तंत्रज्ञानाचा कंपनी आणि कर्मचार्‍यांवरील परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020
Total Views |
dattatray_1  H


संगणकीय पद्धती आणि बदलत्या तंत्रज्ञान-कार्यपद्धतीचा कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्या कामकाजावर विविध स्वरूपात परिणाम होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. तसेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हा विषय विविध स्वरूपात आणि विविध अंगांनी सध्या चर्चेत येत आहे. त्या अनुषंगाने या एकूणच परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...


‘एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यू’ तर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, ६० टक्के एचआर अधिकार्‍यांनुसार सद्यस्थितीत प्रगत व वाढत्या तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणूनच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या परिणामापोटी नोकरी-रोजगारावर काही विपरित परिणाम होऊ शकतो का, हा प्रश्न प्रामुख्याने आढळून येतो.


याचाच परिणाम म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रात उमेदवारांची मुलाखतीद्वारा निवड करणा व्यवस्थापकांसाठी मोठी आव्हानपर स्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या परिस्थितीचे साधकबाधक अशा दोन्ही स्वरूपांत परिणाम होत असतानाच उमेदवार निवडीचे काम करणारी तज्ज्ञ मंडळी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ त्यासाठी पुढील पंचसूत्रीचा उपयोग करू शकतात.




उमेदवारांची अर्ज चाळणी

एका अन्य सर्वेक्षणानुसार सद्यस्थितीत नोकरीच्या एका जागेसाठी सुमारे २५० अर्जदार असतात, तर त्यातून उमेदवारांची चाळणी-पडताळणी करून सर्वसाधारणपणे एका जागेसाठी चार ते सहा उमेदवारांना बोलावले जाते. उमेदवारांची निवड करण्याच्या संदर्भात उमेदवारांची निवड करणार्‍यांना एका जागेसाठी सुमारे २५० अर्जांची पडताळणी करावी लागते व त्यासाठी संगणकीय कार्यपद्धतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे केवळ सोईचेच नव्हे, तर फायदेशीरही ठरू शकते. त्याचा अवलंब केल्याने उमेदवारांच्या अर्जाची चाळणी-पडताळणी करण्यापासून त्यांचा प्राथमिक स्वरूपात उमेदवारांची पुढील मुलाखतीसाठी निवड करण्यापर्यंतचे काम तुलनेने कमी वेळात व विशिष्ट पद्धतीवर आधारित असे करता येऊ शकते.




अनुभवी उमेदवार आणि उमेदवारांचे अनुभव

सर्वेक्षणानुसार ८२ टक्के व्यवस्थापकांच्या मते, नोकरीसाठी कंपनीशी संपर्क साधणार्‍या अथवा त्यांच्या निवड प्रक्रियेच्या दरम्यान जर त्यांना कंपनीचे व्यवस्थापक वा व्यवस्थापनाकडून निराशाजनक प्रतिसाद मिळाल्यास असे उमेदवार कंपनीच्या संदर्भात नकारात्मक मत पसरविण्यात पुढाकार घेतात. असे अनुभव आलेल्यांपैकी ५८ टक्के उमेदवार कंपनीच्या उत्पादन वा सेवांकडे सपशेल पाठ फिरवितात, तर कंपनीकडून नकारात्मक अनुभव आलेले सुमारे ३४ टक्के उमेदवार आपले निराशाजनक अनुभव चक्क समाजमाध्यमांवर टाकण्यास पण मागेपुढे पाहत नाहीत, हे पण यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.




उमेदवारांच्या अर्ज आणि उमेदवारीचा बहुविध स्वरूपात विचार

अर्जदारांनी नोकरीसाठी केलेला अर्ज आणि तपशील याची योग्य आणि सविस्तर पडताळणी करणे गरजेचे असते. कारण, त्यावरूनच सकृतदर्शनी उमेदवारांची चाळणी-निवड होत असते. हे काम अचूकपणे होण्यासाठी अर्जदारांच्या सततच्या वाढत्या संख्येमुळे या प्रक्रियेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे काम करणे आता अपरिहार्यच नव्हे, तर लाभदायी पण ठरत असते.




निवडीनंतरची प्रक्रिया व उमेदवारांचे कामावर रूजू होणे

निवड चाचणी, समूह चर्चा, मुलाखत या सार्‍या निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या अर्जदार उमेदवारांचे प्रत्यक्षात कर्मचारी म्हणून कामावर रुजू होणेही तेवढेच महत्त्वाचे असते. या निवड पद्धती आणि प्रक्रियेसाठी व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांतर्फे जो वेळ आणि प्रयत्न या उभयतांची गुंतवणूक केली जाते, त्या पार्श्वभूमीवर निवड झालेल्या उमेदवारांना ठराविक दिवशी व संबंधित पद्धतीचे पालन करून कामावर रुजू करून घेणे आवश्यक व महत्त्वपूर्ण असते. या संदर्भात प्रक्रियेशी निगडित विविध टप्पे व कागदपत्र आणि प्रक्रिया इ.चे योग्य पद्धतीने व वेळेत पालन करण्याचे काम करण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही प्रक्रिया विशेष उपयोगी ठरते.




उमेदवारांच्या शंकांचे निरसन

कंपनीमध्ये प्रत्यक्ष रुजू होण्यापूर्वी निवड झालेल्या उमेदवारांच्या मनात बहुविध शंका असतात. त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर व वेगवेगळ्या संदर्भात माहिती हवी असते. या सार्‍यांसाठी पर्याप्त व उपयुक्त संवादव्यवस्था फार निकडीची असते व हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत व माहितीपर अ‍ॅपद्वारा सहजपणे व योग्य प्रकारे होऊ शकते, हे उल्लेखनीय आहे. याशिवाय कंपन्यांमधील शेकडो अर्जदार-उमेदवारांमधून नेमक्या व योग्य उमेदवाराची निवड करण्याचे काम सध्या विविध कारणांनी जटिल होत असून त्यासाठी सद्यस्थितीतील व्यवस्थापकांनी उमेदवारांची निवड करताना खालील मुद्द्यांचा प्रामुख्याने व पुरेशा प्रमाणात विचार करणे, ही काळाची गरज ठरली आहे.



 
निवडलेल्या उमेदवारांचा दर्जा

सध्याच्या बदलत्या स्थितीत केवळ उमेदवारांची निवड करणेच पुरेसे नसून केवळ योग्य वा पात्रताधारकच नव्हे, तर दर्जेदार उमेदवारांची निवड करण्यावर आज कंपन्यांचा स्वाभाविक भर असतो व याकामी प्रगत प्रयत्न आणि प्रक्रियेचा स्वाभाविकच सकारात्मक परिणाम होत असल्याने त्याद्वारा निवड करताना उमेदवारांच्या दर्जावर भर देता येतो.



समाजमाध्यमांचा सफल उपयोग

सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, सध्या समाजमाध्यमांचा उपयोग कंपनी आणि उमेदवार या उभयतांकडून मोठ्या प्रमाणावर होत असतो. संख्यात्मक स्वरूपात यासंदर्भात सांगायचे झाल्यास सुमारे ९० टक्के उमेदवार ‘लिंक्ड-इन’ या समाजमाध्यमाची, तर ८५ टक्के कंपन्याही समाजमाध्यमांची मदत घेत असतात. उभयपक्षी समाजमाध्यमांचा उपयोग अधिक व्यापक आणि सकारात्मक स्वरूपात करणे, यावर आज उमेदवारांच्या निवडीच्या संदर्भात होणे दोघांच्याही फायद्याचे होऊ शकते, हे समजून घेणे आवश्यक आहे.




उमेदवार निवड प्रक्रियेला अधिक गतिमान करणे

कंपनीच्या गरजेनुसार व अपेक्षेनुरूप नव्हे, तर ठराविक वा निश्चित कालावधीत उमेदवारांची निवड करून त्यांना कामावर रूजू करून घेणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते व हे काम प्रगत व तंत्रज्ञानावर आधारित प्रयत्नांमुळेच होऊ शकते.




कर्मचार्‍यांचे कल्याणच नव्हे, तर कर्तृत्ववान कामगिरी
परंपरागत स्वरूपात ‘कर्मचारी कल्याण’ ही संकल्पना आता कालबाह्य ठरली असून आता बदलत्या काळानुरूप वाढती गरज आहे, ती कर्मचार्‍यांना अधिक कर्तृत्ववान-कार्यक्षम करून त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा घडवून आणण्याची. हे काम करण्यासाठी केवळ कर्मचार्‍यांच्या संदर्भात कल्याणकारी नव्हे, तर कार्यक्षम कर्तबगारीवर भर देणे आवश्यक असून त्यासाठी पण व्यक्तिगत प्रयत्नांच्या जोडीला संस्थात्मक स्तरावर ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बदलते तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतीद्वारा हे सारे आता शक्य झाले असून त्याला अधिक सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळणे, ही काळाची गरज ठरली आहे.


- दत्तात्रय आंबुलकर
@@AUTHORINFO_V1@@