लोकमान्य टिळकांच्या समाजसुधारणेबद्दलच्या भूमिका (भाग-१)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2020
Total Views |
tilak_1  H x W:
आधुनिक शिक्षणाने टिळक मातले नाहीत किंवा आपल्या संस्कृतीमधील सगळेच त्यांनी स्वीकारलेही नाही. आजच्या काळात जे आचरणशील नाही, ते टिळकांनी सोडण्याची तयारी दाखवली. प्रत्येक नवी गोष्ट उतावळेपणाने त्यांनी स्वीकारली नाही. त्यातील बारीकसारीक खाचाखोचा टिळकांनी जाणून घेतल्या, चांगल्याचे कौतुक केले, वाईटावर बोट ठेवले. संस्कृती आणि परंपरा यातील सगळेच मोलाचे आहे, असा हेकेखोरपणा न करता त्यांना जाणवले त्या प्रथांना बगल दिलीच आणि नव्या जुन्याचा संगम साधण्याचा प्रयत्न केला.


टिळक समाजसुधारणेला अनुकूल होते का? त्यांची समाजसुधारणेबद्दलची मते नेमकी कशी होती, याबद्दल अनेकांच्या मनात शंका-कुशंका असतात, त्या काळातही होत्या. त्यांच्या जडणघडणीच्या काळापासून ते भारताचे सर्वोच्च नेते टिळक असताना त्यांनी सुधारणेच्या बाबतीत घेतलेल्या काही भूमिका आजही या ना त्या कारणाने चर्चिल्या जातात, त्याचा परामर्श घेऊया.


त्या काळात प्रत्येक वडिलांना आपल्या मुलाबद्दल असलेली काळजी टिळकांचे वडील गंगाधरपंतांना वाटत होतीच! गंगाधरपंत आपल्या मुलाला घेऊन पुण्यात स्थायिक झाले तेव्हा पुण्यात राजकीय सुधारणेच्या चर्चेपेक्षा सामाजिक विषयांवरच वाद-विवाद चालत. त्यामुळे बहुतांश उच्चवर्णीय मुलांच्या पित्यांना चिंता असायचीच की, आपली मुले इंग्रजी शिक्षणाने आपल्याच संस्कृतीच्या विरुद्ध तर नाहीना जाणार! शिक्षणामुळे मुलांनी धर्म सोडून जाऊ नये, सुधारक विचारांच्या प्रभावाखाली येऊ नये, अशी भूमिका सामान्यपणे असे. स्त्रीशिक्षणाबद्दलही तत्कालीन लोकांचा असाच दृष्टिकोन असावा. पण, टिळकांच्या बाबतीत असे काही घडले नाही. जेवणाचा क्लब सोवळे-ओवळे पाळणारा असला तरी त्यातल्या त्यात कमी सनातनी समजला जाणारा नाशिककरांचा क्लब टिळकांनी निवडला होता. समाजसुधारणेच्या बाबतीत टिळकांनी कधीही टोक गाठले नाही, मध्य साधण्याचाचं प्रयत्न केला.


आधुनिक शिक्षणाने टिळक मातले नाहीत किंवा आपल्या संस्कृतीमधील सगळेच त्यांनी स्वीकारलेही नाही. आजच्या काळात जे आचरणशील नाही, ते टिळकांनी सोडण्याची तयारी दाखवली. प्रत्येक नवी गोष्ट उतावळेपणाने त्यांनी स्वीकारली नाही. त्यातील बारीक-सारीक खाचाखोचा टिळकांनी जाणून घेतल्या, चांगल्याचे कौतुक केले, वाईटावर बोट ठेवले. ‘संस्कृती आणि परंपरा यातील सगळेच मोलाचे आहे,’ असा हेकेखोरपणा न करता त्यांना जाणवलेल्या प्रथांना बगल दिलीच आणि नव्या-जुन्याचा संगम साधण्याचा प्रयत्न केला.


तरुण वयात टिळक अस्सल सुधारक नव्हते आणि पुरेपूर कर्मठ सनातनीही नव्हते. महाविद्यालयातील तरुण वयात टिळक-आगरकरांचे समाजसुधारणा आणि राजकीय प्रश्न याबद्दल वाद झाले नाहीत असे नाही. आगरकर हे मुख्यतः इंग्रजी ग्रंथांच्या वाचनाने वाढलेले असल्यामुळे साहजिकच आगरकरांचा ओढा नव्या विचारांकडे म्हणजेच समाजसुधारणेकडे होता. उलट टिळकांचे मात्र संस्कृत भाषा, धर्मग्रंथ यांसारख्या स्वसंस्कृतीच्या वाचनावर पोषण झाले होते. त्यामुळे त्यांचा कल तिकडे अधिक! तरीही राजकीय आणि सामाजिक दोन्ही सुधारणा दोघांनाही हव्या होत्या, याबद्दल शंका नाही. त्यांचे अग्रक्रम निराळे होते इतकेच. तरीही ते बाजूला ठेवून ‘राजकीय’ आणि ‘सामाजिक’ हा भेद बाजूला ठेवण्याची दोघांचीही तयारी होती. तडजोडी करायला दोघेही तयार होते हे लक्षात घ्यायला हवे. ‘सुधारणा’ त्यांना महत्त्वाची वाटत होती आणि त्यासाठी एकच महत्त्वाचे माध्यम समोर दिसत होते ते म्हणजे शिक्षण! त्यानंतर ‘केसरी’ आणि ‘मराठा’मध्ये लिहितानासुद्धा सार्वमताने त्यांनी निर्णय घेतले, तेव्हा या वादाला फारसे महत्त्व आले नाही, याचा ऊहापोह मागे टिळकांच्या राजीनामा प्रकरणात केलेला आहेच.


बालविवाह आणि त्यामुळे कमी वयात स्त्रियांना सोसावे लागणारे वैधव्य यासाठी मलबारी शेठजींनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे सर्वात आधी ‘केसरी’ व ‘मराठा’मधून टिळक-आगरकरांची जुंपली. कायदा करू नये याबद्दल स्पष्टीकारण देताना टिळकांनी लिहिले होते, “विद्वान लोकांना तरी अविद्वान किंवा अडाणी लोकांवर जुलूम करण्याचा काय हक्क आहे? लोकांनी आपले ऐकावे अशी इच्छा असेल तर त्यांना शिक्षण द्यावे, उपदेश करावा, त्यांना न समजणारा व न आवडणारा कायदा त्यांच्यासाठी सरकारकडून मागून घ्यायचा त्यांना अधिकार नाही. पाहिजे असल्यास त्यांनी आपल्यापुरता कायदा करून घ्यावा.” यातून लोकमान्य हे ‘लोकमान्य’ का झाले याचे दर्शन होते, असा अभिप्राय यावर सदानंद मोरे यांनी दिला आहे.


सोसायटीमधील भांडणामुळे दोघांनी आपापल्या भूमिका जास्त प्रखर केल्या आणि त्याचमुळे समाजाने आणि अभ्यासकांनी टिळकांना ‘प्रतिगामी’ ठरवले आणि आगरकरांना ‘सुधारक पुरोगामी!’ ‘आपले आर्यत्व राखून सुधारणा करायला हवी,’ असे म्हणणारे आगरकर आम्ही विसरलोच. स्वतःला ‘तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’ म्हणवून घेणारे टिळक अनेकांना जातीय वाटू लागले. आगरकरांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ सोडून ‘सुधारक’ सुरू करणे आणि टिळकांनी सोसायटी सोडणे आणि स्वतःला राजकारणात झोकून देणे या दोन घटना सामाजिक-राजकीय वाद जोरजोराने होऊ लागण्यास एक महत्त्वाचे कारण आहे हे मात्र नक्की. सोसायटीमधील अंतर्गत भांडण हे त्याचे मूळ कारण आहे, ‘पण लक्षात कोण घेतो?’


पंडिता रमाबाईंच्या ‘शारदासदन’चे प्रकरण आणि संमती वयाचा कायदा या दोन्ही विषयांवर सर्वात आधी टिळक-आगरकरांना दोन हात करावे लागले. या रमाबाई ख्रिस्ती मिशनरी संस्थांकडून निधी मिळवून मुलींसाठी ‘शारदासदन’ ही संस्था चालवत असत, या माध्यमातून धर्मांतर घडवून आणण्याचे प्रकार चालतात, असा संशय टिळकांना होता आणि शेवटी एका परदेशी मासिकातून हे सिद्ध झाले की, ‘शारदासदना’तून मुलींची ख्रिस्ती धर्मांतरे होतात, तेव्हा मात्र ‘शारदासदना’ला पाठिंबा देणारे सगळे सुधारक तोंडघशी पडले. यातून टिळकांची प्रतिमा मात्र ‘धर्मनिष्ठ’ म्हणून बहरत गेली.


नंतर संमती वयाच्या कायद्याला टिळकांनी विरोध केल्याचे दिसते. मात्र, हे प्रकरण पूर्ण लक्षात घेतले तर टिळकांनी यातही आपली खास शक्कल लढवून, “सुधारणा करायची तर कायदा कशाला? आपल्या धर्माची सुधारणा आपण घेऊया ना करून, त्यासाठी ब्रिटिशांनी कायदा करण्याची जरूर नाही,” असे टिळक म्हणत. त्यांनी थोड्याशा चतुराईने याबद्दल स्वतःची भूमिका मांडलेली दिसते. इतकेच नाही, तर यासाठी २०० उच्चवर्णीय जातींनी आम्ही हे नियम पाळणार आहोत, असे पत्र किंवा अर्ज सरकारकडे पाठवावेत, म्हणजेच आपोआप लोक त्याचे अनुकरण करतील आणि बदल घडू लागतील, अशी उपसूचनाही टिळक करत होते. आपण स्वतःच हे नियम मान्य केले असल्याने ते मोडले, तर त्याबद्दल स्वतः प्रायश्चित्त घ्यावे, अशी तरतूद करण्याची टिळकांनी तयारी दाखवली.


सुधारकांना अचंबा वाटेल अशा काही गोष्टी टिळकांनी इथे मान्य केलेल्या होत्या. त्यात मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १६ आणि मुलाची २०. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ४० वर्षाच्या पुरुषाने विधवेशी लग्न करणे अशा बर्‍याच तरतुदी टिळकांनी केल्या होत्या. ही त्यांची एक धूर्त चाल असली तरी या प्रकरणामुळे आपण सुधारकांपेक्षाही एक पाऊल पुढे असलेल्या सुधारणा घडवून आणण्याची तयारी दाखवत आहोत, असे चित्र निर्माण करण्यात टिळक यशस्वी झाले.


सुधारणा घडवून आणूया मात्र त्यासाठी तरीही कायदा करायला टिळक आणि पुण्यातील धर्मनिष्ठ लोकांचा विरोध होताच. आपले कायदे बदलणे आणि आपल्या धर्मात ढवळाढवळ करणे ब्रिटिशांच्या हाती जाऊ नये हा हेतू! या एका मुद्द्यावर टिळकांना बंगाली सुशिक्षित पुढार्‍यांचा पाठिंबा मिळाला, हे ध्यानात घ्यायला हवे. तरीही कायदा व्हायचा तो शेवटी झालाच! इथेही टिळकांच्या कायदाविरोधी भूमिकेमुळे त्यांच्याभोवतीचे धर्मनिष्ठांचे कडे मजबूत व्हायलाच मदत झाली.


ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या हातून चहा घेतला म्हणून टिळकांना कट्टर सनातनी मित्रांचा बहुत रोष पत्करावा लागला तोही याच काळात. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यापर्यंत मजल गेली आणि लग्न, मुंज, श्राद्ध यासाठी भटजी मिळेना. ‘केसरी’तून टिळकांना आपल्या धर्माभिमानी मित्रांशी धर्माच्या चौकटीतून वाद घालावा लागला आणि आपली भूमिका धर्मशास्त्राच्या चौकटीत कशी योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी झगडावे लागले. ‘चहाग्रामण्य’ प्रकरणात चापेकरांनी टिळकांना चांगलेच टोले लगावले आहेत. चापेकरांना किंवा त्यांच्यासारख्या कट्टर सनातन्यांना टिळक हे धर्माचे शत्रूच आहेत असेच वाटले. चापेकर म्हणतात, “टिळकांविषयी पुष्कळ लोकांचे मत चांगल्या प्रकारचे आहे, हे मी जाणून आहे, पण ते विवेकांढ असले पाहिजेत. माझ्या मताने ‘न हिंदुर्न यवनः’ या म्हणीप्रमाणे ‘धड सुधारकही नाहीत आणि धड स्वधर्मनिष्ठही नाही.’ कारण, याला जर ‘स्वधर्मनिष्ठ’ म्हणावा तर विधवा विवाह प्रतिबंध निवारण मंडळाचा हा सभासद आहे. गोमांस खाणारा तो दाजी आबाजी खरे (गाढव) त्याचा हा परममित्र समयपरत्वे जाऊन धर्मनिष्ठ बोवा फुशारक्या मारतात. बिस्कुटे खाल्याबद्दल प्रायश्चित्त घेण्यास या राजश्रींना शरम वाटली, पण चहा पिताना शरम वाटली नाही.” कट्टर धर्माभिमानी लोकांना टिळक हे पक्के सुधारक वाटायचे तर सुधारकांना मात्र टिळक धर्माभिमानी वाटायचे! पण, टिळक खरंतर या दोन्ही चौकटीत बसणारे नव्हते हेच खरे!


यानंतर मुख्यतः गणेशोत्सव आणि शिवजयंती या टिळकांच्या दोन उत्सवांमुळे स्पृश्य-अस्पृश्य दरी कमी होण्यास मदतच झाली, असे इतिहास सांगतो. अस्पृश्यांचे मेळे विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होणे असो किंवा शिवजयंतीला ब्राह्मणांच्या बरोबरीने इतर जातींच्या पंगती उठणे असो, शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या चळवळीतून टिळकांनी बहुजन समाजाचे केलेले नेतृत्व त्यांच्यातील सर्वसमावेशी सुधारकांचा एक निराळा पैलू आपल्यासमोर प्रगट करतो. मोठे राष्ट्रीय कार्य हाती घेतल्यावर बारीकसारीक सामाजिक भेद आपोआप मोडीत निघतात हे सांगतांना पेशवाईचे उदाहरण टिळक अनेकदा देत टिळक म्हणत, “राष्ट्रकार्यामध्ये पेशव्यांच्या काळातदेखील अस्पृश्यतेला जागा नव्हती. महारांनादेखील काही विशिष्ट अधिकार होते. त्या वेळी ज्या ज्या ठिकाणी पेशव्यांचा तळ पडत असे त्या त्या ठिकाणी खुद्द श्रीमंत पेशवे सरकारच्या तंबूशेजारी महारांच्या मुख्याचा तंबू ठोकण्याची वहिवाट चालू असे व तो त्याचा हक्क समजला जात असे. एके दिवशी महारांच्या अधिकार्‍याचा तंबू ठोकावयाचा त्या ठिकाणी नाना फडणवीसांचा तंबू ठोकण्यात आला. थोड्या वेळांनी तो अधिकारी त्या ठिकाणी आला. त्याने आपला तंबू निराळ्या ठिकाणी ठोकण्याचे साफ नाकारले व तो घोड्यावरून खाली उतरेना. शेवटी त्या वेळचे पेशवे श्रीमंत सवाई माधवराव यांना नाना फडणवीसंचा तंबू त्या जागेवरून काढून महारांच्या अधिकार्‍याचा तंबू त्या ठिकाणी ठोकावा लागला. यावरून आपल्याला याची खात्री होईल की, ब्राह्मण पेशव्यांच्या काळातही महारांना काही अधिकार होते.” याच्या जोडीला टिळक आणखी एक उदाहरण देत ते म्हणजे शनिवारवाड्यात मराठे सरदार आणि ब्राह्मण पेशवे यांच्या एकत्रित पंगती बसत आणि पेशव्यांच्या बायका स्वतः त्यांना जेवण वाढत! या दोन्ही प्रसंगांची ऐतिहासिक सत्यता जाऊ द्या. मात्र, यातून राष्ट्रकार्य समोर असले की लहानसहान जातीय भेद आपण मोडून काढायला हवेत, असेच सुचवण्याचा प्रयत्न टिळक करतात हे महत्त्वाचे.


टिळकांचे राजकारण असे सर्वसमावेशक होते, तरीही एका प्रकरणाने त्यावर काजळी यायची ती आलीच! ते होते वेदोक्त प्रकरण! बहुचर्चित वेदोक्त प्रकरण जाणून घेऊया पुढच्या भागात...
(क्रमश:)

- पार्थ बावस्कर
@@AUTHORINFO_V1@@