मादुरोंची मल्लिनाथी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020   
Total Views |
maduro_1  H x W



व्हेनेझुएला.... दक्षिण अमेरिका अर्थात लॅटिन अमेरिकेतील एक देश. हा देश गेल्या काही वर्षांत खासकरून चर्चेत आला ते या देशातील प्रचंड गरिबी, भूकबळी आणि आकाशाला भिडणार्‍या महागाईमुळे. त्यात भर पडली ती अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी या देशाच्या राजकीय नेतृत्वाने घेतलेल्या वितुष्टाची. परिणामी, व्हेनेझुएलाची केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक, आर्थिक घडीही पूर्णपणे विस्कटली. महागाईचा दरही तब्बल दोनशे पटीने वाढला. परिणामी, व्हेनेझुएलावासीयांवर चक्क चोरीमारी करून, मॉलवर दरोडे टाकून, लूटमारीच्या मार्गाने पोट भरण्याची वेळ आली. अजूनही व्हेनेझुएला यापैकी कुठल्याही संकटातून तावूनसुलाखून बाहेर पडलेला नाही. व्हेनेझुएलाचे रहिवासी सर्वार्थाने त्रस्त आहेत. ना हाताला नोकरी, ना पैसा आणि एका वेळच्या जेवणाचीही भ्रांत. एका अधिकृत आकडेवारीनुसार तर तीन कोटींची लोकसंख्या असलेल्या या देशांतून तब्बल ४५ लाख लोकांनी पलायन केले आहे. ते वैध आणि बहुतांशी अवैध मार्गानेच दक्षिण अमेरिकेच्याच शेजारी देशांमध्ये शरणार्थी, घुसखोर म्हणूनच कसेबसे दिवस काढताहेत. कारण, व्हेनेझुएलामध्ये परतण्यासारखी आता परिस्थितीही नाही आणि या लोकांची मनस्थिती तर त्याहून बिकट. व्हेनेझुएलामध्ये त्यांना साधे पोट भरणेही जिकिरीचे ठरते आणि जे व्हेनेझुएलामध्ये अजूनही हातावर पोट ठेवून कसेबसे दिवस काढताहेत, त्यापैकी ९३ लाख लोकांच्या ताटात अन्न नाही. अशा देशात जिथे अन्नपाण्यासाठी लोक आसुसले आहेत, तिथे जन्मलेल्या मुलांचेही पालनपोषण करणे पालकांना मुश्कील. पण नाही, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती महोदयांनी सर्व नागरिकांना सहा (नेमकी सहाच का, ते कळण्याचा मार्ग नाही.) मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.


मुळात ज्या देशात जगण्याचीच शाश्वती नाही, अशा देशातील नागरिक आणखीन मुलांना जन्माला घालून त्यांचे संगोपन करणार तरी कसे? परंतु, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती मादुरो यांना मुलं जन्माला घालणे आणि त्यांचे पालनपोषण करणे, हा जणू पोरखेळ वाटावा असेच दिसते. आता हे राष्ट्रपती महोदय, हे असले विधान करून एकदाच मोकळे झाले नाहीत, तर मुलं जन्माला घालण्याच्या पद्धतींचाही सरकारी माध्यमातून प्रचाराचा त्यांनी अट्टाहास केला. त्यात ते म्हणाले, “देशासाठी ईश्वर (येशू) तुम्हाला सहा मुलं जन्माला घालण्याचा आशीर्वाद देत आहे. जन्म द्या, पुन्हा जन्म द्या, सगळ्या महिलांनी किमान सहा मुलांना जन्म दिलाच पाहिजे.” आता राष्ट्रपतींच्या या भलत्याच आशावादाला काय म्हणावे?


व्हेनेझुएलाचे नागरिक देश सोडून गेल्यामुळे निश्चितच त्याचा फटका सर्व क्षेत्रांवर पाहायला मिळालाच. पण, ही परिस्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सर्वंकष प्रयत्न करायचे सोडून, सहा मुलांना जन्म घालण्याचे नसते सल्ले नागरिकांना देण्यात काय हशील? जे देश सोडून गेले, त्यांना परतण्याची मागणी करण्यापेक्षा, मायदेशी परत बोलावून देशाची नव्याने उभारणी करण्यापेक्षा राष्ट्रपतींनी हा अजबच मार्ग निवडला.


राष्ट्रपतींच्या या आवाहनाला व्हेनेझुएलाचे नागरिक केराची टोपली दाखवतील, हे काही वेगळे सांगायला नकोच. कारण, अशाप्रकारे मुलं जन्माला घातल्याने देशाच्या समस्यांवर कुठल्याही स्तरावर पूर्णविराम लागेल, याची शाश्वती कमीच. उलट केवळ लोकसंख्येत भर पडून त्याचा भार नागरिकांवर आणि परिणामी देशालाच सोसावा लागेल. त्यामुळे ‘देशाला बळकट करण्यासाठी, मजबुतीसाठी मुलं जन्माला घाला,’ म्हणणार्‍या राष्ट्रपतींवर मानवाधिकार कार्यकर्त्यांनीही रोष व्यक्त केलाच. पण, मादुरो काही सुधरणार्‍यांपैकी नाही, ही आजवरची त्यांची कारकीर्द पाहता सहज लक्षात येते.


व्हेनेझुएला सोडून गेलेल्या नागरिकांनाही सरकारने जगण्याची, नोकरीची, दोन वेळच्या जेवणाची हमी द्यायला हवी. देशाचे ढवळून निघालेले वातावरण पुन्हा रुळावर आणण्यासाठी संपूर्ण देशाने एकजुटीने प्रयत्न करायला हवेच. पण, हेही तितकेच खरे की, त्यासाठी हवी तीव्र राजकीय इच्छाशक्ती आणि देशाभिमान. मादुरोंकडे दोन्हीचाही अभाव. त्यामुळे व्हेनेझुएलाच्या नागरिकांकडे दोनच पर्याय उरतात. एक तर दुसर्‍या सक्षम नेत्यावर विश्वास टाका आणि त्याच्या हाती देशाच्या चाव्या द्या; अन्यथा शांततेच्या मार्गाने व्हेनेझुएलामध्ये सर्वार्थाने लोकशाही व्यवस्था स्थापन करून देशाचे गतवैभव पुन:प्रस्थापित करा.


@@AUTHORINFO_V1@@