खामेनींची खंत की खदखद?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2020   
Total Views |

khameni_1  H x

भारताच्या प्रत्येक लहानमोठ्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचे पाकिस्तानचे तसे जुनेच धोरण. पण, आता इराण आणि तुर्कस्ताननेही पाकिस्तानच्याच सुरात सूर मिळविल्याचे दिसून येते. जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटवल्यानंतरही पाकने भारताविरोधात जागतिक कांगावा केला होताच. पण, मलेशिया आणि तुर्कस्तान सोडल्यास पाकिस्तानच्या दाव्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने पाठ फिरवली. ‘ओआयसी’ या मुस्लीम देशांच्या परिषदेतही सौदी अरेबियाने काश्मीरचा मुद्दा पटलावर येऊ न दिल्याने पाकिस्तानवर नामुष्की ओढवली होतीच. यासंबंधीची खंत वेळोवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी बोलूनही दाखवली. पण, त्याचाही फारसा परिणाम दिसून आला नाहीच. भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा सदैव जड राहिले. परंतु, दिल्ली हिंसाचारानंतर पुन्हा एकदा भारतातील मुसलमानांवर अन्याय-अत्याचार होत असल्याची ओरड इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्लाह खामेनी यांनी केल्यामुळे पाकिस्तानच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. कारण, इराण आणि भारताचे संबंधही चांगले असून चाबहारसारखे बंदर आपण एकत्रित विकसित केले आहे. त्यामुळे खामेनींनी मोदींचे कान टोचले, यात आनंद मानून पाकिस्तानने स्वत:चीच कॉलर उंचावण्याचा फुकटचा दिखावा यानिमित्ताने केला. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून आणि ‘सीएए’, ‘एनआरसी’ वरूनही भारताच्या अंतर्गत धोरणांवर टीका करण्याचे टाळणार्‍या इराणला एकाएकी ही उपरती का सुचावी, याची कारणमीमांसा करायलाच हवी.


खामेनींचा रोष आणि रोख भारतीय मुसलमानांवर होणार्‍या अत्याचाराकडे जरी वरकरणी वाटत असला तरी त्यांच्या टीकेमागचे खरे कारण हे डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींची वाढती जवळीक असण्याचीच दाट शक्यता आहे. इराणचे सैन्यप्रमुख कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने इराकमध्ये मिसाईल हल्ला करून ठार मारले. त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये केवळ शाब्दिक युद्ध रंगले नाही, तर इराणनेही अमेरिकेच्या आखातातील सैन्यतळांवर हवाई हल्ले केले. एकप्रकारे इराणने अमेरिकेवर अघोषित युद्धच जाहीर केले. त्यातच इराणवर अमेरिकेने लादलेले निर्बंध आणि इराणची जागतिक कोंडी करण्याचा केलेला प्रयत्न यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आणि संपूर्ण मध्य आशियात युद्धाचे काळे ढग दाटून आले. अद्याप हे संकट दूर झालेले नाहीच. अशा परिस्थितीत अमेरिकेशी भारताची वाढणारी जवळीक इराणच्या पचनी न पडणे, हे अगदी स्वाभाविक आणि त्याचीच परिणती म्हणजे खामेनी यांनी भारतात मुसलमानांच्या नरसंहाराविषयी व्यक्त केलेली ही चिंता.


राजधानी दिल्लीत जे काही झाले, ते सर्वार्थाने दुर्देवीच. ५० हून जास्त लोकांचा या दंगलीत बळी गेला आणि २०० हून अधिक जण जखमी झाले. पण, या दंगलीत केवळ मुसलमानच नाही, तर हिंदूंचेही रक्त सांडलेच. हिंदू आणि मुसलमान, दोघांच्या वस्त्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. असे असताना दिल्लीतील हिंसाचाराला ‘मुसलमानांचा नरसंहार’ म्हणण्याचा इराणने दाखवलेला उतावीळपणा हा असंबद्धच म्हणावा लागेल.


इराणबरोबर भारताचे संबंध काही नवीन नाहीत, तर अगदी पर्शियन साम्राज्याचे वर्चस्व असल्यापासून भारत आणि इराणचे एकमेकांशी सांस्कृतिक, व्यापारी ऋणानुबंध आहेत. त्यामुळे खामेनींनी दिल्ली हिंसाचारावरून भारताला चार शब्द सुनावण्यापूर्वी भारत-इराण संबंधांवर याचा परिणाम तर होणार नाही ना, याची खातरजमा करणे अपेक्षित होते. केवळ ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ यांसारख्या अमेरिका-भारत संबंधांना बळकटी देणार्‍या कार्यक्रमांमुळे इराणला दुखविण्याचा भारताचा हेतू निश्चितच नव्हता. त्यातच भारताने स्वातंत्र्यापश्चात आजवर आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरणं आखताना अलिप्ततावादाचा पुरस्कार केलेला दिसतोच. त्यामुळे इतर कुठल्याही देशाला वाईट वाटण्याचे मुळात कारणच नाही.


तेव्हा, इराणने भारतातील मुसलमानांची चिंता करण्यापेक्षा मुस्लीम जगतातील आणि खासकरून पाकिस्तानातील मुस्लीम, अहमदिया, हिंदू, सिंधी यांच्याविषयीही चिंता व्यक्त करून इमरान खान सरकारलाही चार खडे बोल सुनवावे. भारत आपल्या देशातील अंतर्गत परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे समर्थही आहे आणि मोदींच्या नेतृत्वात सक्षमही आहे. खामेनी आणि मुस्लीम जगताने भारतीय मुसलमानांचा विचार करण्यापेक्षा त्यांच्या देशातील मुस्लिमांच्या उद्धाराकडे लक्ष द्यावे.


@@AUTHORINFO_V1@@