दहशतवादी विचारधारेने प्रेरित दिल्लीतील दंगल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2020
Total Views |

hindi vivek_1  
 
 
 
नवी दिल्ली : दिल्लीतील दंगलीत पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल बारी हिंसक समुदायाच्या गोळीबारात हुतात्मा झाले. दिल्ली पोलीस दलात कार्यरत असलेले हुतात्मा रतनलाल बारी राजस्थानच्या फतेपूर शेकावटी जिल्ह्याचे रहिवासी होते. बलिदानानंतर त्यांच्यावर मूळ गाव तिहावालीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रतनलाल बारी यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी 'विवेक' परिवाराकडून 'हिंदी विवेक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांनी नुकतीच त्यांची तिहावली येथे भेट घेतली.
 
 
पेडणेकर यांनी यावेळी हुतात्मा रतनलाल यांच्या पत्नी पूनम बारी यांची भेट घेऊन 'विवेक' परिवाराच्या भावना आणि श्रद्धांजली व्यक्त केली. पूनम यांनी यावेळी पती रतनलाल बारी यांच्या आठवणींना उजाळा देताना ते आपल्या वर्दीचे दिवाने होते असे सांगितले. "आपले काम ते निरंतर एका सैनिकाप्रमाणे कर्तव्यभावनेने करत असत," असेही त्या म्हणाल्या. आपल्या आयुष्यात कर्तव्याला नेहमीच प्रथम स्थान देणाऱ्या रतनलालजींच्या जीवनातील अंतिम क्षणदेखील कर्तव्य निभावतानाच आला, असे बोलून पूनम बारी यांनी रतनलालजींबद्दल वाटणारा अभिमानही व्यक्त केला. तसेच आपला मुलगा राम याला पोलीस वा सैन्यात दाखल करण्याची इच्छादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. रतनलालजींची आई पुत्रवियोगाने अश्रूभरल्या डोळ्यांनी म्हणाल्या की, "रतनलाल यांचे अशाप्रकारे आमच्या आयुष्यातून कायमचे निघून जाणे, हा फार मोठा धक्का आहे. रतनलाल कुटुंबातील मोठा मुलगा असल्याने सगळी जबाबदारी सांभाळणाऱ्या मुलाला आम्ही गमावले आहे."
 
 
रतनलालजींचे पुतणे राकेश बारी यांनी म्हटले की, "हा काही साधारण मृत्यू नाही. मुस्लीम दहशतवाद्यांशी लढताना त्यांचा मृत्यू झाला." गोळी लागल्यानंतरही रतनलालजींनी आपले वरिष्ठ अधिकारी डीसीपी अमित शर्मा यांचा जीव वाचवण्याचे प्रयत्न केले. रस्त्यावरील पोलादी दुभाजकाच्या एका बाजूने मुस्लीम समुदाय दगडफेक आणि गोळीबार करत होता आणि मध्ये डीसीपी व पाच पोलीस कर्मचारी अडकले होते. अशात रतनलाल यांनी जखमी डीसीपींना उचलून दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला नेले. डीसीपींचा जीव तर वाचला पण, थोड्याच वेळात रतनलाल खाली पडले. गोळी लागल्याने जखमी अवस्थेत ते खाली कोसळले आणि तशा अवस्थेतही मुस्लिमांच्या एका गटाने त्यांना फरफटत आपल्या समुदायात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने हे शक्य होऊ शकले नाही. दरम्यान, रतनलालजींच्या खांद्याच्या एका बाजूने घुसलेली गोळी हृदय चिरत दुसऱ्या खांद्याकडे येऊन थांबली होती. ज्या गोळीने रतनलालजींचा मृत्यू झाला ती साधी छर्र्याची गोळी नव्हती, तर १५ एमएमची गोळी होती. जी आधुनिक पिस्तुलातून चालवली गेली होती आणि अशाप्रकारचे हत्यार सामान्यजनांकडे नव्हे, तर दहशतीची तयारी करणाऱ्या दहशतवादी संघटनांकडेच असते, असेही राकेश बारी यांनी सांगितले.
 
 
न्याय व प्रशासन व्यवस्थेला विनंती करत पुढे ते म्हणाले की, "आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने नाही. परंतु, ज्याप्रकारे देशातील वातावरण खराब करण्यासाठी दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीच्या शहराला दंगलीच्या आगीत राख केले गेले, ते कृत्य करणाऱ्या दहशतवादी विचारधारेच्या दोषी लोकांना सरकारने पकडून फासावर लटकवले पाहिजे." रतनलालजींचे भाऊ दिनेश बारी यांनी यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारने रतनलालजींना 'हुतात्मा' दर्जा दिल्याने हा रतनलालजींच्या हौतात्म्याचा गौरव असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले. तसेच राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, शिकरचे भाजप खासदार स्वामी सुभेदानंद, राजस्थान भाजप अध्यक्ष सतीश पुनिया, दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बारी कुटुंबीयांना सांत्वा देण्यासाठी घरी आले होते," असेही त्यांनी सांगितले. 'विवेक' परिवाराच्या माध्यमातून पूनम बारी यांना 'विवेक विचार मंचा'कडून भविष्यात आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी आश्वासनाचे पत्रदेखील यावेळी देण्यात आले. सोबतच 'हिंदी विवेक' प्रकाशित 'महात्मा गांधी : एक सोच' आणि 'महिला विशेषांक' ही पुस्तकेही पूनम बारी यांना देण्यात आली. सदर भेटीवेळी तिहावली गावातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांनी हुतात्मा रतनलालजींचे भव्य स्मारक आपल्या गावात उभारण्यासाठी सरकारदरबारी निरंतर प्रयत्न करणार असल्याचा विचारसंकल्पही यावेळी व्यक्त केला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@