यासाठी वापरावी लागते. व्यवसाय म्हटला की चढउतार येतोच. तरीही जो हिमंत ठेवतो तोच पुढे जातो.”


आधीच्या व्यवसायातील फटका जबरदस्त होता. त्यामुळे कर्ज परतफेड करण्याच्या उद्देशाने राजश्री यांनी नवीन व्यवसायाचे शिवधनुष्य पेलले. त्यावेळेस तेजीत असणार्‍या रिअल इस्टेटच्या व्यवसायात पदार्पण करण्याचे ठरविले आणि जमिनींच्या व्यवहारात लक्ष घालायला सुरुवात केली. त्यातूनच ‘राजश्री असोसिएट्स’चा श्रीगणेशा झाला. कोकण, इंदापूर, राजापूर, खालापूर, माणगाव, उरण असा त्यांचा प्रवास सुरू झाला. आजही त्या वर्षभरामध्ये दीड लाख किमींचा प्रवास करतात. दोन एकरच्या व्यवहारापासून व्यवसायास सुरुवात झाली. अद्यापपर्यंत २५०० एकरचा व्यवहार ट्रेडिंगद्वारे केला गेला. विशेष म्हणजे, हे सर्व व्यवहार करताना मूळ मालकाचा तोटा होऊ न देता त्याला त्या जागेचा योग्य भाव मिळवून दिला जातो. विकत घेणार्‍या व्यक्तीचासुद्धा योग्य फायदा व्हावा या एका तत्त्वावर त्यांनी आजवर कामे केली आहेत आणि करत आहेत. त्यांनी अनेक शेतकरी, मुळ जागामालक यांचा विश्वास संपादन केला आहे. योग्य दरात जागा मिळवून ती पुन्हा योग्य दरात विकून देण्याची जबाबदारी त्या स्वत: घेतात. त्यामुळे अनेक लोकांचा फायदा झाला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. शेतकर्‍यांचा फायदा हा या व्यवसायातील पदार्पणाचा अजून एक उद्देश होता.


सुरुवातीच्या संघर्षांच्या काळात सकाळी ९ ते रात्री ११ असेपर्यंत त्यांनी काम केले. त्या श्रमांचे फळ त्यांना दृश्य स्वरुपात दिसू लागले. अथक परिश्रमानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्या सतत यशाचा राजमार्ग चालतच राहिल्या. ‘आरपीजी पेपर प्रॉडक्ट्स’चा श्रीगणेशा २०११ मध्ये झाला. सुरुवातीला केवळ पाच मशीन्सने व्यवसाय सुरू झाला होता. हळूहळू काम इतके वाढली की, ३५ मशीन्स त्यांनी आयात केल्या. आज ‘आरपीजी पेपर प्रॉडक्ट्स’ या त्यांच्या व्यवसायामध्ये २० प्रकारची पेपरची उत्पादने घेतली जातात. पेपरडिश, पेपर प्लेट्स, पेपर कप्स, स्ट्रॉ अशा प्रकारची उत्पादने असून ती बॅक्टरियाफ्री, इकोफ्रेंडली हायजेनिक आहेत. या व्यवसायाची उलाढाल वाढत गेल्यावर रबाळे एमआयडीसीतील जागा अपुरी पडू लागली. म्हणून त्यांनी भिवंडी-काल्हेर येथे जागा घेऊन तेथे व्यवसाय स्थलांतरित केला.


‘आरपीजी पेपर प्रॉडक्ट्स’चा व्यवसाय करत असताना २०१४ साली राजश्री यांनी ‘आरपीजी गारमेंट्स’चा शुभारंभ केला. शालेय गणेवश तयार करण्याच्या कामाचे कंत्राट त्यांना मिळाले. त्यासाठी लागणारे कापड, मशीन, माणसांची टीम या सार्‍या गोष्टींचा होमवर्क करुन त्यांनी ‘सॅम्पल लॉट’ पाठवला. तो कस्टमरला पसंत पडला व त्यांनी पुढची ऑर्डर देण्याआधी उद्योगाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर खर्‍या अर्थाने व्यवसायाचा प्रारंभ झाला. इतरांसाठी कामे करत असताना स्वतःचा कपड्यांचा ब्रॅण्ड का सुरू करू नये, या प्रबळ इच्छेतूनच ‘श्रेगो’ या त्यांच्या ब्रॅण्डचा जन्म झाला. ‘स्पायकर’, ‘रोमॅनो एक्सपोट्स’, ‘एसपीआर फॅशन’ यांसारख्या नामांकित ब्रॅण्ड्सचे क्रॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले. मेन्स कॅज्युअल वेअर, स्पोर्ट्स वेअर हुडीज, टी शर्टस्, जॉगर्स अ‍ॅण्ड जीन्स. याशिवाय ‘स्पोर्ट्स जर्सी’ ही ‘श्रेगो’चे वैशिष्ट्य आहे. बायकर्ससाठी हुडीज् डिझाईन ही ‘श्रेगो’ची खासियत आहे.


केवळ दोन मशीन्सच्या साहाय्याने सुरू केलेल्या या व्यवसायात सध्या दीडशे मशीन्स असून अडीचशे माणसे कार्यरत आहेत आणि त्यात महिलांची संख्या ही ७० आहे. ‘श्रेगो’ हा त्यांचा ब्रॅण्ड अल्पावधीतच लोकप्रिय झाला असून त्यांची ही उत्पादने कतार, दुबई, ओमान, कुवेत जपान येथे एक्सपोर्ट करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


स्वामी समर्थांवर असलेली राजश्री यांची अढळ श्रद्धा, परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे (दिंडोरी) यांच्या आशीर्वादातून त्यांनी ‘आरपीजी अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड डेअरी प्रॉडक्ट्स’च्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक शेतकर्‍यांना दिंडोरी येथून देशी बियाणे दिले गेले आहे. शिवाय विषमुक्त नैसर्गिक शेती कशी करावी, याचे प्रशिक्षण दिले गेले आणि त्यांनी तयार केलेल्या पिकांमधून उत्पादित उत्पादने ‘सात्त्विक कृषिधन’ या ब्रॅण्ड अंतर्गत वितरित केली जात आहेत. ‘सात्त्विक कृषिधन’अंतर्गत ८० हून अधिक उत्पादने भारताबाहेर वितरीत करण्याचा मानस राजश्री यांनी व्यक्त केला.


या उत्पादनांमध्ये ‘सात्त्विक कृषिधन ए-२ दूध’, खांडसरी साखर, ऑरगॅनिक गूळ व गूळ पावडर, सैंधव मीठ, खोबरेल तेल, शेंगदाणा तेल, करडई तेल, खुरसुणी तेल, बदाम तेल, जवस तेल, सात्त्विक नैसर्गिक तांदूळ, मोहरी, हळद, ज्वारी नाचणीची बिस्किटे, ज्वारी आणि नाचणीच्या कुकीज अशी उत्पादने आहेत. आज ‘आरपीजी कृषिधन’ उत्पादनांची होम डिलिव्हरीची सोयसुद्धा उपलब्ध आहे. महिलांचे सौंदर्य ही काळाची गरज बनली आहे. याचा विचार करून राजश्री यांनी ‘आरपीजी स्पा अ‍ॅण्ड सलोन ब्युटी सर्व्हिसेस’अंतर्गत ठाणे येथे मध्यवर्ती ठिकाणी ‘कॅटलिया स्पा अ‍ॅण्ड सलोन’चा शुभारंभ झाला असून स्कीन केअर, हेअर केअर आणि स्पा सलोनच्या उत्कृष्ट दर्जाच्या सर्व्हिसेस दिल्या जाणार आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना रिलॅक्स होता यावे म्हणून विविध प्रकारचे मसाज आणि स्पासुद्धा ‘कॅटलिया’मध्ये उपलब्ध आहेत. नववधूचा मेकअप, पोर्टफोलिओसाठीचा मेकअप असे सौंदर्यातील नानाविविध प्रकार कौशल्याने हाताळणारी टीम राजश्री यांनी निवडली आहे. ‘आरपीजी फिल्म प्रॉडक्शन’मार्फत टीव्ही कमर्शियल्स, अ‍ॅडव्हरटायझिंग आणि फिल्म मेकिंग असे काम चालते.


निश्चित विचार, क्षमता आणि जबाबदार्‍या स्वीकारण्याची तयारी यांच्या साहाय्याने उच्च स्वाभिमान असलेली माणसं विशाल होऊ जातात. ती कार्यप्रवण आणि महत्त्वाकांक्षी असतात म्हणूनच ती यशस्वी होतात.


‘आपण समाजाचे देणे लागतो’ याच भावनेतून ‘आरपीजी फाऊंडेशन’ त्यांनी सुरू केले असून ‘आरपीजी फाऊंडेशन’अंतर्गत आपल्या कमाईतील काही हिस्सा त्या गरजू व अनाथ मुलांच्या विकासासाठी खर्च करतात. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचे संगोपन करणार्‍या अनाथाश्रम आणि काही संस्थांशी त्या संलग्न आहेत. अनेक गरजू व अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.अनेक लोकांना यशस्वी कसं व्हायचं ते माहीत असतं. पण, यश पचवणं फारच थोड्यांना जमतं. खरं वास्तवं म्हणजे सफल व यशस्वी लोक उदार, मोठ्या मनाचे आणि उमदे असतात. ते कधीही स्वतःबद्दल बढाया तर मारत नाहीतच, पण आपल्या सहकार्‍यांची आणि प्रतिस्पर्ध्यांची योग्यता ते जाणतात आणि त्यांच्याविषयी उचित आदर आणि कृतज्ञता बाळगतात.


“कुठलेही यश हे एकट्याचे नसते. त्या यशाचा चेहरा कदाचित तुम्ही असाल, पण त्यामागे अनेकांचे हात असतात हे विसरू नका,” असं राजश्री सांगतात. आपल्या यशाचे श्रेय त्या त्यांचे आई-बाबा, पती प्रशांत गायकवाड, मुले आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाला देऊ इच्छितात. राजश्री यांचे पती प्रशांत गायकवाड हे शासकीय सेवेत कार्यरत असून ते कुशाग्र बुद्धीचे, उच्च पदस्थ आणि विनम्र आहेत. राजश्री यांना हव्या त्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी संपूर्ण पाठिंबा त्यांनी दिला आहे. राजश्री यांची तिन्ही मुले अतिशय संस्कारी आहेत. राजश्री या व्यस्त शैलीतून मुलांना ‘क्वॉलिटी टाईम’ देतात.


महिला उद्योजकांना मार्गदर्शन करताना त्या म्हणतात, “फावल्या वेळेचा उद्योग म्हणून उद्योगाकडे बघू नका. फुलटाईम झोकून देऊन काम केले तरच तुम्हाला १०० टक्के यश मिळते. पैशाच्या हव्यासापायी काम करण्यापेक्षा उत्कृष्टतेचा ध्यास धरून काम केले तर लक्ष्मी तुमच्यावर मनापासून प्रसन्न होते.” राजश्री यांची दखल विविध संस्थांनी घेतली असून त्यांना ‘उद्योगमैत्रीण’चा ‘वुमन आंत्रप्रिन्युअर अ‍ॅवॉर्ड २०१९’ , ‘ग्लोबल महाराष्ट्र आंत्रप्रिन्युअर कॉनक्लेव्ह’मध्ये ‘महिला उद्योजिका पुरस्कार’, ‘बोल्ड’तर्फे ‘महिला उद्योजिका पुरस्कार’, ‘विद्यार्थी भारती’ संघटनेचा ‘शाहू पुरस्कार २०१९’, पुणे येथे ‘इंडस्ट्रायलिस्ट डायनॅमिक आंत्रप्रिन्युअर’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


राजश्री यांच्याबाबत थोडक्यात सांगायचं झालं तर स्वतःमधील आत्मविश्वास, स्वभावातील शांतपणा, कुठल्याही वातावरणामध्ये सतर्क राहणे, कठीण परिस्थितीतून योग्य व तत्काळ निर्णय घेणे या सर्व गुणांमळे त्या स्वतःचा ठसा उमटवून जातात.


@@AUTHORINFO_V1@@