खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2020   
Total Views |
bhavana pradhan_1 &n

समाजातील अत्यंजांच्या दु:खांना आपलेपणाने जाणून घेऊन ती दु:खे दूर करावीत. मात्र, आपण करत असलेल्या सत्कर्माची चुकूनही जाहिरात होऊ नये, याची काळजी घेणार्‍या ‘भावना प्रधान’ या नावाप्रमाणेच ‘भावनाप्रधान’ आहेत. समस्यांनी होरपळणार्‍या अगणित पीडितांना त्यांनी मदतीचा हात दिला. कितीतरी प्रकल्पांच्या त्या छत्रछाया झाल्या. सहकार्य, मार्गदर्शन करतानाही वास्तवतेचे भान ठेवणार्‍या भावना प्रधान. त्यांचे कार्य म्हणजे अंधारातला प्रकाशदुवा...


“आपण देवळात जाताना चप्पल काढून जातो. थोडेच अंतर असले तरी अनवाणी पायाने चालताना आपल्याला क्षणभर तरी ब्रह्मांड आठवतेच. पण, छोटी छोटी वनवासी बालकं भर उन्हात काट्याकुट्यात अनवाणी फिरत असतात. त्यांच्या पायात काटे रूतात, जखमा होतात. पण, रानातली फुलं उमलली तर उमलली, जगली तर जगली असे वातावरण. त्यामुळे त्या चिमुकल्यांच्या वेदना समजून घ्यायचीही स्थिती त्यांच्या आई-वडिलांची नसते. हे पाहून मी खूप अस्वस्थ व्हायचे. त्यातूनच मग ठरवले की, या बालकांना ‘सपाता’ (चप्पल) घालण्यास द्यायच्या,” भावना प्रधान सांगत होत्या. वागणे-बोलेण सौम्य आणि चेहर्‍यावरचे भावही तितकेच सौम्य, देवघरातल्या निरांजनाच्या प्रकाशाइतके. होय, हीच उपमा भावना प्रधान यांना संयुक्तिक ठरेल.


भावना प्रधान यांचे मूळ गाव कोकणातले कोंढवी. वडील प्रभाकर आणि आई निर्मला कोंढवीकर हे सुशिक्षित दाम्पत्य. घरी समाजशीलच वातावरण. प्रभाकर यांनी घरगड्यांनाही रात्रशाळेत शिकण्यास पाठवले होते. आईही घरच्या मोलकरणीला, आजूबाजूच्या घरातील मोलकरणींना नेहमीच मदत करायची. निर्मला यांच्या माहेरच्या लोकांकडून गरीब महिला आईला भेटण्यास यायच्या. आई त्यांनाही सढळ हस्ते मदत करायची.शाळेत असताना भावना ‘स्काऊट-गाईड’मध्ये होत्या. दिवसाला एक तरी सत्कर्म करायला हवे, ही वृत्ती तेथूनच भावना यांच्यामध्ये रूजली. भावना यांच्या आई त्यांना सांगे, “आपल्या घरी काम करणार्‍या बाईंच्या मुलींना शिकव, तितकीच तुझीही उजळणी होईल.” तसेच घरातील जुनी कपडे-भांडी कधीही बोहारणीला दिली जायची नाहीत, तर आई ती साठवून गोरगरीब, गरजू महिलांना आवर्जून द्यायच्या. भावना यांची आई जणू शामची आईच होती. त्या संस्कारांमध्ये भावना वाढत होत्या.


भावना यांनी लहानपणी साने गुरूजी, वि. स. खांडेकर यांनाही पाहिलेले. भावना यांचे सामाजिक कार्य म्हणजे,


जगी जे दीन अतिपतीत ।
जगी जे दीन पददलित।
तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥



असेच आहे असे म्हणता येईल.


कारण, वनवासी, गरीब सेवावस्तीतील बालके, महिला यांच्या उत्थानासाठी त्या जमेल ते सेवाकार्य करतात. हे करत असताना ‘त्यातून मला काय मिळेल,’ ‘त्याचा मला काय फायदा’ याचा त्या विचार करत नाहीत. चंदनाची ओळख करून द्यावी लागत नाही की, ‘बाबा रे हे चंदन आहे आणि हे सुवासिक आहे.’ तसेच भावना यांच्याबाबत म्हणता येईल. त्या नि:स्वार्थी भावनेने समाजकार्य करतात. त्या अत्यंजांच्या उत्थानासाठी सढळ हस्ते मदत करतात. याची त्यांनी वाच्यता न करताही महाराष्ट्राच्या सेवावर्तुळात भावना प्रधान हे सेवाभावी व्यक्तिमत्त्व आदरास पात्र ठरले.


पुढे भावना यांचा विवाह अरविंद प्रधान यांच्याशी झाला. त्यांनी भावना यांच्या समाजकार्याला प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि सहकार्य केले. त्यामुळे गरजू व्यक्तीस, संस्थेस अडल्या नडल्या वेळी कोण मदत करू शकेल तर भावना प्रधान हे समीकरण रूढ झाले. त्यामुळे अनेक बालकाश्रम, अनाथाश्रमामध्ये बालकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू देणे असू दे, पुस्तके देणे असू दे, भावना प्रधान सर्वात पुढे असतात. ही लहान मुले उद्या मोठी होतील. भारताची नागरिक होतील. समाजाच्या देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचाही वाटा असेल. उद्याचा समाज आणि देश चांगला हवा असेल तर आजच्या बालकांवर चांगले संस्कार व्हायला हवेत. हे संस्कार वाचनाच्या माध्यमातून व्हावेत, यासाठी भावना यांनी या बालकांसाठी वेगळी भेटवस्तूही तयार केली. ती भेटवस्तू म्हणजे ‘१५ पुस्तकांचा संच.’ परिकथा, इसापनीती, पंचतंत्र, संस्कारधन, क्रांतिकथा, समाजसेवक, पशुसंवर्धन, परसातील बाग, कुक्कुटपालन, विज्ञानविषयक पुस्तक या संचात समाविष्ट केली. बालकाश्रम, सेवावस्तीतील विविध उपक्रम, छोटी छोटी सेवा स्वरूपातील वाचनालये यामध्ये ही पुस्तके त्या भेट स्वरूप देतात. हे विषय पाहूनच भावना यांचे सामाजिकभान कळते. मुलांवर संस्कार तर होतीलच, पण त्याचबरोबर वनवासी पाडे किंवा सेवावस्तीतल्या मुलांना पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, बागकाम यांसारखे स्वयंरोजगाराची गोडी वाढवणारे व्यवहारिकज्ञानही मिळते. कपडे, खेळणी, पुस्तके या गोष्टी दरवर्षी नित्यनियमाने त्या अगणित सेवाभावी संस्थांना देत असतात. वनवासी पाड्यांवर त्यांनी संगणकही दिले आहेत. तेथे मुले संगणक शिकतात. अंधांसाठी मदत करणार्‍या ‘नॅब’सारख्या संस्थेला काय मदत करता येईल? तर भावना यांनी सामाजिक, सांस्कृतिक विषयाच्या कथाकथन कॅसेट्स, सिडीजमध्ये रेकॉर्ड केले. या सिडीजना भारताबाहेर परदेशात खूप मागणी आहे. अमेरिका, युरोप येथील सासुरवाशिणींना भावना यांच्या कॅसेट्स, सिडीज आवर्जून नेतात. का तर तिथे त्यांच्या मुलांवर भारतीय त्यातही हिंदू संस्कृतीचे संस्कार व्हावेत यासाठी!


‘जिथे जे आवश्यक आहे, ते द्यावे’ हे समीकरण भावना यांचे आहे. त्यामुळे तलासरी येथील वाळवंडे गाव असू दे की वाड्या जवळचे आंबिष्टे गाव असू दे. शहापूर किंवा कर्जतचे वनवासी पाडे असू दे की, मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागातल्या सेवावस्ती असू दे. त्या त्या ठिकाणी काय गरजेचे आहे हे पाहूनच भावना तिथे मदत करत असतात.


महिलांच्या समस्यांवर काम करताना भावना यांना जाणवले की, महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच आरोग्याच्या बाबतीत खूप खूप छोट्या-छोट्या गोष्टी त्यांनी केल्या तरी त्या निरोगी राहू शकतात. त्यासाठी नियमित शारीरिक स्वच्छता, खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी पाळल्या, तर अनेक सकारात्मक बदल होतात. यासाठी अतिशय महागड्या गोष्टीच खायला हव्यात असे काही नाही, तर जे उपलब्ध आहे, जे स्वस्तही आहे अशा गोष्टी ठरवून जेवणात समाविष्ट करायला हव्यात. हे ते महिलांना सांगू लागल्या. तलासरीमधील काही वनवासी पाड्यांवरील महिलांना शिवणकाम शिकायचे होते. भावना यांनी त्या महिलांसाठी शिवणयंत्रे दिली. ती शिवणयंत्रे गावातल्या सामुदायिक समाजकेंद्रांमध्ये ठेवली. शिवणकाम शिकवू शकणार्‍या गावातील महिलांना तिथे शिकवणीस ठेवले. आज शेकडो महिला तिथे शिवणकाम करत आहेत. चरितार्थ चालवत आहेत. माणगाव येथील महिला बचतगटांना पापड, कुरडया यांची पॅकिंग मशीन्स दिलेली आहेत. वनवासी पाड्यांमध्ये महिला कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करत नसत. जोपर्यंत मुले होत तोपर्यंत जन्म द्यायचा, हेच त्यांचे खडतर जीवन. यातून अनेक समस्या निर्माण होतात. यावर शक्कल म्हणून भावना यांनी जाहीर केले की, कुटुंबनियोजन करणार्‍या वनवासी महिलेला त्या स्टीलचा पिंप भेट देतील. त्याचा परिणाम असा झाला की, शहापूर, कर्जतच्या वनवासी पाड्यांमधल्या कित्येक वनवासी भगिनींनी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली.


अनाथाश्रम, बालकाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रम या सार्‍या ठिकाणी भावना यांची सेवा सुरू आहे. इतकेच काय ठाण्याच्या मासळी बाजारातही त्यांचे एक अनोखे सेवाकाम आहे. त्या कामाचा कदाचित आपण विचारही करू शकत नाही. ‘मासळी बाजार’ नाव जरी उच्चारले तरी मासळीचा तो विशिष्ट दर्प आठवल्याशिवाय राहत नाही. ‘मासळी बाजार’ उठला तरी तो दर्प रेंगाळतच राहतो. ओशट वास, दुर्गंधी येते. भावना यांनी हे पाहिले. त्यांनी काय केले तर फिनेलच्या बाटल्या घेतल्या. कोळी बायकांना भेटल्या. त्यांना सांगितले, “मावशी, मासे विकून झाले की एकच काम कर. बादलीभर पाण्यात फिनेल टाकून ते पाणी नुसते तू बसतेस त्या जागेवर आजूबाजूला ओत. छोटे-छोटे किडेबिडे मरतील, ओशट वास येणार नाही.” भावना म्हणतात, “किडे मरतील हे माझे आगाऊ वाक्य मी टाकले. कारण, असे म्हटल्यावर कोळी बायका तयार झाल्या. आता मासळी बाजार उठल्यावरही तिथे ओशट वास येत नाही.” दुसर्‍या दिवशी मासळी विकताना कोळी भगिनींनाही बरे वाटते. फिनेलचे वाटप तर मुंबईतल्या अनेक वस्त्यांमध्ये करते. कारण, स्वच्छता जमेल तशी करायला हवी. सफाई कामगार येईल, महानगरपालिकेची माणसे येतील तेव्हा स्वच्छता होईल ही वाट बघण्यात अस्वच्छता अजून वाढते. आपण आपल्यापरीने स्वच्छता राखायला हवी.


वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठीही त्या कार्यरत आहेत. वृद्धाश्रमामध्ये नाईलाजाने किंवा स्वेच्छेने आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे एक आपले विश्व असते. आयुष्याच्या उतारावरचा एकलेपणा कुणालाही असहय्यच. वृद्धाश्रमामधील ज्येष्ठांना मदत करताना भावना त्यांना पुस्तके देतात.


एम.ए, जर्नालिझम शिकलेल्या भावना प्रधान यांचे विचार अत्यंत स्वच्छ. बांधिलकी, आभास, सेवासहयोग, समतोल, फॅण्ड्री फाऊंडेशन अशा अनेक संस्थांशी त्यांची सेवात्मक बांधिलकी. त्यांच्या कार्यासाठी त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. भावना यांचा गोतावळा खूप मोठा. महाराष्ट्रातील आणि परदेशातही त्यांचे नातेवाईक चांगल्या पदावर आणि प्रतिष्ठेमध्ये आहेत. थोडक्यात एक उदाहरण द्यायचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे हेसुद्धा भावना प्रधान यांचे नात्यातलेच. पण, मोठी-मोठी माणसे आपल्या परिचयाची आहेत, तेव्हा त्या ओळखीचा उपयोग करा असले उद्योग भावना यांनी कधीही केले नाहीत. उलट कायम प्रसिद्धीपासून दूर राहून काम कसे करता येईल, असाच प्रयत्न त्यांनी केला. भावना यांची मोठी मुलगी प्राची डॉक्टर आहे. दुसरी मुलगी प्राजक्ताने पीएच.डी केली आहे. मुलगा रोहन इंजिनिअर आहे व तो ठाण्यात फॅक्टरी सांभाळत आहे. भावना यांनी कुटुंबासोबत समाजालाही अग्रेसर करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या समाजशील कार्याला खूप खूप शुभेच्छा...!


@@AUTHORINFO_V1@@